18 January 2019

News Flash

‘फ्लेक्स’ उतरवले पाहिजेत..

महाराष्ट्रातील सांस्कृतिक दुष्काळाच्या तीव्रतेची, एका भडभुंज्या विकृतीच्या आक्रमणाची.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

ज्या समाजात विवाह समारंभातील विकृत व ओंगळवाण्या प्रदर्शनाला प्रतिष्ठा मिळते, तो समाज सांस्कृतिकदृष्टय़ा सुदृढ आहे असे म्हणता येणार नाही.

दुष्काळ वेगवेगळ्या स्वरूपांचा असतो. पाण्याचा, धान्याचा, सोयीसुविधांचा. कधी ओला, तर कधी सुका. महाराष्ट्राच्या पाचवीला तो पुजलेला आहेच. पण म्हणून येथील मराठी माणसाने त्यापुढे कधी मान झुकवली नाही. तो या ना त्या मार्गाने लढतोच आहे त्याच्याशी. कधी हार होते त्याची. कधी वैताग येतो त्या लढण्याचा, त्या जगण्याचा. कोणी शरण जातो मग मरणमिठीला. ही शरणागती हे महाराष्ट्रातले आजचे एक वास्तव. पण त्यापुढे दुसरेही एक वास्तव उभे आहे. लढण्याच्या जिद्दीचे. अनेक हातांनी, अनेक मार्गानी ती झुंज सुरू आहे दुष्काळाशी. पण हे झाले भौतिक दुष्काळाचे. याहून एक वेगळाच दुष्काळ महाराष्ट्रातील गावागावांतून, शहरां-नगरांतून तोंड वर काढू लागला आहे. गाजर गवतासारखा फोफावला आहे तो आणि इतका सवयीचा झाला आहे की अनेकदा जाणवतही नाही. आपल्यासमोर बातम्या येत असतात त्याच्या. परवाच ‘लोकसत्ता’मध्ये तसे एक वृत्त होते. मराठवाडय़ातल्या हिंगोलीतले. सामुदायिक विवाह सोहळ्यांकडे लोकांनी पाठ फिरवल्याचे. त्याआधीही अशीच एक बातमी प्रसिद्ध झाली होती. हरिनाम सप्ताहांचे राजकीय ‘इव्हेन्ट’ झाल्याची. या केवळ बातम्या नाहीत. ती दवंडी आहे, महाराष्ट्रातील सांस्कृतिक दुष्काळाच्या तीव्रतेची, एका भडभुंज्या विकृतीच्या आक्रमणाची. मराठी संस्कृतीमधील तोरणापासून मरणापर्यंतच्या सगळ्या सोहळ्यांवर होत असलेला हा हल्ला नीट समजून घेणे आवश्यक आहे.

