आपल्याकडच्या दिल्ली आदी शहरांतील प्रदूषणाचा परिणाम हा चीनमधील बीजिंगसारख्या शहरांपेक्षाही अधिक गंभीर आहे.

विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर जगातील अनेक शहरांना याचा सामना करावा लागला, त्यामुळेच प्रदूषणाचा सामना शहरे कसा करतात यावर त्या शहरांचे यश मोजले जाते. दूषित हवा जगभर आहेच आणि त्याने बालकांचे बळी जाण्यासारख्या समस्याही आहेत. पण आपण याबद्दल काय करणार, हा प्रश्न आहे..

बाकी काही नाही तरी निदान एका बाबतीत तरी आपण चीनची बरोबरी करू शकलो. ती बाब म्हणजे हवेचे प्रदूषण. राजधानी दिल्लीत सध्या ते अत्यंत धोकादायक अवस्थेला गेले असून नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्याची वेळ सरकारवर आली आहे. यावरून या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट व्हावे. इतक्या खराब हवेस बीजिंगची हवा असे म्हणतात. म्हणजे हवेचे प्रदूषण किती घातक होऊ शकते याचे जागतिक मापक असून त्यातील खराबातील खराब हवेची सांगड बीजिंग येथील वातावरणाशी घातली गेली आहे. तीन वर्षांपूर्वी बीजिंगमधील हवा इतकी खराब झाली की तो वाईटातील वाईटाचा मापदंडच बनला. या वर्षी आपण बीजिंगलाही याबाबत मागे टाकले. सल्फर डायऑक्साइड, पाऱ्याची वाफ, कॅडमियमचे कण, शिशाचे कण, कोळशाचा धूर आदींमुळे बीजिंगमधील हवा इतकी दूषित होते की वेळोवेळी शाळा आदी बंद करण्याची वेळ स्थानिक अधिकाऱ्यांवर येते. बीजिंगच्या परिसरात अनेक कारखाने आहेत आणि ते कोळशाच्या ऊर्जेवर चालतात. त्यामुळे त्या शहरातील प्रदूषणात चांगलीच वाढ होते. आपल्याकडे दिल्ली यंदाही या पातळीवर उतरली असून ही परिस्थिती काळजी करावी अशी आहे. यंदाही असे म्हणावयाचे कारण म्हणजे गेली दोन वर्षे या हंगामात दिल्ली आणि परिसरातील वातावरण इतकेच दूषित होते. याचा अर्थ या काळात हवा खराब होणार याचा अंदाज संबंधितांना असतो. परंतु अन्य धोक्यांप्रमाणे याबाबतही आपली शासकीय यंत्रणा हातावर हात धरून बसते आणि नागरिकांवर तोंडाला मुखवटे बांधून जगण्याची वेळ येते. म्हणजे बीजिंगमध्ये जसे होते तसेच आता आपल्या राजधानी आणि आसपासच्या परिसरांतही होत असून देशातील अन्य शहरांतील परिस्थिती काही वेगळी आहे, असे नाही. जगातील पहिल्या दहा अत्यंत प्रदूषित शहरांतील तब्बल सात शहरे एकटय़ा चीनमध्ये आहेत. आपला या संदर्भातील वेग लक्षात घेता आपण चीनशी याबाबत तरी स्पर्धा करू शकू हे निश्चित.

या प्रश्नाचे दोन पैलू आहेत. एक म्हणजे घराघरांतील व्यक्तींच्या आरोग्यास होणारा धोका. या घराघरांतील व्यक्ती माध्यमांच्या प्रभावक्षेत्रात असतात. त्यामुळे त्यांची दखल प्राधान्याने घेतली जाते आणि या खराब हवेस तोंड देण्यासाठी तुम्ही काय करता, यांसारख्या निर्थक प्रश्नांनी हे दूषित हवामानाचे वृत्तांकन साजरे केले जाते. त्याचबरोबर नेहमीचे तितकेच निर्थक उपायदेखील सुचवले जातात आणि हिमालयाकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे परिस्थिती कशी बदलेल आदी अंदाजाचे पतंग उडवले जातात. तसेच हिमाचल, चंदिगड, उत्तराखंड आदी राज्यांत या काळात मोठय़ा प्रमाणावर शेतीसाठी जमिनीची रापणी चालते. शेतजमिनीवर गवत आदी पसरून जमीन भाजण्यासाठी हे आवश्यक असते. या उद्योगाने तयार होणारा धुराचा झाकोळही मोठय़ा प्रमाणावर दिल्ली परिसरावर पसरतो. असे झाले की काय उपाययोजना केली जावी याबद्दलही तितकीच निरुपद्रवी चर्चा सरकारी पातळीवर होते. ती झाल्याने बोलघेवडय़ा वर्गात प्रदूषणास तोंड देण्यासाठी किती व्यापक उपाययोजना केल्या जात असल्याचा समज पसरावा यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. हा झाला या प्रदूषण संकटाचा एक पैलू. परंतु दुसरा पैलू याहूनही अधिक गंभीर आहे आणि क्रयशक्ती नसलेल्या वर्गाशी संबंधित आहे. त्यामुळे माध्यमांचे त्याकडे लक्ष नाही.

