News Flash

अधुरी एक कहाणी

मात्र पुढारी म्हटल्यावर मनात उमटणारी आक्रमकता तिच्यात नावालाही नव्हती.

प्रियांकानं सांगितलं की, संयोगिता नेहमीप्रमाणे आनंदी दिसली नाही. उदास वाटली. आमच्यापैकी कुणालाही भेटण्याची उत्सुकता तिनं दाखवली नाही. शेवटी प्रियांकाचा निरोप घेताना संयोगिता म्हणाली, ‘‘बाईंना सांग, मी लिहीत नाही हल्ली. गेली काही र्वष खूप कठीण होती आमच्या घराची. तेव्हाच लिहिणं थांबलं. आता लिहावंसंच वाटत नाही..’’

तिचं नाव योगिता आणि तिच्या धाकटय़ा भावाचं नाव योगेश. दोघांच्या नावातलं साम्य योगिताला अजिबात रुचायचं नाही. आमच्या घरी यायला लागली आणि गप्पांच्या ओघाओघात तिनं हे मला सांगितलं. मग आम्ही दोघी तिच्या नवीन नामकरणाच्या (खास आमच्या दोघींपुरतं मर्यादित) शोधाला लागलो. मला सुचलेलं संयोगिता हे नाव योगिताच्या एकदम पसंतीला आलं आणि ती आमच्या अभ्यास वर्गाची संयोगिता झाली. जणू खरीखुरी राणी. बॉर्न लीडर!
मात्र पुढारी म्हटल्यावर मनात उमटणारी आक्रमकता तिच्यात नावालाही नव्हती. अतिशय सौम्य व्यक्तिमत्त्व होतं तिचं. खूप उंच, धिप्पाड देहयष्टी, सावळा रंग, दोन्ही कानांवर अतिशय निगुतीनं घातलेल्या वेण्या, सुंदर हसरी मुद्रा, देखणे भाव अशी संयोगिता मनात भरायची आणि चित्तात ठसायची. संयोगिताचा आणि माझा परिचय झाला तो एका महानगरपालिकेच्या शाळेच्या माध्यमातून. त्या वेळी मी मुंबईत राहात होते आणि जवळच्या पालिकेच्या एका शाळेत गोष्टी सांगायला जात होते. एका तिमाही सत्रात दर आठवडय़ाला फक्त रवींद्रनाथ टागोरांच्या गोष्टी सांगायचं ठरलं. सगळ्याच मुलांना गोष्टी ऐकायला आवडायच्या. आम्ही परत यावं याचा आग्रह व्हायचा; पण त्यातही योगिताचं ऐकणं वेगळं, अगदी खास होतं. तिचे पिंगट, तपकिरी तेजस्वी डोळे रोखून, हातावर हनुवटी ठेवून गोष्ट ऐकण्यात तल्लीन झालेली तिची मूर्ती बघताना आनंद व्हायचा. असे काही महिने गेले आणि योगिता तिच्या भावाचं बोट धरून आमच्या घरी अभ्यासाला यायला लागली.
त्या वेळी आविष्कार निर्मित ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकाचे मुंबईतल्या छबिलदास शाळेच्या छोटय़ा नाटय़गृहात मोठय़ा दिमाखाने प्रयोगावर प्रयोग होत होते. पंचाहत्तर बाल कलाकारांनी सादर केलेला तो नाटय़ सोहळा खरोखर डोळ्यांचं पारणं फेडणारा होता. सुलभा देशपांडे, अरुण काकडे, माधव साखरदांडे यांच्याशी स्नेह असल्यानं मला मुलांना नाटकाला घेऊन येण्याची (पुन:पुन्हा) मुभा होती. तिकिटाचे दर अत्यल्प असूनही आमची गँग पाहिली, की कित्येकदा आमची थिएटरमध्ये ‘फ्री एंट्री’ होत असे. प्रौढपणाचं ‘बेअिरग’ सांभाळत संयोगिता बरोबरीच्या लहान मुलांना घेऊन एका कोपऱ्यात बसायची आणि तत्क्षणी प्रवाही कथानकात हरवून जायची. माझं तिच्याकडे लक्ष असायचं. एकदाही असं वाटायचं नाही की, हे नाटक संयोगितानं आधी पाहिलं आहे. एकदा-दोनदा नव्हे, अनेकदा पाहिलं आहे. लवकरच नाटकातले सारे संवाद, गाणी तोंडपाठ झाली होती तिची. दररोज सकाळी आमचा अभ्यास वर्ग सुरू झाला की, एखादं गाणं, एखादा संवाद यांची पुनरावृत्ती व्हायची.
