ज्या विचारांनी ऐन तारुण्यात भाई वैद्यांना पुरेपूर घेरले, त्या विचारांचे पाईक होऊन त्यांनी आयुष्याच्या अखेपर्यंत त्याचा सांभाळ केला. राजकारणात राहण्यापेक्षा समाजकारणात राहून समाजाशी आपली नाळ सतत जोडलेली राहणे, ही भाईंची खरी गरज राहिली. त्यामुळे कोणत्या पक्ष वा संघटनेत कोणत्या पदावर न राहताही, भाई वैद्य अखेपर्यंत समाजात मिसळून राहिले. व्यासंगाला कृतीची जोड असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. त्यामुळे कोणत्याही स्तरातल्या कार्यकर्त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्यांवर उपाय सापडणारे हमखास ठिकाण म्हणजे भाईंचे घर. राज्याचे गृहराज्यमंत्रिपद आणि त्यापूर्वी पुणे शहराचे महापौरपद ही त्यांच्या एकूण कारकीर्दीतली सर्वात ठळक पदे. त्यातही महापौर असतानाच आणीबाणीला विरोध केल्याने तुरुंगात रवानगी झालेली; पण त्यांनी त्याकडे कधीच फार प्रेमाने पाहिले नाही. पदाचा वापर शक्य तेवढा समाजासाठी कसा करता येईल, हीच त्यांची तळमळ. पण पद नाही, म्हणून ती कमी होण्याचेही कारण नव्हते. ज्यांच्या सहवासात भाईंची वैचारिक बैठक पक्की होत गेली, त्या एसेम जोशी व ना. ग. गोरे यांच्यासारख्या विचारवंत कार्यकर्त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप भाईंवर होती. एसेम म्हणजे गर्दीतला माणूस आणि नानासाहेब म्हणजे वैचारिक नेतृत्व. भाई वैद्यांमध्ये या दोघांचाही वारसा आला. ते वैचारिक पातळीवरही सतत टवटवीत राहिले आणि लोकांमध्ये मिसळून राहण्याचे व्रतही त्यांनी कधी सोडले नाही. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, जॉर्ज फर्नाडिस, मधु दंडवते, प्रा. ग. प्र. प्रधान, यदुनाथ थत्ते अशी विचारवंत कार्यकर्त्यांची एक फौजच्या फौज स्वातंत्र्यलढय़ापाठोपाठ देशात उभी राहिली होती. समता आणि न्यायावर आधारित नव्या समाजव्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या या विचारसरणीने नंतर अनेक स्थित्यंतरे पाहिली. समाजवादी पक्षाची शकले झाली. अनेक नवे कार्यकर्ते आले, त्यांना सत्ताकारण करण्यात रस वाटू लागला, पण या काळात भाई वैद्य निश्चल राहिले. त्यांनी सोशालिस्ट पार्टी नावाच्या पक्षाची स्थापनाही केली, पण त्याद्वारे सत्ताकारणाच्या सारिपाटावर प्यादे बनून राहण्याचे मात्र त्यांनी जाणीवपूर्वक नाकारले. हमाल पंचायत, राष्ट्र सेवा दल, मुस्लीम सत्यशोधक समाज ही त्यांची कार्यस्थळे. या संस्थांचे आधारस्तंभ म्हणून त्यांनी कधी मिरवले नाही, पण त्यांच्या कामात ते सतत सहभागी होत राहिले. गोवा मुक्तिसंग्रामात शिरुभाऊ लिमये यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात त्यांना मार खावा लागला. डाव्या हाताचे हाड मोडले, पण निष्ठा अढळ असल्याने तशाही अवस्थेत हात गळ्यात बांधून हे गृहस्थ ५० किलोमीटरचा प्रवास पायी करत राहिले. नंतरच्या काळात राजकारणाने दिशा बदलल्या, मूल्यव्यवस्था कोलमडून पडू लागल्या. या वातावरणात भाई वैद्य यांनी मात्र मूल्यांनाच महत्त्व दिले. त्यामुळे त्यांच्या स्वभावातील रोखठोकपणा आणि वैचारिक टोकदारपणा अधिक उठून दिसे. अशा वेळी मूल्यांशी प्रतारणा करून पदरात काही पाडून घेण्याची कल्पनाही त्यांना कधी शिवली नाही. राजकारणाच्या नव्या पदरांचे भान असले, तरीही ते समाजकारणाचे साधनच असले पाहिजे, यावर त्यांची श्रद्धा होती. सत्तेत असतानाच्या अगदी अल्प काळात त्यांनी ते करून दाखवण्याचा कसोशीने प्रयत्नही केला. लाच देऊ करणाऱ्या स्मगलराला पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या घटनेची त्या काळी खूप चर्चा झाली, पण भाईंना त्याचे फारसे सोयरसुतक नव्हते. कारण ते तसेच वागणार होते. ‘समाजवाद’, ‘एका समाजवादय़ाचे चिंतन’ या त्यांच्या पुस्तकांतून त्यांनी आपली भूमिका मांडली आणि तीच आयुष्यभर कृतीतही आणली. प्रलोभने रिंगण करून उभी असताना त्यांना नाकारण्याचे धैर्य अंगी बाणवणाऱ्या या शेवटच्या समाजवाद्याचे निधन ही म्हणूनच दु:खदायक घटना आहे.