सुमारे ३० वर्षांपूर्वी पुणेस्थित आमच्या ‘ज्ञानदेवी’ या स्वयंसेवी संस्थेने पुण्यातील विविध वस्त्यांमधून स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने समाजविकास प्रकल्प सुरू केला. या प्रवासाच्या वाटेवर असं लक्षात आलं की सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या समाजात मुलांच्या गरजांकडे लक्ष देण्याची विशेष जरुरी आहे.

मुलं शाळेत जातच नाहीत. गेली तरी का जातात, काय शिकतात किंबहुना कशासाठी शाळेत जायचं याची ना मुलांना जाण आहे ना बहुतांशी पालकांना. मुलांच्या गरजा शोधताना लक्षात आलं की शाळेतील अभ्यास समजत नाही. आवडत तर मुळीच नाही. शाळा न आवडण्याची अनेक कारणं आहेत. पण याहीपेक्षा मोठं कारण, मुलांशी बोलताना व पालकांना समजून घेताना लक्षात आलं ते अधिक भयावह होतं. वस्तीतील पालकांचं स्वत:बद्दल आम्ही कमी आहोत, आमचं कधीच भलं होणार नाही हे आमचं कर्मच आहे. ही भावना न्यूनगंड स्वरूपात पिढी-दरपिढी मुलांमध्ये परंपरागत जात असलेली दिसत होती. काही भलं होणारच नाही आहे, तर कष्ट कराच कशाला? ही पळवाटसुद्धा पारंपरिक रूप घेताना दिसत होती. यामुळे मुलांमध्ये स्वाभाविकच अस्मिता नसणं, आत्मविश्वासाचा अभाव व आयुष्याबाबत कोणतीही महत्त्वाकांक्षा नसणं, दिसून येत होतं. मुलांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी हे घातक तर आहेच, पण देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने फारच भीषण आहे. यावर काही उपाय शोधता येईल का? असा विचार स्वाभाविक मनात आला. मुलांची व्यथा जाणवली तरी एक छोटीशी नवीन उदयास येणारी संस्था काय करणार असंही वाटून गेलं. जिद्द होती, इच्छा होती, म्हणून मुलांशीच बोलून काय करता येईल याची योजना आखली. पुढील प्रवासात मुलांचं मार्गदर्शन जे मोठं नेहमीच नाकारत आले- तेच सातत्याने ‘ज्ञानदेवी’स दिशादर्शक ठरत गेले.

मुलांमधील न्यूनगंड दूर करून त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करणं हे संस्थेने उपायस्वरूप सुरू केलेल्या ‘गंमत शाळा’ या उपक्रमातून ४६ महिन्यांतच साध्य झालं व ३० वर्ष हे यश अव्याहतपणे मिळत आहे. पण त्यातील खरी मेख, यशाचं रहस्य निदर्शनास आणलं तेही एका छोटय़ा मुलाने. वस्तीने ओवाळून टाकलेला पण ‘ज्ञानदेवी’ने जिद्दीने सुधारायचं व्रत घेतलेल्या एका १० वर्षांच्या मुलाने सांगितलं, ज्ञानदेवीचे कार्यकत्रे नियमितपणे त्यांच्या वस्तीत येतात. त्यांचं ऐकतात व ‘ऐकून ऐकतात’. तर दुसऱ्या बालगुन्हेगाराच्या मते हे लोक आमचं ऐकून ऐकतात व तेही मायेने.

मुलांचं ऐकायला आज कुणालाच वेळ नाही. जगण्याच्या धडपडीमध्ये आपणच हौसेने जन्माला घातलेल्या मुलांकडे संपूर्ण दुर्लक्ष तर होतं. पण घरादारातला राग, सर्व वैफल्यं बाहेर काढायला मुलं ही एक सोयीस्कर पंचिंग बॅग झालेली दिसून येते. ही गोष्ट कोणत्याही अशिक्षित, वंचित समाजापुरती मर्यादित नाही तर सर्वदूर समाजात दिसून येते. म्हणजे मुलांना खूप काही सांगायचंय, बोलायचंय, पण आम्हाला साधं ऐकायला वेळ नाही. ‘ऐकून ऐकायला’ – म्हणजेच लक्षपूर्वक ऐकायला तर अजिबातच नाही. माया नाही असं नाही पण ती दर्शवायला वेळ नाही. काही तरी भेट आणून, कधी तरी लाड करून पालक भरपाई करू पाहतात. पण मुलांना ते नको आहे. रोजचा वेळ हवा आहे. पाच मिनिटं चालतील पण तो वेळ फक्त त्यांचाच असायला हवा आहे. आधीच कोणी ऐकत नाही. त्यातून मग सांगायचं तरी कशाला? अशी भावना निर्माण होणं स्वाभाविक आहे.