असे काही महिने गेले आणि एक दिवस संयोगिता आपली वही घेऊन माझ्याकडे आली. हातातली वही छातीपाशी ज्या प्रकारे घट्ट घरली होती, त्यावरूनच हा नेहमीचा निर्जीव गृहपाठ नव्हे, हे समजत होतं. तिनं हळूच ती वही माझ्या हातात ठेवली आणि ‘नंतर वाचून बघा’ असं हळूच माझ्या कानात सांगून ती आपल्या जागेवर जाऊन बसली. अर्थात नेहमीप्रमाणे कोपऱ्यात, जिथून तिला सगळी मुलं दिसत होती. खरा सुसंस्कृत नेता कसा, शांतपणे आरडाओरडा न करता एका कोपऱ्यात बसतो, पण लक्ष असतं त्याचं सर्वावर अगदी तशी सुसंस्कृत! खरंच सुसंस्कृत हा एकच शब्द संयोगिताच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाला चपखल बसायचा. त्या दिवशी आमचा वर्ग संपला. मुलांना दुपारच्या शाळेत जायचं असल्यानं ती पांगली आणि मी अर्थातच संयोगिताचं नाटक वाचलं. मस्त लिहिलं होतं नाटक. गाणी, प्रसंग, घटना, संवाद यांनी ते नाटक भरगच्च झालं होतं. शिवाय त्या नाटकाच्या कथावस्तूला किंचितशी विनोदाची झालर होती. सातवीतल्या योगितानं आमच्या छोटय़ा स्नेहसंमेलनाला दिलेली ती भेटच होती.
आम्ही संयोगितानं लिहिलेलं नाटक बसवलं. अभ्यास वर्गाला येणाऱ्या सर्व मुलांना भूमिका मिळाल्या. भूमिकेला ठाम नकार दिला तो एकटय़ा संयोगितानं. ‘मला नाटक लिहायला येतं, करायला येत नाही’ असं ठामपणे सांगितलं तिनं. शेवटी राजाच्या मागे मूकपणे उभ्या राहणाऱ्या भालदाराची भूमिका संयोगितानं केली आणि तिच्या उंचपुऱ्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसली ती. या नाटकाचा प्रयोग आम्ही एका छोटेखानी हॉलमध्ये केला होता व त्या प्रयोगाला संयोगिताच्याच नव्हे तर अभ्यास वर्गाला येणाऱ्या सर्व मुलांच्या पालकांना बोलावलं होतं. त्याशिवायही काही लोक प्रेमानं मुलांचं नाटक बघायला आले होते. मुलांनी नाटय़प्रयोग छान सादर केला. आलेल्या सर्वानी मुलांचं कौतुक केलं. पालकही खूश दिसत होते. योगिताचे आईवडील मात्र अस्वस्थ दिसत होते. ते कार्यक्रमानंतर फारसे थांबले नाहीत. उलट संयोगिताला निघण्याची घाई केली त्यांनी. संयोगिता मागे रेंगाळत होती. आसपास निघत असलेले स्तुतीचे उद्गार तिला ऐकायचे होते, मैत्रिणींसमवेत रमायचं होतं, पण आईवडिलांची नापसंती तिच्यापर्यंत पोहोचली आणि ती घरी गेली.
दुसरे दिवशी संयोगिता येईल की नाही अभ्यास वर्गाला याची आशंका मला वाटत होती. कालची तिच्या पालकांची नाराजी कशाबद्दल होती ते नेमकं कळलं नसलं तरी मनात शंकेची पाल चुकचुकत होती; पण संयोगिता नेहमीप्रमाणे वर्गाला आमच्या घरी आली. मग वर्ग नेहमीप्रमाणे सुरू झाला. अर्धा तास झाला असेल नसेल संयोगिताची आई अचानक आली. तिचा चेहरा गंभीर दिसत होता. मुलांचा अभ्यास होईपर्यंत ती शांतपणे बसून राहिली. बाराच्या सुमारास बाकीची मुलं गेली, पाठी राहिली ती ही मायलेकरं. संयोगिताच्या आईनं स्पष्ट शब्दांत आपली नाराजी माझ्यापर्यंत पोहोचवली. तिच्या म्हणण्यानुसार त्यांची मुलगी अभ्यासासाठी इथं येत होती, नाटकं लिहिण्यासाठी वा करण्यासाठी नव्हे. मी आईशी बोलत होते तोपर्यंत संयोगिताचे वडीलही तिथं येऊन ठेपले. त्यांच्या म्हणण्यानुसार एवढय़ा गरीब परिस्थितीतल्या मुलांनी नुसतंच शिक्षण एके शिक्षण केलं पाहिजे. नाटकं, सिनेमा, कथा, कादंबऱ्या ही सगळी श्रीमंतांची थेरं असतात. गरिबांना परवडत नाहीत ती.
