06 August 2020

News Flash

सीरियन साठमारी

सन २०१३ ते २०१५. या दोन वर्षांत थेम्सच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

सन २०१३ ते २०१५. या दोन वर्षांत थेम्सच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जगाकडे पाहण्याची ब्रिटिशांची दृष्टीही बदलली आहे. बुधवारी ब्रिटिश संसदेत झालेल्या सीरियाविषयक चर्चेत आणि त्यानंतरच्या मतदानातून हेच दिसले. २०१३ मध्ये सीरियावरील हल्ल्यास नकार देणाऱ्या ब्रिटिश संसदेने या वेळी मात्र त्या देशावर हवाई हल्ले चढविण्यास सरकारला परवानगी दिली. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांच्या सरकारने सीरियाविरोधात लष्करी कारवाई करण्यासंदर्भात ठराव मांडला होता. त्यावरील मतदानात सरकारच्या बाजूने ३९७ मते पडली, तर विरोधात २२३. विरोधातील मतांची संख्या लक्षणीय असली, तरी त्यावर सुमारे दहा तास चाललेल्या चर्चेतून, खासकरून कॅमेरॉन आणि विरोधी पक्षांच्या मंत्रिमंडळातील (श्ॉडो) परराष्ट्रमंत्री हिलरी बेन यांच्या भाषणांतून ब्रिटनची भूमिका युद्धाच्या बाजूने कलल्याचे स्पष्ट दिसत आहे. आयसिसच्या विरोधात, किंबहुना सगळ्याच दहशतवादी संघटनांच्या विरोधात ब्रिटनने असणे यात विशेष काही नाही. एका ब्रिटिश नागरिकाचा आयसिसने शिरच्छेद केला होता. त्या पाश्र्वभूमीवर ब्रिटिशांच्या मनात त्या संघटनेबद्दल संताप होताच, परंतु पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्याने त्या संतापाला टोक आले आहे. तेच या चर्चेत दिसले. ब्रिटनच्या सुरक्षेला मुळातूनच धोका निर्माण झाला असल्याच्या कॅमेरॉन यांच्या दाव्याला त्या हल्ल्यामुळेच बळकटी आली. आपण त्यांच्या हल्ल्याची वाट पाहत हातावर हात ठेवून बसून राहायचे की आपल्या मित्रराष्ट्रांच्या खांद्याला खांदा लावून तो धोका संपवायचा याचा विचार आपण करायला हवा हे कॅमेरॉन यांचे आवाहन टाळ्या खाऊन गेले. खरे तर याला विरोध कोण करणार? देशाच्या सुरक्षेचा मुद्दा हे तसेही विरोधी आवाज दडपण्याचे ठेवणीतील अस्त्र असते. कॅमेरॉन यांनी तर आपल्या ठरावाला विरोध करणारे ‘दहशतवाद्यांचे सहानुभूतीदार’ आहेत असे सांगूनच टाकले. वर त्या विधानाबद्दल माफी मागण्यासही नकार दिला, परंतु तरीही २२३ खासदार त्यांच्याविरोधात गेले. विरोधी पक्षनेते जेरेमी कॉर्बिन यांनी आपल्या भाषणात एक साधाच प्रश्न उपस्थित केला. ‘सीरियातील युद्धात चर्चा करून र्सवकष असे राजकीय उत्तर शोधण्याच्या दृष्टीने ब्रिटनचे बॉम्बहल्ले कसे उपयोगी पडतील एवढेच सांगा’ असा त्यांचा सवाल होता. या सवालाचे उत्तर आज ना कॅमेरॉन यांच्याकडे आहे ना ओबामा वा पुतिन यांच्याकडे. याचे कारण या सगळ्यांनी मिळूनच सीरियातील राजकीय गोंधळ सुरू केला आहे आणि तेथील शांतता आपल्याच अटी-शर्तीवर व्हावी, असा ओबामा आणि पुतिन यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे तेथे एकीकडे आयसिसविरोधात सारेच लढत असल्याचे दिसत असले, तरी त्या युद्धाच्या आत एक युद्ध सुरू असून, ते अमेरिका विरुद्ध रशिया आणि असाद यांच्यातील आहे. रशियाने २६ नोव्हेंबपर्यंत सीरियावर २७१६ हल्ले चढविले आहेत. अमेरिकेने २७७६ हल्ले केले आहेत. त्यातून आयसिसचे किती नुकसान झाले हे स्पष्ट झाले नसले, तरी निर्वासितांचा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे. आता ब्रिटननेही हल्ले चढविण्यास सुरुवात केली आहे. मित्रराष्ट्रांच्या लष्करी क्षमतेत त्यामुळे मोठी भर पडेल असे नाही. ब्रिटनने प्रारंभी लक्ष्य केले ते आयसिसच्या ताब्यातील तेलविहिरींना. आयसिसचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठीचे प्रयत्न सफल झाले तरी त्यातून तो भस्मासुर गारदच होईल याची हमी देता येणार नाही. त्याचे कारण अर्थातच बडय़ांच्या सीरियन साठमारीत दडलेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2015 1:08 am

Web Title: syria strategy
Next Stories
1 तस्करीचे गुंडाराज
2 जन्मठेपेचा हेतू
3 ‘प्रभू’च तारणहार..
Just Now!
X