बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा यांची तथाकथित तत्त्वे किती तकलुपी असतात, याचे आणखी एक उदाहरण नुकतेच मिळाले. ‘दलित की बेटी’ म्हणविणाऱ्या या मायावती यांनी राजकारणातील घराणेशाहीच्या विरोधात भूमिका घेतली होती, पण अखेर त्यांनीही घराणेशाहीचाच पुरस्कार केला. मायावती यांनी आपले बंधू आनंद कुमार यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी, तर भाचा अक्षय आनंद याची राष्ट्रीय समन्वयकपदी नव्याने नियुक्ती केली. वर, ‘घराणेशाहीला आपला अजूनही विरोध आहे, पण दबावामुळे भाऊ आणि भाच्याची नियुक्ती करावी लागली’ असे मायावती यांनी पक्षाच्या बैठकीत म्हटल्याचे बसपचे नेते सांगत आहेत. हा दबाव कोणाचा? अस्मिता आणि स्वाभिमानाची भाषा करणाऱ्या मायावती या दबावाला बळी पडल्या यातच सारे आले. बरे, या बंधूंचा पूर्वेतिहास काय? दोन वर्षांपूर्वी मायावतींनी याच आनंद कुमार यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षात उमेदवारी वाटपावरून भ्रष्टाचाराचा झालेला आरोप आणि घराणेशाहीला पक्षात बळ मिळत असल्याची टीका होताच गेल्या वर्षी मे महिन्यात मायावती यांनी आनंद यांना पदावरून दूर केले. पक्षात यापुढे अध्यक्षाकडून आपल्या नातेवाईकांची पदाधिकारीपदी नियुक्ती केली जाणार नाही, असे जाहीर केले होते; पण वर्षभरातच मायावती यांनी आपला निर्णय फिरविला व भाऊ आणि भाच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविली. विशेष म्हणजे मायावती यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी पक्षाच्या उपाध्यक्षपदी फेरनियुक्ती झालेल्या या भावाची प्राप्तिकर विभाग आणि सक्तवसुली संचालनाकडून चौकशी सुरू आहे. आपला राजकीय वारसदार भाचा आकाश हा असेल आणि त्याच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल, हे तर मायावतींनी आधीच सूचित केले होते. आता घराणेशाहीखेरीज ‘निधी संकलना’चीही शंका माध्यमे उपस्थित करीत असली, तरी मायावती अविचल आहेत. कोणत्याही निर्णयावर टीका होताच प्रसारमाध्यमे ही जातीयवादी आणि दलितविरोधी असल्याचा कांगावा करायचा, ही मायावतींची कार्यपद्धतीच. भाच्यावरून घराणेशाहीचा आरोप होताच मायावती यांनी हे शस्त्र पुन्हा बाहेर काढले. भाऊ आणि भाच्याच्या पलीकडे पक्षात कोणीही मोठा नाही हाच संदेश मायावती यांनी दिला आहे. काही अपवाद वगळल्यास राजकीय पक्षांमध्ये नेतृत्वाची दुसरी फळीच दिसत नाही. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपमध्येही चित्र फार काही वेगळे नाही. आमच्या पक्षात घराणेशाहीला स्थान नाही, असा दावा भाजपचे नेते करीत असले तरी शिवराजसिंग, रमणसिंग किंवा वसुंधराराजे या माजी मुख्यमंत्र्यांनी आपापले नातेवाईक किंवा मुलांनाच पुढे आणले. राजनाथ सिंग यांचा मुलगाही आमदार झाला. नव्या फळीतील अनुराग ठाकूर, जयंत सिन्हा किंवा कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आदी घराणेशाहीतूनच पुढे आले. मायावती यांच्याप्रमाणेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या थयथयाट करणाऱ्या किंवा विक्षिप्त स्वभावाच्या म्हणून प्रसिद्ध. मायावती यांच्याप्रमाणेच ममता बॅनर्जी यांनी भाच्याला पुढे आणले. ममतादीदींच्या भाच्यावर सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप आहेच. पक्षात नेतृत्वाची दुसरी फळी नसल्यास काय होते हे तमिळनाडूत जयललिता यांच्या पश्चात अनुभवास आले. काँग्रेस तर घराणेशाहीची तिसरी पिढी स्वीकारून पराभवाच्या मालिकेलाच सामोरी जाते आहे. घराणेशाहीतून पक्षांचे नुकसानच जास्त झाल्याची उदाहरणे असली तरी नेतेमंडळींना त्याचे काहीच सोयरसुतक नसते. सारी पदे घरातच राहतील हा नेतेमंडळींचा अट्टहास जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे असेच सुरू राहणार.