राजन मिश्रा अशी त्यांची ओळख नव्हतीच. सगळ्यांना ‘राजन-साजन मिश्रा’ असे मिश्र नावच माहीत. त्यातले कुणी एकटे गात नाहीत, ते एकत्र सहगानच करतात, असाच सगळ्यांचा समज. तो योग्यच; कारण या अनोख्या सादरीकरणाने भारतीय अभिजात संगीतातील आणखी एका रंगाने मोठीच खुमारी आणली. ज्याला जुगलबंदी असे म्हटले जाई, ती त्यातील ‘युद्ध’सदृश वातावरणामुळे. वास्तविक हे स्वरांचे किंवा स्वरतालाचे भांडण नसतेच कधी. ते दोन कलावंतांनी एकत्र येऊन केलेले सहगान असते…

राजन – साजन मिश्रा यांनी गेल्या काही दशकांत या सहगानाने देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील असंख्य रसिकांना संगीताचा अपूर्व आनंद दिला. सहगान ही एकमेकांवर कुरघोडी करण्याची कला नव्हे. एकमेकांना समजून घेत, आधार देत, प्रोत्साहन देत आणि प्रेरणा देत ते करायचे असते. त्यासाठी त्या दोनही कलावंतांनी आधी एकमेकांना पूर्ण समजून घ्यावे लागते. बलस्थाने ओळखावी लागतात आणि दुसऱ्याच्या स्वरात आपला स्वर मिसळत, एक नव्या स्वरानंदाचा प्रवास सुरू करायचा असतो. शामचौरासी घराण्याचे सलामत अली-नजाकत अली या जोडीने भारतीय संगीतात असा सुंदर स्वरप्रवास सुरू केला. पं. कु मार गंधर्व आणि वसुंधराताई कोमकली यांनीही असाच अभिनव प्रयोग केला. तो खूप लोकप्रियही झाला. हिराबाई बडोदेकर आणि त्यांच्या भगिनी सरस्वती राणे यांनीही असे सहगानाचे अनेक कार्यक्रम केले. अलीकडच्या काळात राजन-साजन मिश्रा यांनी हेच सहगान अधिक उंचीवर नेऊन ठेवले. ते ज्या बनारस घराण्याची शैली गात आले, तीही भारतातील अन्य घराण्यांच्या तोलामोलाचीच.

मुळात बनारस हे भारतीय कलांचे माहेरघर. ख्याल, ठुमरी, होरी, कजरी, टप्पा, दादरा यांरख्या गायन प्रकारांमध्ये या शहराने अनेक मोठे कलावंत जन्माला घातले आणि त्यांच्या कलात्मक जाणिवांची मशागत केली. केवळ गायनच नव्हे, तर तबला, बासरी, शहनाई या वाद्यांच्या दुनियेत आणि नृत्याच्या क्षेत्रातही बनारसचे नाव फारच महत्त्वाचे. गौहरजान, मलकाजान, रसूलनबाई, सिद्धेश्वरी देवी यांच्यासारखे गायक कलावंत, सामता प्रसाद, किशन महाराज यांच्यासारखे तबलानवाज, शहनाईवादक बिस्मिल्ला खाँ यांसारखी कितीतरी रत्ने या बनारसच्या मातीतली. राजन मिश्रा यांनी त्यांचे चुलत आजोबा, बडे रामदास मिश्रा यांच्याकडून आणि वडील गोपालप्रसाद मिश्रा यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. या बडे रामदासजींचे बनारसमध्ये मोठेच प्रस्थ होते. एक उत्तम कलावंत म्हणून ते प्रसिद्ध होते. गोपालप्रसाद यांनाही त्यावेळी कलावंत म्हणून खूप मान होता. वयाने राजन मिश्रा मोठे. त्यांचे छोटे बंधू साजन हे त्यांच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान. पण या दोघांमध्ये इतके स्वरसहोदरत्व होते, की कोण कोणासाठी गात आहे, हे कळत नसे. या दोघांनीही एका मुलाखतीत सांगितले की, शरीराने आम्ही दोन व्यक्ती आहोत, बाकी आम्ही अभिन्नच राहिलो आहोत.

