इराणी दिग्दर्शक असगर फरहादी, व्हाइट हेल्मेट्स हा माहितीपट आणि पत्रकार जेम्स फोले हे यंदाच्या ऑस्कर समारंभाचे खरे नायक..

सोहळ्यात सहभागी कलावंतांना राजकीय भान दाखवीत त्यावर निर्भीड भाष्य करताना पाहणे अपूर्वाईचे होते. नैतिकता ठायी आहे म्हणूनच ही कलावंत मंडळी व्यवस्थेविरोधात आपली मते ठामपणे मांडू शकतात. राजाश्रयाचा लोभ आणि नैतिकता हे परस्परविरोधीच..

धनवंत, शक्तिवंतांनी गुणवतांना आसरा देऊन पदराखाली घ्यावे आणि त्या बदल्यात गुणवंतांनी आपापल्या यजमानाची चाकरी करावी ही आपली संस्कृती. तिच्या खुणा अद्यापही मोठय़ा प्रमाणात शाबूत दिसतात. या देशात एके काळी राजेमहाराजे आपापल्या पदरी कवी, गायक, विदूषक आदींना बाळगत. हा वर्गदेखील आपले राजकवीपद अथवा राजगायकपद अभिमानाने मिरवीत असे. काळाच्या ओघात राजेमहाराजे गेले. पण कोणाच्या तरी वळचणीस राहून दिवस काढण्याची कवी, गायक आणि विदूषकांची सवय काही पूर्णपणे गेली असे म्हणता येणार नाही. ब्रिटिश जाऊन सात दशके उलटली तरी ज्याप्रमाणे आपल्या रक्तातील गुलामवृत्ती अजूनही कायम आहे त्याप्रमाणे कलावंतांची लाचार सवयदेखील तशीच जिवंत आहे. राजाश्रयाखेरीज आपला तरणोपाय नाही असे या कलावंतवर्गास वाटत असते. म्हणून मिळेल त्या मार्गाने मिळेल ते आणि काहीच मिळणार नसेल तर निदान पद्मश्री आदी पदरात कसे पाडून घेता येईल यासाठीच त्याच्या कलासेवेचे प्रयोजन असते. हे आता जाणवायचे कारण म्हणजे यंदाचा ऑस्कर सोहळा. तो आतापर्यंतच्या सोहळ्यांपेक्षा अधिक झगमगाटी, अधिक देदीप्यमान होता असे नाही. तो नव्हताही. या सोहळ्याने डोळ्याचे पारणे फिटले असेल नसेल. पण या सोहळ्यात सहभागी कलावंतांना राजकीय भान दाखवीत त्यावर निर्भीड भाष्य करताना पाहून विचारांचे पारणे फिटत होते, हे नि:संशय. चित्रपटातील कचकडय़ाच्या दुनियेत वावरणाऱ्या तितक्याच कचकडय़ाच्या कलाकारांचे सोहळे आणि विचारशक्ती यांचा काही संबंध असतो याचा आपणास अनुभव नाही. म्हणून ऑस्करचे मोठेपण उलगडून दाखवणे आवश्यक ठरते.

