करोनाच्या प्रादुर्भावामुळे एका ‘सी’विरुद्ध लढताना, दुसऱ्या बहुधा अधिक विध्वंसक ठरू पाहणाऱ्या ‘सी’कडे दुर्लक्ष होत आहे असा तक्रारवजा इशारा अनेक संघटना देऊ लागल्या आहेत. हा दुसरा ‘सी’ म्हणजे अर्थातच ‘क्लायमेट चेंज’ किंवा हवामान बदल. डोनाल्ड ट्रम्प, जाइर बोल्सेनारो यांच्यासारख्या आत्मकेंद्री आणि बेफिकीर राष्ट्रप्रमुखांनी हवामान बदल, तापमानवाढ या मुद्द्यांवर अत्यंत बेजबाबदार भूमिका घेतली. पॅरिस हवामान करारातून अमेरिकेने ट्रम्प यांच्या अमदानीत घेतलेली तात्पुरती माघार किंवा अ‍ॅमेझॉन जंगल जळत असताना बोल्सेनारो यांची विधाने यांचा दाखला देता येईल. हवामान बदलाची चर्चा सातत्याने सुरू आहे, कारण जगभर गेल्या काही आठवड्यात भयचकित करणाऱ्या घटना घडल्या आहेत. शीत कटिबंधात येणाऱ्या कॅनडातील काही भागांमध्ये, तसेच अमेरिकेतही काही राज्यांत उष्णतेची लाट आली. एरवी कधीही ५० अंश सेल्शियस तापमानाचा संबंध कॅनडाशी जोडला जाऊ शकत नव्हता. उष्णतेची लाट हे अमेरिकेत हवामानाशी संबंधित मृत्यूंचे प्रमुख कारण बनले आहे. हजार वर्षांतून एकदाच येणारी ही लाट हवामान बदलाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणामुळे उद्भवू शकत नव्हती, असे तेथील विश्लेषक मानतात. कॅनडात यापूर्वीचे सर्वोच्च तापमान ४५ अंश सेल्शियस नोंदवले गेले होते. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील एका गावात तापमानाने ४९.५ अंश सेल्शियस अशी उच्चांकी पातळी गाठली. अमेरिकेच्या वायव्येकडील वॉशिंग्टन आणि ओरेगॉन राज्यांमध्येही ४० अंशांपेक्षा अधिक तापमान सातत्याने नोंदवले जात आहे. उष्णतेच्या लाटेमुळे कोरड्या जंगलांमध्ये वणवे पेटणे हेही दिसून येत आहे. ओरेगॉन राज्याच्या दक्षिणेला पेटलेला वणवा प्रचंड आहे. जवळपास ४ लाख हेक्टर म्हणजे क्षेत्रफळाच्या बाबतीत लॉस एंजलिस शहरापेक्षाही मोठ्या भूभागावर हा वणवा धुमसत होता. अमेरिकेच्या ‘नॅशनल इंटरएजन्सी फायर सेंटर’च्या मते त्या देशात सध्या १३ राज्यांमध्ये ७८ ठिकाणी मोठ्या आगी लागलेल्या आहेत. तिकडे युरोपमध्ये जर्मनी, बेल्जियम, लग्झेंबर्ग आणि हॉलंड यांच्या सीमावर्ती भागात पुराने थैमान घातले असून, सव्वाशेहून अधिक जणांचे प्राण गेले आहेत. हजारांहून अधिक बेघर झाले आहेत. चीनच्या हनान प्रांतात हजार वर्षांमध्ये आला नव्हता इतका प्रलयंकारी पूर आला. त्याच्या विध्वंसाची गणती अजूनही सुरू आहे. ही यादी अजूनही वाढू शकते. भारतात मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये कमी काळात, मर्यादित जागेत होणारी भीषण ढगफुटी हा अभ्यासाचा विषय बनला आहे. कोकणाला एरवीही बसणारे पर्जन्यतडाखे वाढत आहेत. हे सगळे बदल इतके असामान्य आणि अभूतपूर्व आहेत, की त्यांच्याकडे निव्वळ ‘हवामान बदलच की हा’ वगैरे उच्चारून दुर्लक्ष करण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल किंवा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी या प्रशद्ब्राावर गांभीर्याने काही धोरणे आखण्यास सुरुवात केली आहे. हवमान-बदलातून उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे मनुष्यहानी होतेच, शिवाय वित्तहानी होऊन सकल राष्ट्रीय उत्पन्नातही मोठा क्षय होतो. पॅरिस करारानुसार, पृथ्वीची वार्षिक तापमानवाढ २ अंश सेल्शियसपेक्षा कमी व्हावी यासाठी काही उद्दिष्टे ठरवली गेली. तिच्या पूर्ततेवरून प्रगत देश आणि भारत वा चीनसारखे नवप्रगत देश यांच्यात वारंवार वाद उत्पन्न होतात. त्यातही भारतासारख्या देशातील नैसर्गिक आपत्तींना हवामान बदलाइतकीच अंतर्गत अनास्थाही कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. पण अलीकडच्या काळात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा अशा पहिल्या जगातील देशांनाही त्याची झळ पोहोचू लागल्यामुळे हा प्रश्न अधिक व्यापक प्रमाणात चर्चिला जाईल, अशी आशा आहे.