21 November 2017

News Flash

‘केस’ गंभीर आहे..

भूत येऊन महिलांचे केस कापते यासारख्या अफवा पसरतात अन् तिच्यावर अनेकांचा विश्वासही बसतो

लोकसत्ता टीम | Updated: August 19, 2017 2:33 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भूत येऊन महिलांचे केस कापते यासारख्या अफवा पसरतात अन् तिच्यावर अनेकांचा विश्वासही बसतो हे अधिक क्लेशदायक आहे..

विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘हेन्री फोर्थ’ या नाटकात एक पात्र आहे. व्यक्ती नाही ती. ते रूप आहे एका गोष्टीचे. ती म्हणजे अफवा. ‘माझ्याकडे कान द्या. अफवा बोलू लागल्यावर कान देणार नाही, असा कोण महाभाग येथे असू शकेल?’ असा प्रश्न करणारे हे ‘रूमर’ नावाचे पात्र रंगभूमीवर अवतरते तेच जिभाच जिभा चितारलेले वस्त्र लेवून. त्या शेक्सपिअरच्या काळातील अफवा. त्यांना किती जिभा असणार आणि असून असून त्या किती लांब असणार? आज मात्र या अफवेच्या जिभेला ना अंतराची मर्यादा आहे, ना वेगाची. विषयांच्या मर्यादेत तर अफवा कधीच अडकलेल्या नव्हत्या. आताही देशामध्ये सर्वात वेगाने पसरत असलेली आणि आधीच अभाव आणि भय यांनी ग्रासलेल्या समाजात खोल भयगंड निर्माण करीत असलेली ताजी अफवा आहे ती भूत-भानामती आणि करणीच्या अंगाने जाणारी. गंमत म्हणजे एकाच वेळी ती भुताची अफवा आहे आणि त्याच वेळी ती ‘जैविक युद्धा’चे संकेतही देत आहे. ही अफवा आहे केस कापण्याची. उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, झारखंड आणि अगदी आपल्या प्रगतिशील सुशिक्षित महाराष्ट्रातही ती पसरलेली आहे. या भागांतील अनेक महिलांचे म्हणे आपोआप केस कापले जात आहेत. एका महिलेनुसार तिच्या घरात रात्री सगळे झोपलेले असताना खिडकीतून उडी मारून एक काळी मांजर आली. पाहता पाहता तिने माणसाचे रूप घेतले. ते भयानक दृश्य पाहून ती महिला बेशुद्ध पडली. त्या व्यक्तीने किंवा त्या भुताने त्या महिलेच्या केसांची वेणी कापून टाकली. हे रूप बदलणारे काळे मांजर इतर कोणाला दिसले की काय ते समजलेले नाही. काहींच्या मते हे चेटूक वगैरे नसून, त्यामागे चीनने सोडलेल्या विशिष्ट किडय़ांचा हात आहे. ते किडे केस खातात. सर्वसाधारण विचार करणारी कोणतीही व्यक्ती या सर्व गोष्टींची हास्यास्पद म्हणूनच नव्हे, तर तद्दन मूर्खपणाच्या म्हणून वासलात लावील. तो मूर्खपणा आहेच. परंतु तो त्या महिलांचा मूर्खपणा नाही, कारण त्या आजारी आहेत. हे नीट समजून घेतल्याशिवाय या अफवा प्रकरणातील खरे गांभीर्य आपल्या लक्षात येणार नाही.

हा केस कापले जाण्याचा प्रकार हा भूत-भानामतीच्या, करणीच्या वगैरे अंगाने जाणारा आहे. मुळात भूत, भानामती हाच सगळा बोगस प्रकार आहे. त्यामागे असतो तो केवळ मानवी हात. आताही ज्या केस कापले जाण्याच्या घटना घडत आहेत, त्यामागेही अन्य कोणतेही गूढ घटक कार्यरत नाहीत. राजस्थानातील गोविंदगढ आणि कालाडेरा या दोन खेडय़ांत अशा तीन घटना घडल्या. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यात त्या महिलांनीच आपले केस कापून टाकले होते, हे स्पष्ट झाले. या महिला असे करतात याचे कारण त्यांच्या मनातील अंधश्रद्धेमध्ये जेवढे आहे, तेवढेच त्यांच्यातील मानसिक आजारामध्ये आहे. कौटुंबिक गुलामगिरीपासून मनातील न्यूनगंडांपर्यंत अनेक कारणे त्या आजारास कारणीभूत असतात. याबाबतच्या सामाजिक जाणिवेचा अभाव ही खरी शोकांतिका आहे.. त्या महिलांचीही आणि आपल्या समाजाचीही. सध्या उत्तर भारतातील अनेक गावखेडय़ांमध्ये भीतीचे वातावरण आहे, की कोणत्याही क्षणी ते केस कापणारे भूत येईल. या भयाने लोक टोळ्या करून रात्रीची गस्त घालत आहेत. कोणाकडे तीच व्यक्ती चेटूक करते म्हणून संशयाने पाहिले जात आहे. आणि या सगळ्या धामधुमीत देवर्षी किंवा राजस्थानातील भोपा वगैरे मंडळी मालामाल होत आहेत. म्हणजे हे तिहेरी नुकसान आहे. त्या कुटुंबाचे यातून आर्थिक शोषण होते. त्या केस कापल्या गेलेल्या महिलेला नंतर नेले जाते ते एखाद्या भोंदूबाबाकडे. त्यात तिचे आरोग्यविषयक नुकसान होते आणि अशा घटनांतून समाजाचा भयगंड वाढतच जातो. हे काही याच प्रकरणात घडते आहे असे नाही. मंगळयान पाठविणाऱ्या आपल्या या देशात यापूर्वीही ते घडलेले आहे. एक भेदरलेला, अंधश्रद्धाळू समाज हीसुद्धा आपलीच एक ओळख आहे. यात खेदाची बाब अशी की ही ओळख पुसण्याचा पुसटसा प्रयत्नही आपण यशस्वी होऊ देत नाही. तसे केल्यास आपापल्या धर्मावर घाला येईल असा आपला समज असतो. खरी ‘भानामती’ असेल तर ती ही आहे. अशी ‘अंधश्रद्धेची करणी’ आपल्या समाजावर झाली नसती, तर या अशा अंधश्रद्धाळू अफवा उठण्याची काय बिशाद होती? परंतु त्या उठतात आणि पसरतात. फरक एवढाच आहे, की पूर्वी त्या कानोकानी पसरत असत. आज हातोहाती पसरतात. मोबाइलमधील संदेशपीठे हे आजचे त्याचे साधन आहे. त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप.