या समारंभाचा प्रारंभच झाला तो सूत्रसंचालक जिम किमेल याने थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केलेल्या शरसंधानाने. हे ऑस्कर पुरस्काराचे प्रसारण २२५ देशांत पाहिले जात आहे असे सांगून जिम म्हणाला : इतक्या देशांत अमेरिकेविरोधात नाराजी निर्माण करण्यासाठी ट्रम्प यांचे आपण आभार मानायला हवेत. ट्रम्प यांच्या गृहखात्याच्या वाढत्या दहशतीचा संदर्भ देत जिम अनेक पाहुण्यांकडे पाहून उद्गारला, तुम्हाला गृहखात्याने येथे येण्यास मज्जाव केला नाही याचा आनंद आहे. या त्याच्या वाक्यानेच टाळ्या घेतल्या आणि पुढे जात त्याने अध्यक्ष ट्रम्प यांच्या टीकेचा विषय झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री मेरिल स्ट्रिप यांना उपस्थितांनी उभे राहून मानवंदना द्यावी, अशी विनंती केली. यामागील खोच लक्षात घेत उपस्थितांनी ती क्षणार्धात पाळली आणि अध्यक्षांच्या नाकावर टिच्चून मेरिल स्ट्रिप यांचा गौरव तेथे केला. जिम तेथेच थांबला नाही. ‘आता बहुधा अध्यक्ष ट्रम्प पहाटे त्यांच्या प्रातर्विधीसमयी ट्वीट करतील,’ या त्याच्या उद्गारातली खोच लक्षात येऊन कडाडून टाळी पडली. ट्रम्प यांनी निवडणुकीच्या काळात एका विश्वसुंदरीच्या देहाकारावर पहाटेच्या अडनिडय़ा वेळी ट्विप्पणी केली होती, याचा संदर्भ या विधानास होता. हे असे राजकीय भाष्य करणारा जिम एकटाच नव्हता. अलेग्झांद्रो बातरेलाझी या वेशभूषाकाराने आपले ऑस्कर जगभरातील स्थलांतरितांना अर्पण केले; तर गेल बर्नाल या मेक्सिकन कलाकाराने पुरस्कार प्रदान करताना अध्यक्ष ट्रम्प यांच्या मेक्सिको आणि अमेरिका यांतील सीमेवर भिंत बांधण्याच्या निर्णयाचा जाहीर निषेध केला. ‘‘रक्तामांसाचे कलाकार हे जगभर हिंडत असतात आणि त्या अर्थाने ते साऱ्या जगातील निर्वासितांचेच प्रतिनिधित्व करीत असतात. या कलाकारांत तुम्ही दुफळी निर्माण करू शकत नाही. अशा दुफळी निर्माण करणाऱ्या कोणत्याही भिंती उभारण्यास मी विरोध करतो,’’ हे त्याचे उद्गार जागतिक राजकीय परिस्थितीवरचे थेट भाष्य होते. ते केल्याबद्दल अनेक उपस्थितांनी उभे राहून टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. झोटोपिया मोर याने सहदिग्दर्शकाचे पारितोषिक घेताना केलेले विधान त्याची राजकीय समज दाखवून देणारे होते. ‘‘आमचा चित्रपट पारितोषिकप्राप्त ठरला आणि अनेक देशांतील प्रेक्षकांनी तो पाहिला यावरूनच सहिष्णुतेची ताकद ही घाबरवणाऱ्यांवर मात करते, हे दिसून येते,’’  हे त्याचे उद्गार सार्वकालिक ठरावेत. ‘मूनलाइट’ हा यंदाचा सवरेत्कृष्ट चित्रपट. त्याचा दिग्दर्शक बॅरी जेनकिन्स याने आपल्या आभारप्रदर्शनात, ‘‘आपल्याला कोणीही त्राता नाही, असे एखाद्याला वाटत असेल तर त्याने खुशाल आमच्या अमेरिकी नागरी स्वातंत्र्य संघटनेशी संपर्क साधावा, नागरी हक्क नाकारले जाणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी आम्ही आहोत,’’ असे जाहीर केले. हे त्याचे प्रतिपादन प्रचलित परिस्थितीत बंडखोरीचे निदर्शक आहे. ही संघटना अमेरिकेतील नागरी स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी कंबर कसून उभी असून तिला पाठिंबा देण्यासाठी या सोहळ्यात अनेक जणांनी आपल्या समारंभीय पेहेरावावर निळ्या फितीचे फूल टाचले होते. मूनलाइटचे दिग्दर्शक जेनकिन्स हे वर्णाने आफ्रिकी. त्यामुळे त्यांचे हे प्रतिपादन अधिक भेदक ठरले. त्याची प्रचीती उपस्थितांनी त्यांना दिलेल्या मानवंदनेतून आली.