मुलांना कशाची तरी भीती वाटत असते. कुणी तरी त्रास देत असते, करिअरबद्दल चर्चा करायची असते, वयात येतानाचे, शारीरिक बदल कळत नसतात, कौटुंबिक कलहामुळे आलेला ताण असतो. हे सर्व सांगायचं कुणाला, विचारायचं कुणाला, बोलायचं कुणापाशी यातून मग पळवाटा, धोक्याचे रस्ते इत्यादींवर प्रवास सुरू होतो. मुलं घर सोडून पळून जातात. बाहेर सापळे लावून असामाजिक तत्त्वं तयारच असतात. आत्महत्या करतात, चुकीच्या मित्रांचा सल्ला घेऊन भलतंच काही करून आयुष्य उद्ध्वस्त करतात. व्यसनांचेही मोह असतात.

‘ज्ञानदेवी’सारखी एखादी संस्था काही मुलांपर्यंत पोहचू शकते. पण इतर मुलांचं काय? शिवाय एखाद्या संस्थेचे कार्यकत्रे ठरावीक काळच मुलांबरोबर असू शकतात. मुलांना प्रश्न काही वेळ विचारून पडत नाहीत. याचीही जाणीव गंमत शाळेतील काही मुलांनी सुमारे २५-२६ वर्षांपूर्वी करून दिली. ज्या काळात घरोघरी फोन नव्हते. मोबाइलचा उदयही झाला नव्हता, अशा काळात वेळी-अवेळी संभ्रमात, तातडीची मदत हवी असलेली मुलं आम्हाला फोन करत. या मुलांचा प्राथमिक अभ्यास सुरू केला. त्यांच्या प्रश्नांनाही समजून घेतलं तेव्हा लक्षात आलं की तातडीच्या फोनसेवेची मुलांना खरंच खूप गरज आहे. ऐकायला कोणी नाही तर मदत तरी कशी मागावी? याच विचारातून हेल्पलाइनची कल्पना मनात आली. योगायोगाने त्याच सुमारास मुळात मुंबईत एक संस्थात्मक प्रकल्प म्हणून रस्त्यावरच्या मुलांसाठी सुरू झालेल्या ‘चाइल्डलाइन’ या हेल्पलाइनचा विस्तार करण्यासाठी चाचपणी चालू असताना ‘ज्ञानदेवी’ने तो पुण्यात चालवावा, अशी मागणी त्यांच्याकडून आली. ‘चाइल्डलाइन’ ही लवकरच स्वरूप बदलत भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयातर्फे पुरस्कृत अशी देशव्यापी योजना झाली. आजमितीस सुमारे ७८० शहरांमधून भारतभर ‘चाइल्डलाइन’द्वारे अडचणीत सापडलेल्या मुलांना तातडीची मदत पुरविली जाते. पुण्यामध्ये २००१ मध्ये ‘ज्ञानदेवी’तर्फे ‘चाइल्डलाइन’ कार्यान्वित झाली. तेव्हापासून आजतागायत एकही सुट्टी न घेता ‘ज्ञानदेवी’ ‘चाइल्डलाइन’ मुलांना मदत करीत आहे. २००१ मध्ये महिन्याला सरासरी १००० ते १५०० असणारे फोन, २०१० मध्ये त्याने दरमहा २५ हजार कॉल्सची सरासरी गाठली. यानंतर विभागीय कॉलसेंटरमध्ये ‘चाइल्डलाइन’ परावíतत करण्यात आली.

खरंच तुमच्याशी मुलं बोलतात का हो? इतकं मनातलं सांगतात का? असे प्रश्न नेहमीच विचारले जातात. काय बोलतात, कोणत्या समाजातील असतात, हे अन्य प्रश्न. खरंच बोलतात का, तर आमच्याकडे प्रत्येक कॉलचं रेकॉर्ड आहे. आमच्याशी का बोलतात? पालकांशी/शिक्षकांशी का नाही. याचं उत्तर वर आलंच आहे. पालक/शिक्षकांना वेळ नाही. त्यातून तुटलेला संवाद. शिवाय फोनमुळे गुप्तता बाळगता येते. म्हणून खूपदा मित्राचा प्रश्न/मत्रिणीची समस्या म्हणून सल्ला मागितला जातो. अडीच ते तीन वर्षांच्या मुलांपासून ते २१/२२ वर्षांपर्यंत मुलं फोन करतात. आपल्या मनातील खळबळ व्यक्त करताना सल्ले मागतात. आधारही मागतात.

मुलं नेमकं काय बोलतात, काय सांगतायत ते पालक ऐकत नाही आहेत. म्हणूनच या लेखमालेच्या माध्यमातून समाजापुढे आणण्याचा, पालकांपर्यंत पोहोचविण्याचा हा द्राविडी प्राणायाम या लेखमालेच्या माध्यमातून करण्याचा हेतू आहे. २५ हजार मुलांनी चाइल्डलाइनचा दरमहा आधार घ्यावा हे काही चांगलं लक्षण म्हणता येणार नाही.

डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

anuradha1054@gmail.com

chaturang@expressindia.com