हा वर्ग म्हणजे ज्यांना घरच नाही तो. ज्यांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर नाही त्या वर्गाला या प्रदूषणाच्याच थेट सावलीत जगावे लागते आणि कोणत्याही प्रतिबंधक उपाययोजना त्यांना करता येत नाहीत. हे अर्थातच फक्त आपल्याकडेच होते असे नाही. जगभरात, त्यातही तिसरे जग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्धदरिद्री वा अर्धश्रीमंत देशांत ही बेफिकिरी प्राधान्याने दिसून येते. या देशांतील गरीब, अर्धशिक्षित वर्ग मोठय़ा प्रमाणावर या दूषित हवेचा बळी ठरतो. संयुक्त राष्ट्रांच्या मुलांसाठीच्या संघटनेने केलेल्या पाहणीनुसार जगभरात पाच वर्षांखालील सहा लाख बालके दरवर्षी या खराब हवेमुळे प्राणास मुकतात. त्याहूनही कित्येक दशलक्ष मुलांचे आरोग्य संकटात येते वा ती रासायनिक प्रदूषणाने अपंग होतात. जगात साधारण ३० कोटी बालकांच्या डोक्यावर छत नाही. दूषित हवेमुळे या बालकांच्या बौद्धिक विकासातही अडथळा येतो. कारण घातक प्रदूषकांमुळे त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. दर सात बालकांतील एका बालकास खराब हवेस तोंड द्यावे लागते. ही हवा किती खराब असते? तर प्रदूषणाच्या किमान पातळीपेक्षा सहापट अधिक दूषित घटक या हवेत असतात. हा सारा तपशील संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात देण्यात आला आहे आणि तो दिल्लीसारख्या शहरासही लागू पडतो. यावर काही जण बीजिंगमध्येही असेच आहे, तेव्हा यात इतके काळजीचे कारण काय अशा प्रकारचा युक्तिवाद करतील. परंतु वास्तव हे की आपल्याकडच्या प्रदूषणाचा परिणाम चीनमधील बीजिंग आदी शहरांपेक्षाही गंभीर आहे. याचे कारण असे की बीजिंगमधील परिस्थितीस तोंड देता यावे यासाठी चीनसारख्या देशाने विकासाची फळे चाखली आहेत. चीनची अर्थव्यवस्था आजमितीला आपल्या पाचपट आहे. भारतात जितकी रस्त्यांची एकूण लांबी आहे तितकी केवळ चीनमध्ये जलदगती महामार्गाची लांबी आहे. भारतात जितके पोलादाचे एकूण उत्पन्न आहे तितके पोलाद एकेकटय़ाने निर्माण करणारे तब्बल १३ कारखाने चीनमध्ये आहेत. हा तपशील अशासाठी जाणून घ्यावयाचा की अधिक संपत्तीनिर्मितीमुळे अडचणींना तोंड देण्याची क्षमताही चीनमध्ये आपल्यापेक्षा अधिक आहे. परंतु आपल्याकडे इतका विकास नाही. त्यामुळे विकासातून निर्माण होणाऱ्या संपत्तीतून उ:शाप देण्याची ताकद नाही. परंतु तरीही विकासाचा शाप मात्र तितक्याच तीव्रतेचा. दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येने याच शापाचा पुनरुच्चार पुन्हा एकदा झाला. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर जगातील अनेक शहरांना याचा सामना करावा लागला हा इतिहास आहे. तेव्हा शहरांना प्रदूषण हे नवे नसले तरी या प्रदूषणाचा सामना शहरे कसा करतात यावर त्या शहरांचे यश मोजले जाते.

अवघ्या काही दशकांपूर्वी लंडनसारख्या शहराने याच परिस्थितीस तोंड दिले. कोळशाच्या धुराने या शहराचे वातावरण इतके खराब होत असे की हिवाळ्यात शाळा, महाविद्यालये बंद ठेवावी लागत असत. आधीच कुंद हवा आणि त्यात प्रदूषण. यामुळे दृश्यमानता काही फुटांवर येत असे. त्यामुळे साध्या दुचाकींचेही अपघात मोठय़ा प्रमाणावर होत. हा काळ कोळशाच्या प्राधान्याचा. त्या काळी कोळशाचे महत्त्व इतके होते की त्याचा उल्लेख किंग कोल असा केला जात असे. परंतु वातावरणातील प्रदूषण असेच होत राहिले तर लंडनची गणना मागास खेडय़ात केली जाईल याची जाणीव संबंधितांना झाली आणि त्यानंतर युद्धपातळीवर प्रयत्न होऊन लंडनमधील प्रदूषण दूर केले गेले. बीजिंगमध्येही त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू झाले असून चिनी राजवटीची धडाडी आणि कर्तव्यकठोरता लक्षात घेता चीनला याबाबत यश येईल यात शंका नाही. तेव्हा प्रश्न आपला आहे. या संकटास तोंड द्यावे याची जाणीव नाही, दूरगामी परिणामांचा आणि उपायांचा विचार नाही आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी नाही, अशी आपली अवस्था. त्यामुळे आपल्यासाठी या संकटाचे गांभीर्य अधिकच वाढते. या संदर्भात मुंबईची अवस्था दिल्लीहून दूर नाही. आपली सर्वच महानगरे याच दिशेने निघाली असून या हवेच्या गहिऱ्या संकटाचे काय करायचे याचा विचार करण्याची दूरदृष्टी आपणास दाखवावीच लागेल.