23 October 2019

News Flash

टोके जुळतात.. मतेही मिळतात!

‘अफझलखानाच्या फौजा दिल्लीहून येत आहेत’ अशा शब्दांत शिवसेनेनेने हल्ला चढविला होता.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांधीनगरमध्ये हजेरी लावल्याने शिवसेनेचा वाघ गुजरातमध्ये सिंहाच्या (गीर अभयारण्य गुजरातमध्ये आहे) भेटीला गेल्याची टीका केली जाऊ लागली. साडेचार वर्षांपूर्वी राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमित शहा हे मुंबईत ठाण मांडून बसले असता ‘अफझलखानाच्या फौजा दिल्लीहून येत आहेत’ अशा शब्दांत शिवसेनेनेने हल्ला चढविला होता. अगदी १०० दिवसांपूर्वीच ‘पहारेकरी चोर आहे’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती. झाले गेले विसरून भाजप आणि शिवसेनेने हातमिळवणी केली. दोघांनी आणाभाका घेतल्या. आमची युती वरवरची नाही किंवा मोदी हेच नेते आहेत, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. इतके दिवस भाजपला धोबीपछाड करणारे शिवसेना पक्षप्रमुख अचानक बदलले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या निमंत्रणावरून त्यांनी गांधीनगर गाठले. उद्या मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता ठाकरे वाराणशीला गेल्यास आश्चर्य वाटणार नाही. गांधीनगरच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आव्हान देताना तुमचा नेता कोण, असा सवाल केला आणि आमचा नेता मोदी हेच असल्याचे सांगितले. २४ डिसेंबरला विठोबा-रखुमाईच्या पंढरपुरात याच उद्धव ठाकरे यांनी ‘पहारेकरी चोर आहे’ अशी टीका केली होती, ती याच मोदींना उद्देशून. तेव्हा ‘चौकीदार चोर आहे’ या राहुल गांधी यांच्या सुरात उद्धव ठाकरे यांनी सूर मिसळला होता. आता तेच मोदी महान असल्याचा साक्षात्कार उद्धवजींना झाला. राजकारणात असे होतच असते. नेतेमंडळी आज काय बोलतात त्याचा उद्याशी काहीही संबंध नसतो. भाजपचा आणखी एक मित्रपक्ष आसाम गण परिषदेचे उदाहरण देता येईल. नागरिकत्व विधेयक लोकसभेत मंजूर होताच आसाम गण परिषदेने किती थयथयाट केला. भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला. पक्षाच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. आसाममध्ये भाजपने फसवणूक केल्याचा आरोप केला. नागरिकत्व विधेयकावर भाजपशी पुन्हा समझोता नाही, अशी घोषणा केली. दोन महिन्यांतच चित्र पालटले. आसाम गण परिषदेने पुन्हा भाजपशी युती केली. नागरिकत्व विधेयक मागे घेतले, असे भाजपने जाहीर केलेले नाही. तूर्त मंजूर करणार नाही एवढेच आश्वासन दिले. तरीही आसाम गण परिषदेने माघार घेतली. शिवसेना आणि आसाम गण परिषदेच्या राजकीय भूमिकेत फरक काहीच नाही. उभयतांनी भाजपच्या पुढे सपशेल गुडघेच टेकले. भाजपचा आणखी एक मित्रपक्ष सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे (एसबीएसपी) अजून तळ्यात-मळ्यात सुरू आहे. या पक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर हे उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत. हे मंत्रिमहोदय सरकारमध्ये राहून भाजपला शिव्यांची लाखोली वाहत असतात. पूर्व उत्तर प्रदेश किंवा पूर्वाचलमध्ये राजभर समाज हा १८ टक्क्यांच्या आसपास आहे. यामुळे भाजपच्या नेत्यांना या पक्षाच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतात. भाजपबरोबरील युतीचा निर्णय हा पक्ष सोमवारी घेणार आहे. ऊस दरावरून राजू शेट्टी साखर कारखानदारांच्या विरोधात किती टोकाची भूमिका घ्यायचे. साखर कारखानदार हे मुख्यत्वे राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संबंधित नेतेमंडळी. यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेसचे साखर पट्टय़ात क्रमांक एकचे शत्रू हे राजू शेट्टी. पण या शेट्टी यांनाच मते द्या, असे सांगण्याची वेळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सहकारातील दिग्गजांवर आली आहे. काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान केले, असे राजू शेट्टी तेव्हा सांगत. आता तोच काँग्रेस पक्ष शेट्टी यांना सोयीचा वाटू लागला. उत्तर प्रदेशातील निषाद नावाच्या पक्षानेही असाच घोळ घातला आहे. गेल्या आठवडय़ात या पक्षाच्या नेतृत्वाने समाजवादी पार्टी-बसपा महाआघाडीशी समझोता केला. पण काही तरी बिनसले आणि तीनच दिवसांत या पक्षाचे नेते भाजप नेत्यांच्या घरी पोहोचले. शिवसेना, आसाम गण परिषद किंवा राजू शेट्टी असोत, कोणालाही कसलाही विधिनिषेध राहिलेला दिसत नाही. नेतेमंडळी मतदारांना गृहीत धरूनच चालतात. आपण सांगू तशीच भूमिका मतदारांनी घेतली पाहिजे ही नेतेमंडळींची अपेक्षा असते. पहारेकरी चोर आहे असे मोदींना उद्देशून बोलणारे उद्धव ठाकरेच पुन्हा मोदींचे गुणगान गातात किंवा स्वबळावर लढण्याचा ठराव बासनात बांधून पुन्हा युती केली जाते तेव्हा तत्त्वांना शिवसेनेने मुरड घातलेली असते. राजकारणात स्वार्थ आणि हवा कोठे वाहते हे महत्त्वाचे असते. यामुळेच उद्धव ठाकरे गांधीनगरला गेले याचे आश्चर्य वाटायला नकोच.

First Published on April 1, 2019 12:06 am

Web Title: shiv sena bjp alliance in election 2019