ज्ञानासाठी परीक्षा असते की ज्ञानाची परीक्षा? ‘ज्ञानरचनावादी’ शिक्षण पद्धतीची कास पकडून आपल्याला दहा वर्षे झाली. पण या मूलभूत प्रश्नाने भारतीय शिक्षणव्यवस्थेचा पिच्छा अद्याप सोडलेला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण येऊ नये आणि त्यांना आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशीच्या परीक्षेचा सराव करण्याकरिता पुरेसा वेळ मिळावा यासाठी प्रत्येक विषयांदरम्यान सुट्टय़ा देण्याची दहावीच्या वेळापत्रकासंदर्भात आलेली मागणी ही याच गोंधळाचा परिपाक. ही मागणी पालकांकडून किंवा बालमानसोपचारतज्ज्ञांकडून आली, तर तसेही नाही. ही मागणी आली आहे शिक्षकांच्या संघटनांकडून.  ‘लिहिणे’ हा जणू शिक्षकी पेशाचा जोडधंदा असल्याप्रमाणे काही शिक्षक संघटनांकडून दररोज एक याप्रमाणे प्रसिद्धिपत्रकांचा रतीब पाडतात. शिक्षकांचे वेतन, कामाचा भार, याची जयंती, त्याची पुण्यतिथी.. असे सगळे विषय संपल्यानंतर रोज रोज विषय तरी कोणते घ्यायचे? मग कधी तरी विद्यार्थ्यांकडे मोर्चा वळतो. मग दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक हादेखील एक ‘प्रश्न’ बनून जातो. आणि असे सहजसोपे, प्रसिद्धिलोलुप प्रश्न घेतले की एकूण शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी संघटना करतात काय, अशा ‘गुणवत्तायुक्त’ प्रश्नांची जाहीर परीक्षा देणेही टळते! मुळात ‘पढतपंडिती’ शिक्षणव्यवस्थेतून आपले फारसे काही भले झाले नाही, हे कुठे तरी आपल्यातील काही शहाण्या शिक्षणतज्ज्ञांच्या लक्षात आले म्हणून जिज्ञासा, निरीक्षण, प्रयोग, सर्जनशीलता, उपाययोजना व समस्यांचे निराकरण अशा पंचसूत्रीवर आधारलेल्या ज्ञानरचनावादाचा पर्याय आपण निवडला. परीक्षांच्या तणावामुळे हे सूत्र बिघडू नये म्हणून घोकंपट्टीवर आधारलेल्या पारंपरिक परीक्षा पद्धतीला फाटा देत पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याचे धोरणही आपण स्वीकारले. विद्यार्थिसुलभतेचा हा मार्ग एकीकडे अनुसरताना तिथेच दुसरीकडे दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत वेगवेगळ्या मागण्या उकरून काढत विद्यार्थ्यांचे दडपण आपण वाढवीत आहोत. दोन विषयांमध्ये सुट्टय़ा घेतल्याने परीक्षेचे दडपण कमी होते हे जर खरे असेल तर परीक्षा पंधरा दिवसांऐवजी ३० दिवसांवर गेल्याने त्याची ‘लांबी’ (कालावधी) वाढते हे किमान गणिताच्या शिक्षकांनी तरी इतरांना समजवायला हवे. दुसरा व्यावहारिक प्रश्न म्हणजे परीक्षा जितक्या लांबणार तितके उत्तरपत्रिका तपासणीचे काम रखडणार. त्याचा परिणाम पुन्हा निकालांवर. आता तर जूनमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून दोन महिन्यांनी फेरपरीक्षा घेण्याचीही जबाबदारी राज्य शिक्षण मंडळावर येऊन पडली आहे. पण एरवी १५ दिवसांत आटोपणारी परीक्षा महिनाभर लांबत असेल तर हे सगळेच वेळापत्रक कोलमडते. दहावी-बारावीच्या लांबणाऱ्या निकालांमुळे आणि प्रवेशप्रक्रियेमुळे अकरावीचे, प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष गेली अनेक वर्षे उशिराने सुरू होते आहे. परंतु प्रसिद्धिपत्रक पाडण्याच्या रतिबात या सगळ्याचा विचार करण्यासाठी संघटनांकडे वेळ कुठे आहे? ज्ञानरचनावाद विद्यार्थिकेंद्री, विद्यार्थिसुलभतेचा आग्रह धरतो. विद्यार्थ्यांमधील क्षमतांचा पुरेपूर विकास केल्यानंतर त्याच्या क्षमतांची ‘परीक्षा’ (मूल्यांकन हा सुयोग्य शब्द) ही त्याच्या सोयीने घ्यावी, असे यात अभिप्रेत आहे. ही क्रांतिकारी संकल्पना परीक्षेत लागणाऱ्या कागद आणि पेन-पेन्सिलच्या पलीकडे जाऊन मूल्यांकनाच्या गोष्टी करते. आपल्याकडील १४ ते १५ लाख विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबतीत हे कसे साध्य होणार, असे व्यावहारिक प्रश्न यावर उपस्थित केले जातात. पण म्हणून ज्ञानरचनावादाची रचनाच तोडूनमोडून टाकण्याचा विचार कुणी करीत नाही. हळूहळू का होईना ती महाराष्ट्राच्या मातीत रुजते आहे. अर्थात ती इथे फोफावायला हवी तर त्यासाठी आधी या ‘ज्ञानाची परीक्षा’ देण्याच्या मानसिकतेतून सुटका व्हायला हवी.