यात खंत सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये लोक सहभागी होत नाहीत ही नाही. तसे पाहता सामुदायिक विवाह ही काही मराठी परंपरा नाही. तो पर्याय आहे. परिस्थितीतून निघालेला तो एक चांगला मार्ग आहे. गावगाडय़ातून, तेथील शहाण्यासुरत्यांच्या विचारांतून जन्माला आला तो. गावकी, देवस्थाने, स्थानिक मंडळे, सामाजिक संस्था यांनी तो जोजवला. त्याच्या स्वरूपावर विविध आक्षेप असू शकतात. ढांगाढोंगात विवाह सोहळे साजरे करण्याची ऐपत असलेल्यांचे तर अधिकच आक्षेप असू शकतात. अनेकांसाठी हे सोहळे गैरसोयीचे असतात. कारण तेथे त्यांच्या हौशी-मौजीला स्थान नसते. परंतु या सोहळ्यांवर टीका करायची, तर त्याआधी ते ज्या परिस्थितीमुळे भरवावे लागले त्या परिस्थितीवर मात करावी लागेल. आज येथील लाखो लोकांसाठी विवाह सोहळा हा कर्जाच्या बाजाराकडे नेणारा मार्ग बनलेला आहे. हे कशामुळे घडले? ही परिस्थिती निर्माण झाली, ती विवाह विधीसारखा एक सामाजिक-धार्मिक समारंभ हौसे-मौजेचे साधन आणि मिरवण्याचा उपक्रम याही पलीकडे जाऊन सामाजिक-राजकीय पतप्रतिष्ठाप्राप्तीचा कार्यक्रम बनल्यामुळे. यापूर्वीही ‘लग्न पाहावे करून’ असे म्हटले जातच असे. तेव्हाही हुंडा, मानपान असे गोवर्धन उचलावे लागतातच घरकारभाऱ्याला. परंतु मधल्या काळात गावोगावी निर्माण झालेल्या नवश्रीमंतांमुळे विवाह सोहळ्यांचा एकूण बाजच बदलला. एकदा हाती पैसा आला की माणसाला ओढ लागते सत्तेची. ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटय़ा, पतसंस्था, गणेश मंडळे, देवस्थानचे विश्वस्त मंडळ, झालेच तर दूध संकलन केंद्रे, साखर कारखाने, पक्षाच्या शाखा यात घुसून ती सत्ता मिळवता येते. एकदा ती मिळाली की मग हाव सुटते प्रतिष्ठेची. ती पैसे फेकून विकत घेता येत नसते. ती मिळवावी लागते. विवाह सोहळ्यांपासून दशक्रिया विधीपर्यंतचे विविध कार्यक्रम आज अशी प्रतिष्ठा मिळविण्याचे साधन बनले आहेत. सोयर असो वा सुतक, तेथे आपल्या आर्थिक आणि राजकीय सत्तेचे प्रदर्शन करायचे आणि त्यातून लोकांचे डोळे दिपवून टाकायचे असे ते चाललेले असते. कानाचे पडदे फाडणारा ‘डीजे’नामक प्रकार, दुपारच्या मोकळ्या वेळात वऱ्हाडी मंडळींच्या मनोरंजनासाठी ठेवले जाणारे ‘ऑर्केस्ट्रा’, डोळे दिपवणारी रोषणाई आणि दूरचित्रवाणी मालिकांची आठवण करून देणारे बोहल्याचे ‘सेट’ हे सध्याच्या या ‘मंगल’ सोहळ्यांचे स्वरूप. त्या ओंगळवाणेपणात भर म्हणून हल्ली या मराठी विवाह सोहळ्यांना उग्र पंजाबी कळाही आलेली आहे. एकीकडे पाडवा शोभायात्रांसारख्या उपक्रमांतून मराठी संस्कृतीचा ‘गर्व से’ उदोउदो करायचा आणि दुसरीकडे त्या संस्कृतीला ही अशी विकृत ठिगळे जोडायची असा एक गोंधळलेपणा वाढत चाललेला आहे. त्याचेच हे एक उदाहरण. पूर्वी विवाह समारंभ कोणाचाही असो, त्याबद्दल नंतर एकाच गोष्टीची चर्चा चाले.. महिला मंडळींमध्ये रुखवताची आणि पुरुष वऱ्हाडय़ांमध्ये भोजनाची. हल्ली त्या चर्चेला जोड मिळाली आहे, ती ‘समाज’ किती जमला होता आणि बोहल्यावरून किती आणि कोणत्या पुढाऱ्यांची भाषणे झाली याची. अलीकडे गावोगावच्या बहुतांश मंगलकार्याना राजकीय जाहीर सभांची कळा आल्याचे दिसते ते त्यामुळेच. केवळ मंगलकार्यामध्येच नव्हे, तर अगदी दशक्रियाविधीतही हेच. तेथेही पुढाऱ्यांची भाषणे. ते खोटे खोटे उमाळे आणि पोकळ श्रद्धांजल्या. हल्ली तर सांत्वनाला किती पुढारी आणि अधिकारी येऊन गेले याच्या याद्याही व्हॉट्सअ‍ॅपवरून फिरवत मिरवण्याची रीत पडली आहे. ‘मिशीला पीळ मारण्याचा’ हा नवा प्रकार. पुन्हा हेच हरिनाम सप्ताहांतूनही. तेही राजकारणाचे, प्रतिष्ठा मिळवण्याचे फड बनू लागले आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत फोफावलेल्या ‘फ्लेक्स संस्कृती’चीच ही वेगवेगळी रूपे. सगळीकडे एकच हव्यास आपल्या खऱ्या-खोटय़ा सत्तेचे प्रदर्शन करून प्रतिष्ठा मिळविण्याचा. नवसरंजामशहा आणि नवश्रीमंतांच्या या ‘फ्लेक्स संस्कृती’चेच ग्रहण सामुदायिक विवाहांसारख्या चांगल्या उपक्रमांना लागले आहे.

