राष्ट्रीय सुरक्षा हा केवळ प्रचारी भाषणांत वा चॅनेलीचर्चात बोलण्याचा विषय नसून, तो ‘करण्याचा’ विषय आहे हे कोणाला कळत नाही असे नाही. परंतु ‘कथनी’ आणि ‘करनी’, कळणे आणि वळणे यात आपल्याकडे नेहमीच प्रचंड दरी असते. ही एक बाब आणि दुसरे म्हणजे – ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ ही तर दूरचीच गोष्ट, आपल्याकडे आपल्यालाच आधी लागलेल्या ठेचीतूनही शहाणपणा येत नाही. हे दोन्ही आपले राष्ट्रीय ऐब. जम्मूमधील सुंजवान लष्करी छावणीवर झालेला हल्ला हा त्याचाच परिणाम आहे. या छावणीवर शनिवारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या पाकप्रशिक्षित दहशतवाद्यांनी हल्ला केला. संसद हल्ला प्रकरणातील अफझल गुरू आणि जम्मू-काश्मीर मुक्तीमोर्चाचा नेता मकबूल भट यांच्या फाशीच्या स्मृती दिनांचा ‘मुहूर्त’ साधून दहशतवादी कारवाया केल्या जातील याची खबर गुप्तचर यंत्रणांना होतीच. आदल्या आठवडय़ात श्रीनगरमधील रुग्णालयात दोन पोलिसांची हत्या करून दहशतवाद्यांनी त्यांच्या साथीदाराला कैदेतून पळवून नेले होते. सीमेवर पाकिस्तानी फौजा सातत्याने गोळीबार करीत आहेत. असे सगळे असताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भलेही काश्मीरमधील परिस्थिती सुधारत असल्याचे भास होत असतील, सुरक्षा यंत्रणांना मात्र त्या भ्रमात जगणे परवडणारे नव्हते. परंतु ज्या पद्धतीने सुंजवान छावणीत दहशवादी घुसले, तेथील सहा जवानांची हत्या केली, एका जवानाच्या पित्याला ठार मारले, हे सारे सुरक्षेतील ढिलाईकडेच निर्देश करीत आहे. या हल्ल्याला आपल्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. तीन-चार दहशतवाद्यांना त्यांनी कंठस्नान घातले हे खरे. परंतु छावणीत नेमके किती दहशतवादी घुसले होते, याचा पत्ता रविवापर्यंत लागलेला नव्हता. जम्मूमधील छावणीवरील हल्ल्याची ही पहिलीच घटना नव्हे. १५ महिन्यांपूर्वी नागरोटा छावणीवर अशाच प्रकारे हल्ला चढविण्यात आला होता. त्यात सात जवान शहीद झाले. याआधी १८ सप्टेंबर २०१६ रोजी उरी येथील लष्करी छावणीवर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनीच हल्ला चढविला होता. १९ जवानांचा त्यात बळी गेला. ‘जैश’ची या हल्ल्यांतील गुन्हापद्धती सारखीच आहे हे विशेष. पहाटे छावणीत काहीसे शैथिल्य आलेले असते. त्या वेळी गुपचूप, छावणीच्या मागच्या बाजूने घुसायचे. उरीमध्ये त्यांनी असेच केले. या वेळीही जैशचे दहशतवादी पहाटेच्या वेळी सुंजवान छावणीच्या मागच्या बाजूने आत शिरले. तेथे सुरक्षा भिंत आहे. परंतु अनेक ठिकाणी तिला खिंडारे पडलेली आहेत. त्यातून ते आत घुसल्याचे सांगण्यात येते. राज्यातील तिसऱ्या सर्वात मोठय़ा लष्करी छावणीच्या सुरक्षा भिंतीची ही अवस्था असेल, तर याला सुरक्षेबाबतची हेळसांड असेच म्हणतात. पठाणकोट हल्ल्यानंतर माजी लष्कर उपप्रमुख लेफ्ट. जन. फिलिप कॅम्पोज यांच्या समितीने सर्व लष्करी तळांच्या सुरक्षेबाबत काही उपाययोजना सुचविल्या होत्या. सुरक्षा भिंती बळकट करणे, सुरक्षेच्या दृष्टीने तो भाग प्रकाशमान राहील हे पाहणे, धोक्याची सूचना देणारी यंत्रे बसविणे, गस्त वाढविणे अशा साध्या सूचना होत्या त्यांच्या. परंतु त्यांची अंमलबजावणी कासवगतीनेच सुरू आहे हे उरी, नागरोटात दिसले. आताही त्याचाच पारदर्शक प्रत्यय आला. ५६ इंच छातीचे प्रतीक मिरवणाऱ्या मोदी सरकारला यात राष्ट्रीय सुरक्षेतील गाफीलपणा कदाचित दिसणार नाही. छावण्यांच्या सुरक्षेसाठी संरक्षण मंत्रालयाने १४८७.२७ कोटींचा प्रस्ताव दिला आहे असे आकडेही तोंडावर फेकले जातील. पण गाफिलांच्या अशा गर्वगीतांनी परिस्थितीवर पदर टाकता येत नसतो. पठाणकोट ते सुंजवान या घटनांनी तेच अधोरेखित केले आहे.