सौरवादळांचे भाकीत वर्तवणे ‘नासा’च्या सौरमोहिमेमुळे शक्य होईल; त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते आजवर असाध्य वाटलेल्या ध्येयाच्या सिद्धीसाठी पाऊल टाकणे..

प्रगती म्हणजे काय याची काहीही कल्पना नसलेल्या, कंदमुळे खाऊन जगणाऱ्या आदिम अवस्थेतील मानवाने जेव्हा पहिल्या सकाळी पूर्वेकडच्या आकाशात तो तांबडालाल गोळा पाहिला तेव्हा देवत्वाच्या कल्पनेचाही जन्म झाला. देवदैत्यादी भावनांचे वाटे करणे त्या काळी सोपे असावे. जे जे आपल्या जिवावर उठणारे ते ते दैत्यकारी आणि जे तसे नाही आणि आपल्या आवाक्यातही नाही ते दैवी अशी त्याची सोपी मांडणी झाली असणार. अफाट आकाराचे डोंगर, त्यात घुमणारा आणि झाडेमुळे हलवणारा वारा, धबाबा लोटणाऱ्या धारांतून वाहणारे पाणी आणि अग्नीस अंगी वागवणारा सूर्य हे आपोआप देव बनले. ते आवाक्यातले नव्हते. पण अपायकारीही नव्हते. त्यानंतरच्या लाखो वर्षांत प्रगतीच्या पुलांखालून बरेच पाणी वाहून गेले. पण अर्धवैज्ञानिक समाजातील सूर्याविषयीची देवत्वाची भावना काही गेली नाही. सूर्यास अघ्र्य देणे त्यातून आले आणि सूर्यनमस्कारदेखील त्याविषयीच्या देवत्वभावनेतूनच जन्मास आला. वास्तविक या विश्वाच्या पसाऱ्यात अन्य अनेक ताऱ्यांसारखाच एक सूर्य. आपल्यापासून त्यातल्या त्यात जवळ. म्हणजे साधारण १४,९०,००००० किलोमीटर अंतरावर असलेला. वास्तविक काहींच्या मते या सूर्यापेक्षादेखील अधिक तेजस्वी आणि प्रकाशमान तारे या अवकाशात आहेत. फक्त आपणापासून ते त्याहूनही लांब असल्याने ते दिसत नाहीत, इतकेच. म्हणून देखल्या देवा दंडवत या युक्तीप्रमाणे जो समोर दिसतो त्या सूर्यालाच आपण देव मानत राहिलो. हे असे कोणास देवत्व देणे म्हणजे स्वत:च्या मर्यादांसमोर मान तुकवणे. हे अशक्तपणाचे लक्षण. भावनेपेक्षा बुद्धीवर विसंबून राहणाऱ्यांना हे अशक्तपण मंजूर नाही. भावनाधिष्ठित समाज सूर्यनमस्कार आदींत षोडशोपचारे रममाण होत असताना बुद्धीवर विश्वास असलेले मात्र ज्यास सामान्यजन देव मानतात त्याच्या कथित देवत्वालाच स्पर्श करू पाहतात. अमेरिकेच्या नॅशनल एअरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस सेंटर, म्हणजे नासा, या संस्थेचे अवकाशात झेपावलेले पार्कर हे सूर्ययान हा असाच एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न. त्या कथित देवत्वास स्पर्शू पाहणारा.

अमेरिकेच्या केप कॅनव्हेराल येथील अवकाश प्रक्षेपण तळावरून ही सूर्यमोहीम सुरू होऊन जेमतेम २४ तास उलटले असतील. प्रचंड क्षमतेच्या डेल्टा प्रक्षेपकातून पार्कर हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने झेपावले. नासाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या अवकाशयानास व्यक्तीचे नाव देण्यात आले असून हे अवकाशयान उड्डाण पाहण्यासाठी ९४ वर्षांचे डॉ. युजीन पार्कर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. हे असे करण्यामागील खास कारण म्हणजे मुळात सूर्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी असे अवकाशयान पाठवण्याची कल्पना डॉ. पार्कर यांची. ती त्यांनी साठ वर्षांपूर्वी पहिल्यांदा मांडली तेव्हा ती फेटाळली गेली. एकदा नव्हे तर दोनदा. सूर्याच्या पृष्ठभागावरून वातावरणात विविध झोत सोडले जातात आणि त्याचा पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होत असतो, त्यामुळे त्याचा अभ्यास व्हायला हवा, असे या डॉ. पार्कर यांचे म्हणणे. परंतु तसे म्हणणे मांडणारा त्यांचा प्रबंध त्या वेळी नाकारला गेला. हे असे काही नाही, असे त्या वेळच्या ढुढ्ढाचार्यानी पार्कर यांना सुनावले. परंतु पार्कर निराश झाले नाहीत. त्यांचा स्वत:च्या अभ्यासावर विश्वास होता. त्यास पाठिंबा मिळाला सुब्रमणियन चंद्रशेखर या खगोलीभौतिक शास्त्रज्ञाचा. चंद्रशेखर हे नासातील प्रतिष्ठित शास्त्रज्ञ. नासाच्या संपादकमंडळातही त्यांचा समावेश होता. डॉ. पार्कर यांचा प्रबंध मूल्यमापनासाठी चंद्रशेखर यांच्यासमोर आला असता त्यांनी त्यातील सिद्धांत पूर्णपणे रास्त ठरवला आणि या अशा संशोधनास पाठिंबाच दिला. त्या वेळी सुरू झालेल्या प्रक्रियेची परिणती म्हणजे ही सूर्यमोहीम. त्या वेळी चंद्रशेखर हे जर डॉ. पार्कर यांच्या पाठीमागे उभे राहिले नसते तर कदाचित असा प्रयत्न त्या वेळी सोडून दिला गेला असता. मात्र तसे झाले नाही. पुढे चंद्रशेखर यांनाही त्यांच्या संशोधनासाठी नोबेल मिळाले आणि अमेरिकेच्या एका अवकाशतळास त्यांचे नाव देऊन गौरवले गेले. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचे नाव दिलेली ही दुसरी मोहीम.