उजाड वावरे आणि डोक्यावर शेतकर्जाचा बोजा ही आजही महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांची अवस्था आहे. त्याला नापिकी, शेतमालाला भाव नसणे ही जशी कारणे आहेत, तसेच लग्नकार्यासाठीचा खर्च हेही एक कारण असल्याचे दिसते आणि तरीही या कर्जबाजारी शेतकऱ्यांना आपल्या दारातले लग्नकार्य ‘जोरात’ व्हावे असे वाटते. सामुदायिक विवाह सोहळ्यांत ते कमी खर्चात होऊ  शकते. गावजेवणापासून मानपानापर्यंतच्या अनेक खर्चाना तेथे कात्री लागत असते. परंतु तरीही त्याकडे पाठ फिरवली जाते. मात्र याबद्दल केवळ त्या अडाणी शेतकऱ्यांना दोष देऊन चालणार नाही. समाजाच्या वरच्या स्तरातील ‘फ्लेक्स संस्कृती’चे ते मानसिक बळी आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. लग्नात ‘डीजे’चा दणका केला, मिरवणुकीत ‘लायटिंगचा रथ’ आणला, मुबलक ‘दारूकाम’ केले आणि बोहल्यावरून तालुक्यातल्या दहा-बारा ‘दिग्गज’ पुढाऱ्यांनी वधू-वरांना ‘शुभाशीर्वाद’ दिले म्हणजे गावकीत आणि भावकीत आपली ‘कॉलर ताठ’ होते असे त्यांना वाटत असेल, तर त्याकडे सहानुभूतीनेच पाहिले पाहिजे. कारण त्यांची ती मनोभूमिका समाजाच्या उच्चस्तरातूनच झिरपत आली आहे. ते लग्नात पैसे उधळतात ते ‘जिवाची मुंबई’ करण्यासाठी नव्हे. आज दारात सनई-ताशा वाजत आहे, कदाचित यामुळेच उद्या आपल्या दारात कर्जवसुलीसाठी बँकेचा बॅण्ड वाजणार आहे हे त्याला तेव्हाही दिसतच असते.

ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने ते कसेही उडवावेत, ज्याला परवडत नाही त्याने उंटाच्या पाश्र्वभागाचा मुका घेण्यास जाऊन मान मोडून घेऊ  नये, असा प्रतिवाद यावर कोणी करू शकेल. बाजारशक्तींवर चालणाऱ्या आजच्या जगात त्यात फार काही गैर नाही. परंतु प्रश्न केवळ आर्थिक ऐपतीचा नाहीच. मुद्दा सत्ता आणि संपत्तीच्या प्रदर्शनातून प्रतिष्ठा मिळविण्याचा आहे. ज्या समाजात अशा प्रकारे आणि प्रकारांना प्रतिष्ठा मिळते, तो समाज सुदृढ आहे असे म्हणता येणार नाही. त्याला सांस्कृतिक दुष्काळग्रस्तच म्हणावे लागेल. खोटय़ा प्रतिष्ठेची ‘फ्लेक्स संस्कृती’ हे या दुष्काळाचेच अपत्य. केवळ चौकाचौकांतलेच नव्हे, तर मनामेंदूतले हे ‘फ्लेक्स’ उतरविणे हाच खरा या विकृतीचा मुकाबला करण्याचा मार्ग आहे.

First Published on May 12, 2018 2:50 am

Web Title: maharashtra farmers family ignore mass marriages programme