जवळपास तीन आठवडे दडी मारलेला पाऊस अखेर आला. मोसमी पाऊस दाखल झाल्यापासूनचा पावसाचा सारा अनुशेष मुंबईत दोन दिवसांत भरून निघाला. पण दाणादाण म्हणजे काय याचे जे दर्शन मध्यमवर्गीय, कष्टकरी, नोकरदार, झोपडीवासी, चाळकरी मुंबईकरास या दोन दिवसांत झाले, त्याचा साधा सुगावादेखील प्रशासनास किंवा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना लागणार नाही अशी जादू या पावसाने करून दाखविली. ‘या पावसात पाणी तुंबलेच नाही,’ असा दावा जेव्हा महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे चित्रवाणी कॅमेऱ्यांसमोर छातीठोकपणे करत होते तेव्हाच, शहर-उपनगरांतील झोपडय़ा-चाळींतील असंख्य हतबल कुटुंबे घरात घुसलेले गुडघाभर पाणी हटविण्याचे केविलवाणे प्रयत्न करत होती. मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीची दैना तर अगोदरपासूनच सुरू झाल्याने, पावसामुळे त्याच्या हलाखीत पडलेली भर मुंबईकरांनी निमूटपणे सोसली. कुठे जोरदार प्रवाहाच्या तडाख्याने रस्ता खचला, नव्या ‘मुक्तमार्गा’सह साऱ्याच उड्डाणपुलांवर तलाव तयार झाले, तर कुठे आलिशान इमारतीच्या पायालाच हादरा देत भूस्खलन झाल्याने उच्चभ्रू वस्तीवाल्यांनाही जीव मुठीत धरावा लागला. मुंबईकरांच्या आयुष्यात दुर्दैवाचे फेरे अचानक कसे सुरू होतात, ते  एक गूढच आहे. चालताचालता कुणाचा पाय मॅनहोलच्या उघडय़ा झाकणातून खाली जातो आणि बघताबघता कुणी अभागी जीव होत्याचा नव्हता होऊन जातो. मॅनहोलमधून मानवी बळी घेण्याचा गेल्या वर्षीचा दुष्टपणा यंदाही या पावसाने दाखविलाच! मालाडमधील नाल्याच्या घोंघावणाऱ्या पुराने एक बळी घेतला. रस्त्यांची दैना झाली, खड्डे पुन्हा भकासपणे उघडे पडले, पदपथांवरील पेव्हर ब्लॉक बंड करून उठले, आणि या साऱ्या करुणावस्थेत मुंबईची गती मंदावत अखेर पुरती कोलमडून गेली. असे काही झाले, की प्रशासकीय यंत्रणा बहुधा आनंदित होत असावी. पावसामुळे मुंबईची दैना झाली की मगच सारी यंत्रणा झटून कामाला लागते, आणि मग, ‘करून दाखविल्या’चा दावा करणेही सोयीचे होते. या पावसाने प्रशासनाला करून दाखविण्याची संधी तर दिली नाहीच, पण ‘पाणी तुंबलेच नाही’ असा अंगलट येणारा दावा करून महापौरांनी स्वतस हास्यास्पद मात्र ठरवून घेतले. आजकाल माध्यमे आणि समाजमाध्यमांच्या सजगपणामुळे कोणत्याही कोपऱ्यातील कोणतीही लहानसहान घटनादेखील लपविता येत नाही, याचा विसर पडून सत्ताधारी नेते प्रशासनाच्या अपयशावर पांघरूण घालू पाहात असले, तरी पावसाने साऱ्यांना उघडे पाडलेच. अशा संकटांशी सामना करत मुंबईकर माणूस आला दिवस ढकलून दुसऱ्या दिवसाला सामोरा जाण्यासाठी झगडत असतो. विवंचनांचे एवढे मोठे ओझे माथ्यावर घेऊन तो ही कसरत करत असतो, त्यामुळे त्याला गेल्या क्षणाचे दुख करण्यापुरतीही फुरसत मिळत नाही. मुंबईकरांच्या या असहाय सहनशीलतेला राजकीय सोयीसाठी ‘मुंबई स्पिरिट’ असे नाव देऊन मुंबईकरांना ‘उसने अवसान’ देण्याचा एक जुनाच डाव नेहमी खेळला जातो. खरे तर, साऱ्या संकटांशी सामना करून मुंबईकर पुन्हा नव्या संकटास सामोरे जातो हा त्याचा नाइलाज असतो. गेल्या दोन दिवसांच्या पावसाने मात्र, या मुंबईकरांची अशी दैना करून टाकली, की त्या हलाखीस ‘स्पिरिट’ म्हणण्याचे धाडस करण्यासही कुणीच धजावले नाही. दोन दिवसांच्या झोडपण्यातून या पावसाने एकटय़ा मुंबईलाच नव्हे, तर विकासाच्या नावाखाली अमानवी हैदोस घालणाऱ्या प्रत्येक प्रवृत्तीस धडा दिला आहे. राज्याची राजधानीच जर रामभरोसे जगत असेल, तर इतर शहरांमध्ये अशी संकटे कोसळलीच, तर काय करून दाखविणार हा प्रश्न आता स्वतस विचारण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. मुंबई जात्यात आहे, तर बाकीची शहरे सुपात आहेत, एवढा धडा घेतला, तरी खूप झाले!

gold, gold all time high, gold investment, commodity market, money mantra, bazar article, gold all time high reasons, gold and global economy, gold in india, global economy,
क… कमोडिटीजचा : सोन्याचा ‘गाझा’वाजा
dombivli ganesh nagar marathi news, dombivli concrete road broken marathi news
डोंबिवली: पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या गणेशनगर मधील काँक्रीट रस्त्याची तोडफोड, नागरिकांमध्ये तीव्र संताप
youth murder
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”