तीमधील पार्कर हा उपग्रह आतापर्यंत कधीही न घडलेली गोष्ट करेल. तो सूर्याच्या अत्यंत जवळ जाईल. आजपासून १२ आठवडय़ांनी पार्करची सूर्याशी पहिली लगट झालेली असेल. हे त्याचे सूर्याच्या अत्यंत जवळ जाणे किती अंतरावरचे असेल? या दोघांतील अंतर अवघे ६१ लाख किलोमीटर इतके असेल. या इतक्या महाप्रचंड अंतरास जवळ येणे म्हणावे का, हा प्रश्न काहींना पडेल. परंतु सूर्याच्या इतक्या सन्निध जाण्याचा हा विक्रम असेल. कारण याआधी सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ गेलेले यान चार कोटी ३० लाख किलोमीटर अंतरावरच थांबले होते. त्या तुलनेत ६१ लाख किलोमीटर म्हणजे तसे जवळच. सूर्याच्या इतक्या जवळ जाऊ पाहणारे हे यान जळून खाक होऊ नये म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हजारो अंश सेल्सिअस तपमानातही ते तगून राहील असा विश्वास नासाला आहे. पुढील सात वर्षांत हे पार्कर यान सूर्याच्या इतक्या जवळ २२ वेळा जाईल. या काळात त्याचा अवकाशभ्रमणाचा वेग हा काही काळ सहा लाख ९० हजार किमी प्रति तास इतका कल्पनातीत असणार आहे. कोणत्याही मानवनिर्मित वाहनाने गाठलेला हा सर्वाधिक वेग असेल. पृथ्वीवर इतक्या वेगाने या यानास मार्गक्रमण करता आले तर न्यूयॉर्क ते टोकिओ या पृथ्वीच्या दोन टोकाच्या शहरांतील अंतर पार करावयास त्याला एका मिनिटापेक्षाही कमी वेळ लागेल. हे असे अचाट धाडस करणारी अमेरिका एकटी नाही.

पाठोपाठ युरोपीय देशांचे सोलर नावाचे असेच यान अवकाशात झेपावणार असून त्याच्या आवश्यक त्या चाचण्या लंडन येथील प्रयोगशाळेत सुरू झाल्या आहेत. त्या दोन वर्षे चालतील. युरोपीय देशांची संयुक्त मोहीम असलेल्या या प्रकल्पात याननिर्मितीची जबाबदारी एअरबस कंपनीने उचलली आहे. तथापि हे युरोपीय यान अमेरिकेच्या पार्करइतके सूर्याजवळ जाणार नाही. ते साधारण चार कोटी किलोमीटरवरून सूर्यावर नजर ठेवून स्थिर होईल. परंतु त्याचे संशोधन अमेरिकी पार्करला पूरकच असेल. पार्कर सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ जाईल तर सोलर ते त्याचे जवळ जाणे कॅमेऱ्यात टिपेल. तसेच सूर्याच्या पृष्ठभागाची जास्तीत जास्त निरीक्षणे पार्कर नोंदवेल तर सोलर या सगळ्याची छायाचित्रे टिपत राहील. नासाच्या या मोहिमेसाठी तब्बल १५० कोटी डॉलर हा किमान खर्च अपेक्षित असून यातून सूर्याविषयी अमूल्य माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. सौरवादळे हा एक चक्रावून टाकणारा प्रकार असून त्यामुळे पृथ्वीवर दळणवळण आदींत व्यत्यय येतो. या सौरवादळांची माहिती उपलब्ध झाल्यास या सौरवादळांचे भाकीत वर्तवणे शक्य होईल.

त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते आतापर्यंत असाध्य वाटलेल्या ध्येयाच्या सिद्धीसाठी पाऊल टाकणे. कालचे असाध्य उद्या सहजसाध्य होत असते. गरज असते ती त्यासाठी विज्ञाननिष्ठा जपण्याची आणि असा विज्ञानाधिष्ठित समाज घडवण्याची. ते झाले नाही; तर आहेच आपले कोणाची तरी सावली कोणावर तरी पडते म्हणून होणाऱ्या ग्रहणांत शुभाशुभ आणि शिवाशिवीची परंपरा पाळणे. अशा वातावरणात सूर्यसूक्ताची खरी साधना होते नासासारख्या संस्थांतूनच. त्यातून काही शिकणे हीच आपल्यासाठी खरी सूर्यपूजा असेल.