प्रतीकात्मकता हा वैचारिकतेला पर्याय म्हणून सर्वत्रच मान्यता पावत आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली घोषणा. अध्यक्षपदाच्या कामासाठी आपण केवळ एक डॉलर एवढे मासिक मानधन घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. थोडक्यात ते अध्यक्षपदाचे काम फुकटातच करणार आहेत. या घोषणेतून त्यांना दाखवून द्यायचे आहे ते एवढेच की, आपल्यासारखा अब्जावधी डॉलरचे साम्राज्य चालविणारा धनवंत, ज्याच्या एका क्षणाचे मोल काही हजार डॉलर आहे तो पुढची चार वर्षे देशसेवा करणार आणि त्याचा छदामही घेणार नाही, म्हणजे मोठाच त्याग करणार. या एका घोषणेमुळे ट्रम्प यांची प्रतिमा बनली ती त्यागी देशसेवकाची. करचुकवेगिरी करणारा, त्यातून काळा पैसा निर्माण करणारा आणि वर ही करचोरी जाहीरपणे मिरवणारा मनुष्य चार वर्षांत काही हजार डॉलरच्या बदल्यात त्यागी देशभक्त ठरणार असेल, तर त्यांच्यासाठी हा सौदा फारच स्वस्तातला म्हणावा लागेल. खरे तर अमेरिकेच्या अध्यक्षपदावर येण्यासाठीची तुमची योग्यता ही तुमच्या श्रीमंतीवर आणि बडय़ा देणगीदारांकडून तुम्ही किती निधी उभारू शकता यावरच तर अवलंबून असते. क्वचितप्रसंगी तुमच्या हातात असे बडे देणगीदार, उद्योगपती यांची फौज असेल, तर खिशात दमडा नसला तरी चालू शकेल. ती व्यक्ती त्या उद्योगपतींच्या पैशावर सहज सत्तास्थानी जाऊन बसू शकते. हे अमेरिकी राजकीय व्यवस्थेतील नागडे सत्य आहे. हे उद्योगपती काही खिरापत म्हणून तुमच्या प्रचार मोहिमेसाठी पैसे देत नसतात. त्या बदल्यात ते नंतर त्याची दामदुप्पट वसुली करीतच असतात. सत्ताधाऱ्यांना त्यासाठी ज्या तडजोडी कराव्या लागतात त्या झाकून राहिलेल्या बऱ्या. त्याग, देशभक्ती वगैरे भावनांचा दाट पडदा त्याकामी चांगलाच उपयोगी येतो. ट्रम्प पुढच्या काळात हेच पडदे वारंवार वापरणार आहेत. याचे संकेतच त्यांनी या दीडदमडीच्या घोषणेतून दिले आहेत. आपल्यासाठी हा माणूस एवढा राबणार आणि त्या बदल्यात घेणार फक्त एक डॉलर या कौतुकातच ट्रम्प यांचे समर्थक बुडून जाणार यात शंका नाही. आश्चर्य मात्र याचेच की, अमेरिकेसारख्या देशातही अशा प्रकारच्या भंपक प्रतीकात्मकतेला मोल यावे? त्या देशाला त्यागापेक्षा भोगामध्ये अधिक रस असल्याचे आपल्याकडील विश्वगुरुवाद्यांचे नेहमीचे मापन. म्हणजे सवरेदयी विचारांपेक्षा आयन रँड यांचा स्वार्थी ऑब्जेक्टिव्हिजम अधिक मानवणारा. त्या देशाला उपभोगशून्य स्वामीसारखी किंवा विश्वस्तासारखी संकल्पना डोक्यावर घ्यावीशी वाटत असेल, तर भारतीयांसाठी त्याहून अधिक आनंददायी कोणती गोष्ट असू शकेल? आपणांस नेहमीच साधेपणातील सौंदर्याने भुरळ घातलेली आहे. त्यामुळे आपण ब्रँडेड असलो तरी आपला नेता मात्र साधा खादीवालाच असावा असे आपणांस वाटत असते. त्यातून आपली खात्री पटते की, असा साधा, कमी गरजा असणारा, शिवाय लोकांसाठी राबराब राबणारा माणूस पैशाचा घोटाळा करणार नाही. यात आपण एवढेच विसरतो की, सत्तेवर येणाऱ्या प्रत्येकाला संपत्तीतच रस असतो असे नाही. काहींना हे चांगलेच माहीत असते, की संपत्तीपेक्षा र्सवकष सत्ता मोठी असते. त्यासाठी कोणताही त्याग करण्यास त्यांची तयारी असते. आर्थर कोस्लर या विचारवंताने मागेच सांगून ठेवले आहे की, महात्मा आणि हुकूमशहा हे वर्णमालेच्या दोन टोकांवर असले तरी त्यांच्यात फरक असा नसतोच. दोघेही मोठय़ा त्यागास तयारच असतात. दोघांनाही सत्ताच हवी असते. आपणांस त्यातील महात्मा कोणता आणि हुकूमशहा कोणता हे ओळखता आले पाहिजे. ट्रम्प यांच्यासारखे लोक प्रतीकात्मकतेत गुंडाळून आपली ही क्षमताच मारून टाकत असतात. सध्या अमेरिकेतील जनतेवर त्यांनी हाच प्रयोग चालविला आहे.