दिनेश गुणे

भाजपने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटासोबत सरकार स्थापन केल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय राहील, याबाबत समाजात आणि संघ परिवारातही उत्सुकता असणे साहजिकच आहे..

‘स्वार्थ हे संघर्षांचे मूळ आहे, हे माहीत असूनही स्वार्थ सोडता येत नसेल तर हानी हाच त्याचा परिणाम असतो,’ असे विधान चारच दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना केले, आणि या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांचे संदर्भ शोधण्यास सुरुवात झाली. भागवत यांनी शिवसेनेस कानपिचक्या दिल्या, असा निष्कर्षही काढला गेला. ते अगदीच चुकीचेही नव्हते. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांचे नाते अधिक जवळचे आहे हे जगजाहीर आहे. मुख्यमंत्री पदाच्या वादातून शिवसेनेने भाजपसोबतची निवडणूकपूर्व युती गुंडाळून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू केले, आणि त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटासोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन करून सत्तासंघर्षांस आश्चर्यकारक कलाटणी दिली. भागवत यांच्या त्या वक्तव्याचा तोच अन्वयार्थ आता स्पष्ट होऊ  लागला आहे. भाजप आणि रा. स्व. संघ यांचे वैचारिक आणि संघटनात्मकदृष्टय़ा एकमेकांशी घट्ट नाते आहेच. मात्र संघ ही भाजपची मातृसंस्था असली, तरी संघास कोणत्याही राजकीय पक्षाचे वावडे नाही, हे भागवत यांनी वारंवार स्पष्ट केले होते. संघाच्या विचारसरणीस राजकीय विरोध वाढू लागला, तेव्हा राजकीय मंचावरूनच संघाची बाजू मांडली गेली पाहिजे या हेतूनेच संघाची राजकीय शाखा म्हणून अगोदर जनसंघ आणि पुढे भाजपची स्थापना झाली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नवी दिल्लीमध्ये ‘भविष्य का भारत’ या तीन दिवसांच्या परिषदेत संघाची हीच भूमिका भागवत यांनी मांडली. अन्य राजकीय पक्षांनी देशहिताच्या प्रश्नावर संघाशी संपर्क साधल्यास संघ त्यांनाही मदत करतो, असेही त्यांनी त्या परिषदेत स्पष्ट केले होते. संघाच्या कार्यकर्त्यांनी कोणा एकाच राजकीय पक्षाचे काम करावे असा ‘आदेश’ संघ कधीही देत नाही, मात्र, जो राजकीय पक्ष संघाच्या विचाराशी जवळीक मानतो, त्या पक्षाचे काम करण्यास संघाची कोणतीच हरकत नसते, असेही भागवत यांनी त्याच परिषदेत पुन्हा एकदा स्पष्ट केले होते. हे पाहता, संघ परिवारास भाजप हा सर्वाधिक जवळचा राजकीय पक्ष ठरतो. यामुळेच, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांच्या काळात, जेव्हा शिवसेना-भाजप यांची निवडणूकपूर्व युती सत्तावाटपाच्या वादातून तुटली, तेव्हा संघाच्या सहानुभूतीचे पारडे भाजपच्या बाजूने अधिक झुकले असावे..

गेल्या काही दिवसांतील राज्यातील सत्तासंघर्षांत अखेर भाजपने बाजी मारली, आणि शिवसेनेशिवाय सरकार स्थापन करून राजकारणास ऐतिहासिक कलाटणी दिली. मात्र, २०१४ आधी सत्तापूर्व काळात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांना गजाआड पाठविण्याच्या घोषणा करून जनमत स्वत:कडे वळविले, त्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित ‘भ्रष्टाचार्य’च हा इतिहास रचण्यासाठी भाजपला सापडले, हा चर्चेचा विषय ठरला.

भाजप ही स्वतंत्र अस्तित्व असलेली राजकीय संघटना आहे, त्यांच्यावर संघाचे दूरान्वयानेदेखील नियंत्रण नाही, असे संघ वारंवार वरकरणी ठासून सांगत असला, तरी राजकीय पेचप्रसंगांच्या काळात भाजपचे नेते नागपुरात संघ मुख्यालयात जाऊन बंद खोलीत संघधुरिणांशी विचारविनिमय करतात, हे लपून राहिलेले नाही. गेल्या काही दिवसांतील महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगांच्या काळातही संघ मुख्यालयात खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अन्य काही नेत्यांनीही सल्लामसलत केली होतीच. विशेष म्हणजे, शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाआघाडी सत्तास्थापनेसाठी प्रचंड उत्साह दाखवत असताना, भाजपच्या गोटात दिसणारी प्रचंड शांतता कोणाच्याच फारशी लक्षात आली नव्हती. संघ मुख्यालयातील भेटीगाठी आणि सल्लामसलतींनंतर, या सत्तासंघर्षांत संघाची नेमकी भूमिका काय असावी, यावरही तर्कवितर्क सुरू झालेच होते. मोहन भागवत यांनी मध्यस्थी केल्यास सेना-भाजप यांच्यातील वादाची धार मावळेल, असेही बोलले जाऊ  लागले. इतकेच नव्हे, तर भागवत यांनी मातोश्रीवर संपर्कही साधला, असेही काहीजण छातीठोकपणे सांगू लागले. अशा बातम्यांवर प्रतिक्रिया, दुजोरा वा इन्कार करण्याची संघाची कार्यपद्धतीच नसल्याने त्या बातम्या चघळल्या जात असतानाच, मातोश्रीकडून प्रतिसाद न मिळाल्यानेच भागवत यांनी चार दिवसांपूर्वीच्या त्या वक्तव्यातून शिवसेनेस कानपिचक्या दिल्या असाव्यात अशीही चर्चा सुरू झाली.

या पार्श्वभूमीवर, आता भाजपने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमधील एका गटासोबत सरकार स्थापन केल्यावर संघाची भूमिका कोणती राहील याबाबत समाजात व संघ परिवारातही उत्सुकता असणे साहजिकच होते. समाजमाध्यमांवर सक्रिय असलेल्या संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये या सत्तास्थापनेबाबत उमटलेली पहिली प्रतिक्रिया स्वागताची दिसते. समान सत्तावाटपाच्या हट्टापायी भाजपशी फारकत घेऊन सरकार स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करणाऱ्या शिवसेनेस भाजपने राजकीय धोबीपछाड दिली, हाच आनंद यामागे असल्याचे जाणवते. अजित पवार यांच्या गटाशी हातमिळवणी करताना भाजपने शिवसेनेप्रमाणे आपल्या तत्त्वाशी, विचारसरणीशी किंवा हिंदुत्वाच्या भूमिकेशी तडजोड केली नाही, याचेच समाधान संघ परिवारात दाटलेले आहे. अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देताना कोणत्या अटी घातल्या, भाजपने त्यांच्याशी कोणत्या मुद्दय़ांबाबत तडजोड केली या गोष्टी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. याच अजित पवार यांच्यावरील आरोपांच्या बैलगाडय़ा भरून पुराव्यांची भाजपने मिरवणूक काढली होती. त्यांच्याशीच आता हातमिळवणी केल्याने संघ परिवारात या ‘आतल्या गोष्टीं’ची उत्सुकता आहे. मात्र, सामाजिक, राष्ट्रहिताच्या आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर जे जे सोबत असतील, त्यांना संघाचा पाठिंबाच असेल, असे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनीच स्पष्ट केलेले असल्याने, आताची सत्तास्थापनेची तडजोड करताना भाजपने त्या बाबींचा गांभीर्याने विचार केला असेल, असाच संघ परिवारातील कार्यकर्त्यांचा समज आहे.