रिझव्‍‌र्ह बँकेच्या मंगळवारच्या पतधोरण आढाव्याच्या बैठकीतून जे काही बाहेर आले, त्यावर रूढार्थाने जल्लोश केला जावा असे काही नव्हते. व्याजाच्या दरात फेरफार न करण्याच्या बहुतांशांना अपेक्षित भूमिकेचे अनुसरण रिझव्‍‌र्ह बँकेने केले, तरी भांडवली बाजाराचा निर्देशांक -सेन्सेक्स- अडीचशे अंशांनी उसळून २७ हजारांपल्याड पोहोचतो, हे कोडय़ात टाकणारे आहे. किंबहुना, गेल्या एप्रिलमध्ये रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली, त्यानंतर अर्थव्यवस्थेत बरेच काही घडून गेले आहे. आयात होणारे कच्चे तेल प्रति पिंप ३० डॉलरवरून ५० डॉलरच्या घरात पोहोचले. एप्रिलमधील महागाई दर मार्चच्या तुलनेत तब्बल एका टक्क्याने वाढून ५.३९ टक्क्यांवर गेला. देशातील कारखानदारीचे चित्र स्पष्ट करणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची मरगळही कायम असल्याचे मधल्या काळात स्पष्ट झाले. गुंतवणुकीला चालना नसल्याचा कल उद्योगक्षेत्रात सुरूच आहे. या नकारात्मक पाढय़ातसुद्धा, जानेवारी ते मार्च या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनांत वाढीचा दर ७.९ टक्क्यांवर पोहोचला. गत पाच वर्षांत कोणत्याही तिमाहीत नोंदविला गेलेला हा अर्थव्यवस्थेतील वाढीचा सर्वोच्च दर! यंदा पाऊस तुटीचा राहण्याची  शक्यता शून्य टक्के असल्याच्या ठोस निष्कर्षांपर्यंत हवामान खाते पोहोचले. या पाश्र्वभूमीवर जाहीर झालेले पतधोरण हे कर्मठही नाही आणि उदारही ठरविले जाऊ नये, असे गव्हर्नर रघुराम राजन यांनी धोरणपश्चात झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तरी आगामी काळात उदारतेला अर्थात व्याजदरात नरमाईला वाव शिल्लकआहे, या त्यांनी जोडलेल्या पुस्तीचे उत्साही पडसाद शेअर बाजारात उमटलेले दिसले. यात नवल नाही. राजन सप्टेंबरनंतरही गव्हर्नरपदी दिसतील काय, या प्रश्नावर राजकीय टीकाटिप्पणी, चिखलफेक मधल्या काळात झाली, तरी त्यांच्या पुनर्नियुक्तीबाबतची अनिश्चितता अजून सरलेली नाही. अशा स्थितीतही गव्हर्नर राजन यांचे वास्तवदर्शनाचे भान सुटत नाही आणि चालू आर्थिक वर्षांत विकास दराबाबत साहसी अंदाज आणि आकडय़ांच्या खेळ करण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. आपल्याला पेलेल, सोसवेल अशा ७.६ टक्क्यांच्या भाकितावरच ते कायम राहतात. अधिक उल्लेखनीय बाब म्हणजे, चांगल्या पाऊसपाण्यातून, धनधान्य व कृषी उत्पादनांत वाढीसह, ग्रामीण वेतनात वाढ आणि ग्रामीण क्रयशक्ती वधारण्याचेही परिणाम संभवतात. यामुळे आधीच अन्नधान्य आणि सेवा क्षेत्राचा (परिवहन भाडे, शिक्षणशुल्क, पाणीपट्टी, घरभाडे वगैरे) महागाई दरात भर घालणारा टक्का वाढेल. अमलात आलेला सातवा वेतन आयोगही भरीला आहेच. तरीही जानेवारी २०१७ साठी रिझव्‍‌र्ह बँकेचे महागाई दराचे पूर्वनिर्धारित ५ टक्क्यांचे लक्ष्य कायम राहिले आहे. येत्या सप्टेंबर ते डिसेंबर या तिमाहीत बँकांकडील विदेशी चलनातील तब्बल दोन लाख कोटी रुपयांच्या ठेवी परिपक्व होत आहेत. काही वर्षांपूर्वी घसरणीला लागलेली विदेशी चलन गंगाजळी भरण्यासाठी, अनिवासी भारतीयांना भावनिक साद घालून या ठेवी बँकांकडून उभारल्या गेल्या. आता या ठेवी वठविल्या गेल्यास बँकांना त्याची परतफेड डॉलरमध्येच करावी लागेल. एकीकडे अमेरिकी डॉलर सशक्त बनत असताना, या वठणाऱ्या ठेवी रुपयाच्या मूल्यावर मोठा ताण देणाऱ्या ठराव्यात. मात्र गेल्या तीन वर्षांत गव्हर्नर राजन यांच्या धोरणांचाच परिणाम म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेने अशा प्रसंगांना पचवेल इतका दमदार विदेशी चलनसाठा केला आहे. संभाव्य अनुकूल-प्रतिकूल घटकांमध्ये तात्पुरता का होईना, प्रतिकूलतेचे पारडे जड आहे. तरी सारे अंदाज-आडाखे पूर्वीसारखेच जैसे थे आहेत, हे विशेष भावणारेच ठरते. बदल, परिवर्तन सुखावणारे असले तरी स्थितप्रज्ञता काही वेळा आवश्यक ठरते. विशेषत: स्थित्यंतराला कारक ठरणारी स्थितप्रज्ञता म्हणूनच लोभस ठरते.