24 September 2020

News Flash

अग्निपरीक्षेचे अध्वर्यू

अनेक भारतीयांनीच केलेल्या तक्रारींमुळे अखेर ट्विटरला ती प्रतिक्रिया काढून टाकावी लागली.

‘बरे झाले – हिंदुविरोधी ब्याद गेली’ ही प्रतिक्रिया  स्वामी अग्निवेश यांच्या निधनानंतर देण्यात आलेली होती आणि ती देशाच्या केंद्रीय अन्वेषण विभागाचे माजी प्रमुख आणि निवृत्तीनंतरही ट्विटरसारख्या समाजमाध्यमांत स्वत:च्या नावापुढे ‘आयपीएस’ लावणाऱ्या नागेश्वर राव यांची प्रतिक्रिया होती, हे आता भारतीयांना दिसणार नाही. अनेक भारतीयांनीच केलेल्या तक्रारींमुळे अखेर ट्विटरला ती प्रतिक्रिया काढून टाकावी लागली. तोवर ‘सत्ता कुणाची आहे, फायदा काय बोलण्याने होणार आहे, अशा प्रवृत्तीचे लोक सध्या समाजमाध्यमांत आहेत- नागेश्वर राव यांच्या या एका ट्वीटपेक्षा त्यांची प्रवृत्ती अधिक भयावह’ असे मतप्रदर्शन योगेंद्र यादव यांनी केले. हा समाजमाध्यमी खेळही अग्निवेश यांनी टीव्हीवरल्या टापरट ‘बिग बॉस’सारखाच गांभीर्याने पाहिला असता. अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे अखेर एक मानवी मूल्य असल्यामुळे मानवी जिवाची प्रतिष्ठा अभिव्यक्तीने राखायला हवी, एवढेच ते म्हणाले असते. ही ‘मानवी जिवांची प्रतिष्ठा’ म्हणजे काय, हे अग्निवेश यांना उमगल्याचा सज्जड पुरावा म्हणजे त्यांच्या ‘बंधुआ मुक्ती मोर्चा’चे १९८१ पासूनचे काम. ते सुरू झाले, तोवर सक्रिय राजकारण म्हणजे केवळ मंत्री वा लोकप्रतिनिधी होणे नव्हे, अशी खूणगाठ त्यांनी बांधली होती. फरीदाबादच्या दहा मजुरांवरील पोलीस गोळीबारानंतर त्यांनी ‘हरियाणाचे शिक्षणमंत्री’ हे पद सोडले होते. कंत्राटी मजूर, वेठबिगारांसारखे ‘विकत’ घेतले जाणारे मजूर आणि श्रमाच्या प्रमाणात मोबदल्याचा नाकारला जाणारा मानवी हक्क हे वास्तव त्यांना दिसले होते. ‘बंधुआ मुक्ती मोर्चा’ने आजवर पावणेदोन लाख मजुरांना मानवी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.

पण अग्निवेश यांच्या कामाचा हा विधायक पैलू अनेकांसाठी अज्ञातच राहिला. मजुरांसाठी केलेल्या त्या कामामुळे मिळालेले पुरस्कार ही ‘चापलूसी’ वगैरे असल्याची हिणकस टीका करणे काही जणांच्या राजकीय फायद्याचे होते त्यामुळे तशी टीकाही होत राहिली.  सतीप्रथेलाच नव्हे तर राजस्थानात घडलेल्या सतीच्या घटनेलाही विरोध, काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्यांचे मानवी हक्क,  नक्षलवादय़ांशीही चर्चा अशा अप्रिय भूमिका घेण्यामागे काहीएक मूल्यभान असावे लागते.  आर्यसमाजाची सन्यासदीक्षा त्यांनी विशीचा उंबरठा ओलांडताना घेतली, तेव्हापासून ते आर्यसमाजाचे प्रमुख म्हणून अनेक वर्षे केलेल्या कारकीर्दीपर्यंत, स्वामी दयानंद सरस्वती यांनी उभी केलेली ही एक चळवळ आहे आणि आजच्या काळात ही चळवळ पुढे नेण्यासाठी गांधी आणि आंबेडकरांचेही विचार उपयोगी पडणार आहेत, याचे भान अग्निवेश यांना होते. तरुणपणी समाजवादाचे आकर्षणही होतेच आणि तेही इतके की, ‘वैदिक समाजवाद’ असे पुस्तकच त्यांनी लिहिले होते. त्या आदर्शवादाची जागा पुढे देशातील मुख्य धारेचे (मेनस्ट्रीम) म्हणविणारे राजकारण जर चुकत असेल, त्यामुळे समाज आणि लोकजीवन यांवर अनिष्ट परिणाम होणार असेल, तर त्याला विरोध करणाऱ्या काहीशा प्रतिक्रियावादाने घेतली, असे अग्निवेश यांच्या निष्पक्ष राजकीय सक्रियतेचा प्रवास सांगतो. ‘निष्पक्ष’ या शब्दावर काहींचा आक्षेप असेल कारण हे स्वामी तर डावेच होते अशी अनेकांची श्रद्धा आहे. अग्निवेश यांनी प्रतिक्रियावादी राजकारणाकडे ढकलले गेलेल्या अनेक व्यक्ती आणि गटांशी सांधेजोड केली. त्यात भाजपच्या गेल्या सहा वर्षांतील कारकीर्दीबाबत एकही उणा शब्द न काढणारे काही ‘लोकनेते’सुद्धा होते. या लोकनेत्यांपासून दूर गेल्याची किंमत त्यांना हरप्रकारे चुकवावी लागली. दोन वर्षांपूर्वी तर भाजपचे म्हणवणाऱ्या गुंडांकरवी त्यांना मारहाणही झाली. अंगरखा फाटलेल्या, पगडी उडालेल्या स्वामी अग्निवेश यांचे ते रूप हे खरे तर १९७५च्या घोषित आणीबाणीपासून ते नागरिकत्व दुरुस्ती कायद्यापर्यंत त्यांनी केलेल्या राजकारणातून त्यांना काय मिळाले, याचे प्रातिनिधिक चित्रच मानावयास हवे.

ब्राह्मण कुटुंबात आजच्या तेलंगणात जन्म, मामांकडून आजच्या मध्यप्रदेशात सांभाळ, कोलकात्यात वकिलीचे शिक्षण आणि हरियाणा तसेच दिल्लीतून सुरू झालेली, पण देशभरात पसरलेली समाजकार्यातील कारकीर्द असा स्वामी अग्निवेश यांचा प्रवास झाला. श्रमाचे मोल, जीविताची हमी, कायद्याचे संरक्षण आणि धार्मिक, सामाजिक जीवनाचा हक्क ही मानवी मूल्ये या प्रवासात साथ देत राहिली.

मानवी मूल्यांची तसेच राज्यघटनेतील तत्त्वांची अग्निपरीक्षा समाजाने आणि राजकारणाने द्यायलाच हवी, याची आठवण सतत देत राहणारे अध्वर्यू अनेक असतात. त्यांना पुरस्कार मिळाले तरी समाजाकडून त्यांच्या हयातीत मान मिळत नाही. स्वामी अग्निवेश यांच्या निधनामुळे, असा एक महत्त्वाचा अध्वर्यू लोपला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2020 2:25 am

Web Title: former cbi chief nageswara rao tweet on swami agnivesh death zws 70
Next Stories
1 परीक्षातंत्राचे ‘गिऱ्हाईक’!
2 काडीमोडातही विघ्ने!
3 स्वनातीत यश!
Just Now!
X