‘अब्दुल्लाशाही’च्या वर्चस्वातून जम्मू-काश्मीरला मुक्त करून खोऱ्यात एक समर्थ राजकीय पर्याय उभा करणारा प्रखर राष्ट्रवादी नेता म्हणून दिवंगत मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या स्मृतींना सर्वपक्षीय राजनेत्यांकडून उजाळा दिला जात आहे. त्यांच्याविषयीचा हा आदरभाव केवळ दिवंगताविषयी वाईट बोलू नये एवढय़ा शिष्टसंमत संकेतातून उद्भवलेला नाही. एकीकडे फुटीरतावादाच्या भस्मासुराने काश्मीर खोऱ्याला वेढलेले असताना, ‘कश्मीरियत’ आणि पर्यायाने दहशतवाद या दोहोंना कुरवाळण्याची रीत शेख अब्दुल्ला यांच्या घराण्यातील तिन्ही नेत्यांनी राखली. तसे करण्याऐवजी तिरंगा खांद्यावर घेत संकटांना आव्हाने देणारा नेता म्हणून गेल्या ५० वर्षांच्या काश्मीरच्या इतिहासात मुफ्ती मोहम्मद सैद यांचे नाव निश्चितच वरच्या रांगेत असेल. काश्मीरच्या स्वर्गतुल्य खोऱ्यावर सदैव रक्तपाताचे सावट राहिले असताना, राज्यकर्त्यांनी बोटचेपे धोरण स्वीकारू नये यासाठी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावून सईद यांनी काँग्रेसच्या व अब्दुल्ला घराण्याच्या प्रस्थापितांना आव्हाने देऊन स्वत:चे नेतृत्व सिद्ध केले.  राज्याच्या विकासातूनच काश्मिरी अशांततेला उत्तर दिले जाऊ शकते याची जाणीव ठेवून प्रसंगी कठोरपणाने विरोधाला सामोरे जाण्याचे धैर्य दाखविणाऱ्या मुफ्ती मोहम्मद यांनी पाकिस्तानशी सौहार्दाचे संबंध असावेत, या भूमिकेचा सातत्याने पाठपुरावा केला; पण त्याच वेळी काश्मीरमधील फुटीरतावादाला वठणीवर आणण्यासाठी कठोर पावले उचलतच आपले राजकीय बस्तान बसविले. भ्रष्टाचार, गरिबी, बेरोजगारी आणि शिक्षणाचा अभाव ही देशातील जवळपास सर्वच राज्यांची समस्या जम्मू-काश्मीरमध्येही फोफावलेली आहे. अशा समस्याग्रस्त समाजाच्या वैफल्याचा फायदा उठवूनच तेथे फुटीरतावादी चळवळी मूळ धरतात आणि त्यातूनच राजकीय अस्थिरता निर्माण होते हे ओळखून त्यावर कठोर उपाय योजण्याची इच्छाशक्ती मुफ्ती मोहम्मद यांच्या नेतृत्वाने दाखविली. त्यापूर्वीच्या सरकारांनी, धगधगत्या खोऱ्यातील परिस्थितीवर काबू राखण्यासाठी केवळ सैन्यबळ पुरेसे नाही, तर समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे हे ओळखून लष्कराच्या बेलगामपणाला समंजसपणे आळा घालण्याच्या प्रयोगांची सुरुवात केली होती. हीच परिस्थिती आणखी अनुकूल करण्यासाठी समाज आणि सत्ता यांच्यात संवादाचा धागा गुंफण्याची गरज होती. असा संवाद घडविण्याची सुप्त इच्छा त्यांच्या नेतृत्वात दडलेली होती. पुढे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत त्यांनी या संवादाच्या प्रयत्नांना बळ दिले, ही त्यांची जमेची बाजू. विश्वनाथ प्रतापसिंह यांनी त्यांच्या  सरकारात केंद्रीय गृहमंत्रिपदाची धुरा विश्वासाने मुफ्ती मोहम्मद यांच्यावर सोपविली. काश्मीर ही एक राजकीय समस्या आहे आणि या प्रदेशाच्या भौगोलिक स्थानामुळे ती आणखी जटिल बनली आहे, असे लोकनेते जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले होते. अशा समस्या संवेदनशीलतेनेच सोडविता येतात असे त्यांचेही मत होते. मुफ्ती मोहम्मद यांच्या कारकीर्दीची दिशा तीच होती. तोच धागा पकडून काश्मीरचे नेतृत्व सिद्ध करण्याचे आव्हान आता त्यांच्या कन्या मेहबूबा मुफ्ती यांच्यासमोर उभे राहणार आहे.