तथापि इराणी दिग्दर्शक असगर फरहादी, व्हाइट हेल्मेट्स हा माहितीपट आणि जेम्स फोले हे यंदाच्या ऑस्कर समारंभाचे खरे नायक म्हणता येतील. परभाषी गटात आपल्या ‘द सेल्समन’ या चित्रपटाला मिळालेले ऑस्कर स्वीकारण्यासाठी फरहादी अमेरिकेत आले नाहीत. इराणसह अन्य सहा देशांवर ट्रम्प यांनी घातलेल्या बंदीचा निषेध त्यांनी या कृतीने केला. अमेरिकी न्यायालयाने ही बंदी उठवली आहे. तरीही ही बंदीची वृत्ती फरहादी यांना निंदनीय वाटते आणि ती खंत त्यांनी आपल्या निवेदनातून व्यक्त केली. ‘‘जगाची विभागणी आपण आणि ते यांत केली जात आहे. यामुळे फक्त अतिरेकी विचारसरणीलाच आपण बळ देत आहोत,’’ हे त्यांचे प्रतिपादन उपस्थितांचा ठाव घेऊन गेले. सात देशांतील नागरिकांवर प्रवेशबंदी घालण्याचा निर्णय हा अमानुष आहे, अशी त्यांची थेट टीका होती. व्हाइट हेल्मेट्स हा नेटफिल्क्स या नवतंत्री कंपनीने केलेला माहितीपट. सीरियामधल्या नृशंस हिंसाचारात मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या कामावर तो आधारित आहे. भीषण बॉम्बफेकीत उद्ध्वस्त इमारतींच्या खाली अडकलेल्या अनेक अभागींना या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले आहे. हा पुरस्कार स्वीकारताना दिग्दर्शक ओर्लॅण्डो इव्हान आइनसॅण्डेल यांनी मांडलेली सीरियनांची व्यथा काळजाला चटका लावून जाणारी होती. सीरियात गेली सहा वर्षे सुरू असलेला हा अमानुष अत्याचार थांबवा, या त्यांच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद न मिळता तरच नवल. परंतु या झगमगत्या सोहळ्यात मनावर ठसा उमटवला तो कोणताही पुरस्कार नसलेल्याने. जेम्स फोले हे त्याचे नाव. जेम्स हा वार्ताहर होता. पश्चिम आशियाच्या वाळवंटात वार्ताकन करीत असताना आयसिसच्या दहशतवाद्यांनी २०१४ साली त्यास ठार केले. ‘जिम : द जेम्स फोले स्टोरी’ या त्याच्यावरील अनुबोधपटातील ‘द एम्प्टी चेअर’ हे गाजलेले गाणे या समारंभात स्टिंग या लोकप्रिय कलाकाराने सादर केले. व्यासपीठावर संपूर्ण अंधार. मागे प्रकाशाची निळाई. रिकामा रंगमंच. आणि त्यावर फक्त गिटारच्या साह्याने गाणारा स्टिंग. गाणे संपते आणि मागच्या भव्य पडद्यावर फोले याचे वाक्य उमटते : अधिकारास आव्हान देण्याइतकी नैतिकता माझ्यात नसेल तर ती पत्रकारिताच नव्हे.

हे विधान पत्रकारितेविषयी असले तरी ते कलाक्षेत्रांसही लागू होते. ही नैतिकता ठायी आहे म्हणूनच ही कलावंत मंडळी व्यवस्थेविरोधात आपली मते ठामपणे मांडू शकतात. राजाश्रयाचा लोभ आणि नैतिकता हे परस्परविरोधी आहे. यातील पहिल्याने सुखसमृद्धी, पद्मपुरस्कार, समितीवर्णी आदींची प्राप्ती सुलभ होते तर दुसऱ्याने फक्त एकच साध्य होते. पाठीचा कणा ताठ होतो. हे ताठ कण्यांचे वर्तमान ऑस्कर सोहळ्याने आपल्यापर्यंत पोहोचवले, इतकेच.