एकत्र गायन करायचे ही कल्पना प्रत्येक  कलावंताच्या बाबतीत योग्य ठरतेच असे नाही. कित्येकवेळा स्वभाव, मांडणी, तंत्र या बाबतीत विभिन्न कल्पना असू शकतात. परंतु राजन – साजन यांच्याबाबतीत असे काहीच घडले नाही. एक तर ते एकाच घरात वाढले आणि एकच शैली शिकले. कुणाच्या गळ्यात कोणता अलंकार अधिक शोभून दिसतो, याची पूर्ण जाणीव असल्याने त्यांचे गायन परिपूर्ण वाटे. त्यातील आलापीची सुंदरता, बोलबढत करताना एकमेकांना दाद देत पुढे जाणे आणि तानक्रियेत एकमेकांकडे अचंबित होऊ पाहणे यामुळे त्यांचे गायन अतिशय देखणे होत असे. खास बनारसी ढंगाचा पेहराव. अतिशय नाजुकपणे कोरलेली मिशी, तोंडात रंगलेला पानाचा विडा आणि चेहऱ्यावर प्रसन्न हास्य हे राजन मिश्रा यांचे वैशिष्ट्य. ते त्यांनी वयाच्या सत्तरीतही जपून ठेवले. आपले छोटे बंधू साजन यांना स्वरमंचावरच नव्हे, तर प्रत्यक्ष जगण्यातही बरोबरीचे स्थान देत या भावंडांनी गायनसेवा केली. त्यामुळेच २००७ मध्ये राजन मिश्रा यांच्याकडे सरकारने पद्माभूषण पुरस्कारासाठी विचारणा केली, तेव्हा त्यांनी आपण एकटे हा पुरस्कार घेणार नाही. सरकारला द्यायचा असेल, तर हा मानाचा किताब दोघांनाही द्यायला हवा, अशी अट घातली. ती सरकारनेही मान्य केली.

देशातल्या बहुतेक प्रत्येक संगीत महोत्सवात या दोन्ही बंधूंचे गायन झाले आहे. ऋजू स्वभाव असल्याने त्यांचे देशातील इतर कलावंतांबरोबरही अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिले. सतत स्वरात चिंब राहणेच त्यांनी पसंत केले. परिणामी ते भिजलेपण त्यांच्या गायनातही प्रतिबिंबित होत राहिले. घराण्याची शान वाढवणे हे आणि एवढेच आपले कर्तव्य नाही; तर एकूणच भारतीय संगीताचा प्रवाह अखंडित ठेवणे, हे आपले जीवितकार्य आहे, असे मानून राजन मिश्रा यांनी आपले आयुष्य व्यतीत केले.

करोना काळातील करुण कहाण्या संपत नाहीत आणि या दुर्धर काळात ज्या संगीताचा आधार प्राणवायूसारखा असावा, त्या क्षेत्रातील पंडित राजन मिश्रा यांचे व्यवस्थेच्या दारुण दुरवस्थेमुळे निधन व्हावे, ही कमालीची क्लेशदायक घटना आहे. कुणा सामान्यावरदेखील अशी वेळ येताच कामा नये, परंतु राजन मिश्रा यांच्यासारख्या गुणी कलावंतावरही तीच वेळ यावी, हे अधिक दु:खकारक म्हणावे लागेल. त्यांच्या अचानक जाण्याने या दोघा बंधूंच्या दोन एकसारख्या षड््जामधील एक षड््ज निमाला आहे.  त्यांना आदरांजली वाहताना, साजन मिश्रा यांना दीर्घायुरारोग्य चिंतणेच आपल्या हाती आहे.