19 January 2019

News Flash

न्याय झाला?

त्या माध्यमातून तो अनेक गरजूंना मदत करतो.

सलमान खान

ज्यांना आपण नायक मानतो, ते कोणत्याही क्षेत्रातील असोत, त्यांचे पाय अखेर मातीचेच असतात. अभिनेता सलमान खान याच्या निमित्ताने हे सत्य हे पुनश्च अधोरेखित झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत पतंग खेळण्याचे सौभाग्य प्राप्त झालेला हा अभिनेता ‘बीइंग हय़ूमन’ या नावाची संस्था चालवतो. त्या माध्यमातून तो अनेक गरजूंना मदत करतो. त्याची ही वृत्ती वाखाणण्यायोग्यच आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्याच्यातील या माणुसकीच्या भावनेने भारावलेले आहेत. त्यामुळेच आजही अनेक जण त्याच्या पाठीशी उभे आहेत. परंतु कोणताही माणूस केवळ काळा वा पांढरा असत नाही. सलमानही त्याला अपवाद नाही. एकीकडे मानवतावादाची टीशर्टे विकतानाच दुसरीकडे तो मुक्या प्राण्यांना केवळ मौजेखातर मारूनही टाकताना दिसतो. तेव्हा नायक सलमान आणि गुन्हेगार सलमान ही दोन्ही एकाच व्यक्तीची दोन रूपे आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. सलमानच्या निमित्ताने आजच्या व्यक्ती-भक्तीच्या काळात मिळालेला हा मोठाच सामाजिक धडा आहे. राजस्थानमधील काळवीट हत्याप्रकरणी त्याला जोधपूर न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. या निकालास तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत आव्हान देऊ शकेल. त्यात पुन्हा एकदा चिंकारा हत्याप्रकरणाच्या निकालाची पुनरावृत्ती होईल की काय हे सांगणे कठीण. त्या खटल्यात खालच्या न्यायालयाचा निकाल उच्च न्यायालयाने फिरवून सलमानला निर्दोष सोडले होते. त्याचे कारण पुरावे पुरेसे बळकट नसणे. आपल्याकडील मातब्बरांच्या खटल्यांचे हे एक वैशिष्टय़च. त्यांत पोलिसांना पुरेसे पुरावेच सापडत नसतात, गुन्ह्य़ाची नोंद आणि पंचनामा या पातळीपासूनच ते पुरावे पुसून टाकण्यास सुरुवात झालेली असते, ते असलेच तर ते पुरेसे फुसके असतात. तेथे काचेची भांडी फुटावीत तसे साक्षीदार फुटतात. सलमानच्या वाहन अपघाताच्या खटल्यातही हेच न्यायालयीन वास्तव दिसले होते. तेच काळवीट हत्याप्रकरणातही पाहावयास मिळेल अशी भयशंका होती. परंतु राजस्थानातील बिश्नोई समाजाने तसे काही होऊ दिले नाही. त्यांनी काळवीट हत्या प्रकरण खऱ्या अर्थाने तडीस नेले. मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारा हा भूतदयावादी समाज. त्यांना प्रिय असलेल्या काळविटांना सलमानने गोळ्या घालून ठार मारल्याने ते संतापले. एवढे, की पंजाब, हरयाणा, राजस्थानात धुमाकूळ घालीत असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने तर सलमानला जोधपूरमध्ये ठार मारण्याची धमकीच दिली आहे. हा गुंड, तसेच आसारामसारखा लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी सध्या ज्या तुरुंगात आहेत, तेथेच आता सलमानला जावे लागणार आहे, ते या प्रकरणातील काही बिश्नोई साक्षीदारांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे. त्यादृष्टीनेही हा खटला मोलाचा ठरतो. यात सखेद संताप वाटावा अशी बाब एकच. ती म्हणजे या खटल्याचे रेंगाळणे. ऑक्टोबर १९९८मधील तो गुन्हा. तोही तसा फारसा गुंतागुंतीचा नसलेला. तरीही निकाली निघण्यास त्याला तब्बल २० वर्षे लागावीत यातून आपल्या न्यायव्यवस्थेची शबलता तेवढीच दिसते. न्यायालये आणि न्यायाधीश यांची कमी असलेली संख्या हे याचे एक सर्वात महत्त्वाचे कारण. गेल्या अनेक वर्षांपासून आपण तेच कारण देत आहोत. त्याचा अर्थ एकच होतो की, न्याय ही आपल्या दृष्टीने खरोखरच प्राथमिकतेची बाब नाही. त्यामुळे न्यायास उशीर म्हणजेच न्यायास नकार हे वाक्य मुखोद्गत असलेली आपली व्यवस्था न्याय पटकन व्हावा यासाठी काहीही करताना दिसत नाही. काळवीट हत्या प्रकरणात सलमानला भले शिक्षा झाली असेल, पण त्या खटल्यात न्याय झाला असे मात्र खात्रीने म्हणूनच म्हणता येत नाही.

First Published on April 6, 2018 3:47 am

Web Title: salman khan and the wheels of justice