‘आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील मोठे यश’ असा डिंडिम डोनाल्ड ट्रम्प ज्या मोजक्या घडामोडींबाबत बडवू शकतात, त्यांतील प्रमुख म्हणजे पश्चिम आशियातील शांतता प्रक्रिया. सौदी अरेबिया आणि इस्रायल या दोन देशांशी पूर्वापार चालत आलेले अमेरिकेचे संबंध ट्रम्प यांनी अधिक घट्ट केले. परंतु त्यामागे जी कारणे होती, त्यांचा संबंधित टापूत शाश्वत शांतता किंवा व्यापक जनहिताशी दूरान्वयेही संबंध नव्हता. हे निर्णय केवळ आणि केवळ हितसंबंध सुदृढीकरणासाठी घेतले गेले होते. त्याची गरज जशी मोहम्मद बिन सलमान यांच्या सौदी अरेबियाला होती, तशीच वारंवार निवडणुका घेऊनही बहुमतापासून दूर राहिलेले इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनाही होती. किंबहुना, पश्चिम आशियातील या दोन महत्त्वाच्या नेत्यांसाठी ट्रम्प यांच्यासारखा एककल्ली, अविचारी आणि आत्ममग्न माणूस अमेरिकेच्या अध्यक्षपदावर असणे ही बाब पथ्यावरच पडलेली होती. या तिघांनाही या काळात एका सामायिक शत्रूचा हवाला वारंवार देता येत होता- तो म्हणजे इराण! क्षेत्रीय वर्चस्वासाठी आणि इस्लामिक नेतृत्वासाठी सौदी अरेबियाशी इराणची जुनी दुश्मनी आणि धार्मिक कारणावरून इस्रायलशी हाडवैर. इराणला मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्कार्य बराक ओबामा यांच्या सरकारने केले. त्या बदल्यात त्या देशातील राजवटीची आण्विक धार कमी करण्याचे आश्वासन मिळवले. परंतु त्यांच्यानंतर सत्तेवर आलेले डोनाल्ड ट्रम्प यांना या कशाचीही चाड नव्हती. शत्रू वा मित्र यांविषयीचे त्यांचे नेमके असे धोरण कधीही नव्हते. शिवाय सौदी अरेबियाचे खरे सत्ताधीश राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांचे आणि ट्रम्प यांचे जामात जॅरेड कुश्नर यांचे सलोख्याचे संबंध. त्यांच्या उत्थानासाठी एकीकडे सौदी राजपुत्र, तर दुसरीकडे इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू या दोघांचे सहकार्य ट्रम्प यांनी मागितले आणि दोघांकडून ते आनंदाने मिळालेही. हे चिरंजीव कुश्नरही एखाद्या मुत्सद्यासारखे वावरले आणि इस्रायलमधील शांतता प्रक्रिया किंवा अरब-इस्रायल नवमैत्रीबंधाचे प्रणेते आपणच असे मिरवत राहिले. इस्रायलमधील अंतर्गत शांतता तकलुपी आहे आणि त्यात पॅलेस्टिनींच्या मताला काडीचीही किंमत दिली गेलेली नाही. याच विषयावरून मागे बराक ओबामांनी नेतान्याहू सरकारला धारेवर धरले होते. त्या वेळी बायडेन हे उपाध्यक्ष होते! त्यामुळे ते अध्यक्षपदावर विराजमान होणार हे स्पष्ट झाल्यानंतर नेतान्याहू यांनाही काही मुद्दय़ांवर माघार घ्यावी लागणार हे उघड आहे. प्रखर इराणविरोध, पॅलेस्टिनींची मुस्कटदाबी ही धोरणे ट्रम्प यांच्यासमोर खपून गेली, पण बायडेन यांतले काहीही सहज ऐकून घेणार नाहीत. कारण इराणला पुन्हा एकदा करारबद्ध करून घेण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. हीच बाब सौदी अरेबियाच्या बाबतीतही लागू होते. तेलदांडग्या रिपब्लिकन नेत्यांप्रमाणे सौदी अरेबियाच्या कुरापतींकडे डोळेझाक करून त्यांच्या मैत्रीचे फायदे पदरात पाडून घेण्याची गरज डेमोकॅट्र्सना कधी वाटली नाही. सौदी राजपुत्र मोहम्मद बिन सलमान हे पुरेपूर जाणतात. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चे स्तंभलेखक जमाल खाशोगी यांची नृशंस हत्या सौदी राजपुत्राच्या निर्देशानुरूपच झाली हे बायडेन ओळखून आहेत. येमेनमधील अराजकवादी हल्ले, तुर्कस्तानशी व्यापारयुद्ध, रशियाशी तेलदर वाद अशी अनेक दु:साहसे मोहम्मद बिन सलमान यांनी ट्रम्प यांच्या कृपाछत्राखाली केली. पण अलीकडेच कतारशी जुळवून घेण्याची कृती किंवा तेल उत्पादन घटवण्याची कृती हे वारे बदलल्याचे लक्षण मानावे लागेल. कारण संघर्षवादी भूमिका सोडून सलोख्याची भूमिका दर्शविणारे सौदी अरेबियाचे हे निर्णय अचानक घेतले गेलेले नाहीत. ट्रम्प जाऊन बायडेन येतायेता झालेला हा थेट परिणाम आहे.