20 April 2019

News Flash

मनांवरून रणगाडे..

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय लष्कराचे शौर्य आणि बलिदान यांच्या स्मृती सदोदित ताज्या राहाव्यात

संग्रहित छायाचित्र

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय लष्कराचे शौर्य आणि बलिदान यांच्या स्मृती सदोदित ताज्या राहाव्यात, त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत तेवती राहावी, या हेतूने विद्यापीठाच्या आवारात रणगाडा बसवावा, असे कुलगुरू जगदीशकुमार यांना वाटत असेल, तर त्यात काय चूक आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात येईल. वरवर पाहता ते योग्यच वाटेल. रणगाडा हे एक प्रतीक आहे. अशा प्रतीकांचे एक महत्त्व असते. त्यांना मानवी भावना जोडलेल्या असतात. ध्वज हे असेच राष्ट्राचे प्रतीक. त्यामागे देशाभिमानाची भावना असते. उलटी संगीन/ बंदूक आणि त्यावर जवानांचे विशिष्ट शिरस्त्राण हे शहीद जवानांची, त्यांच्या बलिदानाची आठवण करून देणारे असते. त्याचप्रमाणे रणगाडय़ामागे लष्करी शक्ती असते. तिची स्मृती विद्यार्थ्यांसमोर सतत राहिली तर त्याला विरोध करायचे कारणच काय? सवाल रास्त आहे. परंतु फारच भाबडा आहे. लहानपणापासून रोज देवाच्या मूर्तीचे दर्शन केल्याने माणसाच्या मनात देवपण जागृत होते, असे म्हणण्यासारखे ते आहे. तसे होत असते, तर कित्येक समस्या मुळात निर्माणच झाल्या नसत्या. येथे मुद्दा देवदर्शनाचा नाही. आक्षेप त्यातून भलत्याच अपेक्षा बाळगण्याला आहे. हीच बाब रणगाडय़ाची. मुळात रणगाडय़ाकडे शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून पाहणाऱ्यांनी त्यांचे डोळे तपासून घेण्याची आवश्यकता आहे. रणगाडय़ातून शौर्य नव्हे, तर ताकद प्रतीत होत असते. शत्रूच्या मनात धडकी बसविणारे, दहशत निर्माण करणारे असे ते आधुनिक युद्धसाधन आहे. लष्करी सत्तेचे ते प्रतीक आहे. आता ते विद्यापीठात आणून ठेवावे असे तेथील कुलगुरूंना का वाटावे? विद्यापीठ म्हणजे केवळ पाठय़पुस्तकी शिक्षणाचे केंद्र नसते. तेथे विचार घडत असतात. त्या घडण्यासाठी वैचारिक मुक्त वातावरणाची आवश्यकता असते. वैचारिक क्षेत्रातील हे स्वातंत्र्य तसे अनेकांना आणि खास करून सत्तेला न मानवणारे असते. त्यामुळे ते दडपण्याचे प्रयत्न नेहमीच सुरू असतात. जगभरात हेच घडताना दिसते. जेएनयूत रणगाडा आणण्याची मागणी करणे हा त्या दडपणाचाच एक भाग आहे. येथे हे नीट लक्षात घेतले पाहिजे, की तेथे शहीद जवानांचे स्मारक उभारण्याची मागणी झालेली नाही. मागणी आहे ती रणगाडा आणून बसविण्याची. त्यामागील दृश्य हेतू काहीही असोत, छुपा उद्देश विरोधी विचारांना आव्हान देण्याचा आहे, सत्तेच्या वा व्यवस्थेच्या विरोधात विचार कराल तर त्यास चिरडण्यासाठी व्यवस्थेकडे ‘रणगाडे’ असतातच, हे दाखविण्याचा आहे. रोज उठून राष्ट्रध्वजास प्रणाम केला, भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा म्हटली वा भारतमाता की जय म्हटले म्हणून कोणी राष्ट्रभक्त होत नसतो. देशबांधणीसाठीचे योगदान ही राष्ट्रभक्तीची खरी कसोटी असते. परंतु त्यासाठी फारच कष्ट करावे लागतात. त्यापेक्षा अशी प्रतीकपूजा सोपी. एरवी महाविद्यालयीन तरुणांपुढे रणगाडे मांडले म्हणजे त्यांना भारतीय जवानांचे शौर्य आणि बलिदान यांची आठवण राहील, असे म्हणण्याचा धूर्तपणा कुलगुरूंसारख्या व्यक्तीने केला नसता. देशभक्तीच्या आवरणाखाली हा धूर्तपणा करण्यात आलेला असल्याने सामान्य नागरिकांचा त्याला सहजच पाठिंबा मिळेल. त्याला विरोध करणारांना लोकच देशद्रोही म्हणतील याची लबाड जाणीव त्यांना नसेल असे मानता येणार नाही. ती त्यांना आहे. लोकांना नाही. कारण सामान्य लोकांना रोजच्या जगण्याच्या लढाईत हा विचार करण्यास फुरसत नसते. यातूनच या धूर्ताचे फावते. यामुळेच ते लोकांच्या मनांवरून सहज रणगाडे फिरवू शकतात..

First Published on July 26, 2017 3:34 am

Web Title: marathi articles on jawaharlal nehru university