जगभरात आणि त्यातही प्रामुख्याने तिसऱ्या जगात अफवा आणि असत्यवृत्ते पसरविणारे आजचे सर्वात प्रभावी माध्यम कोणते असेल, तर ते व्हॉट्सअ‍ॅप. मोबाइल इंटरनेटची कमी दरातील उपलब्धता यामुळे कोटय़वधी लोकांच्या हाती हे संदेशपीठ आले आहे. त्यातून संदेशांचे चलनवलन होते ते व्यक्ती ते व्यक्ती आणि व्यक्ती ते गट अशा पद्धतीने. ते नक्कीच एक उपयुक्त साधन आहे. परंतु या उपयुक्ततेमध्येच त्याची उपद्रवक्षमताही दडलेली आहे. याचे कारण प्रचाराचे साधन म्हणून ते अत्यंत बेजबाबदार आहे. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. अन्य प्रसारमाध्यमांमध्ये अंगभूत नियंत्रणे असतात. त्यांच्यात किमान जबाबदारीची जाणीव असते आणि शासनयंत्रणेला वेळप्रसंगी ती जबाबदारी निश्चितही करता येते. मोबाइलवरील संदेशपीठांचे तसे नसल्याने ती बेलगाम सुटलेली आहेत. बदनामीची, असत्य प्रचाराची, खोटय़ा बातम्या पसरविण्याची ती केंद्रे झाली आहेत. अनेकदा तो मजकूर चुकीचा, खोटा, खोडसाळ आहे याची जाणीवही व्हॉट्सअ‍ॅपवरून तो पुढे पाठविणाराला नसते. आपण कोणा समाजकंटकांचे ‘फॉरवर्डिग एजंट’ म्हणून काम करीत असतो हेही त्यांच्या गावी नसते. ते बिचारे, ‘ही माहिती मलाच आधी समजली, आता मी ती इतरांना पाठवून त्यांना शहाणे करतो,’ या भाबडय़ा भावनेने वागत असतात. त्यांच्याकडे आलेल्या संदेशांत तर अनेकदा तशी आज्ञावलीच दिलेली असते. त्या आज्ञा कधी, ‘खरे अमुकतमुक असाल, तर हा संदेश इतरांनाही पाठवा,’ अशा अस्मितेला भडकावणाऱ्या असतात, तर कधी ‘आपल्या प्रियजनांची काळजी असेल तर पुढे पाठवा,’ अशा भावनेला हात घालणाऱ्या असतात. सामान्यजन वाहून जातात त्यात. चालू केशकर्तन भानामतीच्या अफवा देशभर पसरल्या त्या अशा प्रकारे व्हॉट्सअ‍ॅपवरूनच. या प्रकरणातील खरा चिंताजनक भाग आहे तो हा. मुले पळविणारी टोळी आली आहे, असे संदेश व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरतात आणि त्यातून काही लोकांचा बळी जातो. मीठ संपल्याची अफवा पसरते आणि दुकानांसमोर रांगा लागतात. या घटना एकीकडे आणि दंगलींच्या वा आपत्तीच्या काळात व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरविले जाणारे द्वेषजनक संदेश आणि छायाचित्रे एकीकडे असे हे भयाण चित्र आज आपल्यासमोर आहे.

या केशकर्तनी भानामतीमधून आपल्यासमोर ही दोन संकटे एकाच वेळी अधोरेखित झालेली असून त्यावरून ‘केस’ किती गंभीर आहे हे दिसते. त्यातील एक संकट आहे ते समाजातील अंधश्रद्धाळूपणाचे, मनोविकारांबाबतच्या अज्ञानाचे आणि दुसरे आहे मोबाइली संदेशपीठांवरून पसरविल्या जात असलेल्या अफवांचे, ‘फेकन्यूज’चे. त्यांचा मुकाबला करण्यात आपण कसूर केली तर केसच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या सारासार विचारबुद्धी-कर्तनाच्या घटना घडू लागतील. आणि ती ‘भानामती’ नसेल.

First Published on August 19, 2017 2:33 am

Web Title: womens hair being chopped off in sleep