मी अवाक् होऊन किती तरी वेळ त्यांचं बोलणं समजावून घेत राहिले. मग माझ्या परीनं त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. संयोगिता जे करत होती तो अभ्यासच आहे, हे मी त्यांना परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. संयोगिताच्या आईवडिलांची समजूत पटली नाही. संयोगिताचं आमच्याकडे येणं थांबलं. दोन-तीन वर्षांचा सहवास अशा प्रकारे संपुष्टात आला. पुढे संयोगिताच्या शालान्त परीक्षेपर्यंत मी तिच्या शाळेत जात राहिले, तिला भेटत राहिले. प्रत्येक भेटीत मी तिची समजूत घालण्याऐवजी संयोगिताच माझी समजूत घालत राहिली. तिचं म्हणणं होतं की, घरी येणं थांबलं म्हणून काय झालं? तिचं येणं बंद करू शकतात तिचे आईवडील, लिहिणं तर नाही थांबवू शकत. त्या दोन वर्षांत संयोगितानं खूप लिहिलं. ती नाटकं लिहायची, कविता लिहायची, कथाही तिच्या लेखणीतून उतरायच्या. तिचं लिखाण वाङ्मयीन निकषांवर कसदार होतं की नाही ते नाही मला आता आठवत, पण लिहिणं ही तिच्या अंतरीची गरज होती. तिच्या लिखाणातला शब्द आणि शब्द अंत:करणापासून आला होता, एवढं मात्र नक्कीच आठवतंय.
शालान्त परीक्षेनंतर संयोगिताचा आणि माझा संपर्क सुटला. मधे खूप र्वष गेली. संयोगिता भेटली नाही. मग एकदा प्रियांका नावाच्या आमच्याच वर्गातल्या जुन्या मैत्रिणीला भेटली. संयोगिता पदवीधर झाली होती. ती नोकरीही करत होती. प्रियांकानं सांगितलं की, संयोगिता नेहमीप्रमाणे आनंदी दिसली नाही. उदास वाटली. आमच्यापैकी कुणालाही भेटण्याची उत्सुकता तिनं दाखवली नाही. शेवटी प्रियांकाचा निरोप घेताना संयोगिता म्हणाली, ‘‘बाईंना (मला) सांग, मी लिहीत नाही हल्ली. गेली काही र्वष खूप कठीण होती आमच्या घराची. तेव्हाच लिहिणं थांबलं. आता लिहावंसंच वाटत नाही.’’ एवढंच बोलली आणि प्रियांकाचा निरोप घेऊन निघून गेली. त्यानंतर संयोगिता भेटलीच नाही.
‘कथालेखक’ तपन आणि ‘नाटककार’ संयोगिता या दोन्ही मुलांचा सहवास दीर्घ काळाचा नव्हता; पण दोन्ही मुलं मनात घर करून बसली ती त्यांच्या लिहिण्याच्या वेडानं. आजही एखाद्या संध्याकाळी एकटीच असले, की या दोघांची हटकून आठवण येते. वाटतं, कुठं असतील ही दोन मुलं? काय करत असतील? मग मनात येतं, कुठंही असोत. लिहिती राहोत म्हणजे झालं.
eklavyatrust@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2016 1:25 am

Web Title: stories of orphan and poor society childrens in india
टॅग : Orphan,Stories
Next Stories
1 कथालेखक तपन
2 प्रकाशाची तिरीप
3 क्रेडिट कार्डाची किमया
Just Now!
X