28 January 2021

News Flash

वाघांसाठी (अ)भयारण्य..

अभयारण्य व्याघ्रमृत्यू आणि वाघ बेपत्ता

कोणत्याही अभयारण्याची निर्मिती करताना स्थानिकांचा विश्वास, मांसभक्षी प्राण्यांची भूक भागवणारे तृणभक्षी प्राणी आणि तृणभक्षी प्राण्यांची भूक भागवणारा गवताळ प्रदेश आवश्यक असतो. या बाबींची पूर्तता होत नसताना अभयारण्य घोषित केले जात असेल; आणि त्यावरच न थांबता लगोलग तिथे पर्यटनही सुरू केले जात असेल, तर ते अंगलट येणारच. नागपूर जिल्ह्य़ातील उमरेड-पवनी-करांडला अभयारण्याबाबत नेमके हेच घडले. आठ वर्षांपूर्वी घोषित झालेल्या या अभयारण्यात वाघांचे मृत्यू, त्यांचे बेपत्ता होणे आता नित्याचे झाले आहे. दोन वाघांचा मृत्यू आणि किमान १० वाघांचे बेपत्ता होणे हे आकडेच स्वयंस्पष्ट आहेत. वाघांचा अधिवास असेल तर अभयारण्य घोषित करणे गैर नाही. त्या जंगलातील वाघ स्थानिक असतील व त्यांना भरपूर खाद्य उपलब्ध असेल, तर त्यांच्या संरक्षणासाठी त्या जंगलास अभयारण्याचा दर्जा द्यायलाच हवा. पण उमरेड-पवनी-करांडला अभयारण्याच्या बाबतीत गोष्ट जरा वेगळी आहे. तृणभक्षी प्राण्यांसाठी आवश्यक तो गवताळ प्रदेश नसल्यामुळे या प्राण्यांची संख्या येथे मोजकी आहे. त्यामुळे या जंगलातील वाघाने कायमच

गावाची वाट धरली आणि गावातील जनावरे मारून भूक भागवली. त्या वेळी या जंगलात १२ वाघ होते, पण ते स्थानिक नाही तर स्थलांतरित होते. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि नागझिरा अभयारण्याच्या मध्यात हे जंगल आहे. या जंगलात येणारे वाघ हे व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यातील होते. आताही ताडोबातील तीन वाघ, तर नागझिऱ्यातून तीन वाघ या ठिकाणी आलेले आहेत. या स्थलांतरित वाघांनी कधीच येथे दीर्घ मुक्काम ठोकला नाही. जोपर्यंत ते या जंगलात राहतात तोपर्यंत त्यांचा मुक्काम जंगल आणि गावाच्या सीमेवरच राहतो. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षांची झळ येथेही बसली. जंगल आणि गावाची सीमा लागून असल्याने अभयारण्याचा प्रस्ताव आला तेव्हाच गावकऱ्यांनी याला विरोध दर्शवला होता. याबाबत गठित समितीनेही नकारात्मकच अहवाल दर्शवला होता. मात्र, तत्कालीन मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचा विचार न करता घाईघाईने अभयारण्याची घोषणा के ली. तेवढय़ावरच न थांबता, लगोलग पर्यटनही सुरू करून दिले. ते करताना कॉरिडॉरच्या सुरक्षिततेचा मुद्दाही ध्यानात घेतला गेलेला नाही. त्याचा पहिला फटका जगप्रसिद्ध ‘जय’नामक वाघाच्या बेपत्ता होण्याने बसला. रस्ते, महामार्ग, कालवे अशा कुठल्याही ठिकाणी दिसणारा हा वाघ २०१६ च्या एप्रिलमध्ये अचानक दिसेनासा झाला. त्याची शिकार झाली यावर वन्यजीव अभ्यासक ठाम होते, पण वनखाते साडेचार वर्षांनंतरही ते मान्य करण्यास तयार नाही. चार वर्षांपासून विशेष तपास पथक आणि गुन्हे अन्वेषण विभाग या घटनेचा तपास करत आहेत. तो तपास कुठवर आला, हे कळण्यास मार्ग नाही. जानेवारी २०१९ मध्ये पवनी

वनक्षेत्रातील चिचगाव उपक्षेत्रात दोन वाघ मृत्युमुखी पडले. आदल्या वर्षी डिसेंबरमध्ये पवनी वनक्षेत्रात एक वाघ मृत्युमुखी पडला. गतवर्षी सप्टेंबरात कु ही वन्यजीव क्षेत्रात एक वाघ मृतावस्थेत आढळला, तर नोव्हेंबरमध्ये वाघिणीने गर्भाशयातील चार बछडय़ांसह जीव गमावला. तर नववर्षांच्या सुरुवातीलाच तीन बछडय़ांसह एका वाघिणीचा मृत्यू झाला. यांतील अध्र्याहून अधिक घटना या संशयास्पद मृत्यूच्या आहेत. अभयारण्य प्रशासन ही बाब मानायला तयार नाही. परिणामी वाघांचे मृत्यू आणि वाघांचे बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच आहे. याशिवाय इतरही अनेक समस्या आहेतच. प्रशासनाने वेळीच यास आवर घातला नाही, तर ‘जय’नामक वाघामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर स्थान मिळवणारे हे अभयारण्य व्याघ्रमृत्यू आणि वाघ बेपत्ता होण्यासाठी ओळखले जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 1:32 am

Web Title: tiger deaths in maharashtra mppg 94
Next Stories
1 शुभारंभी हवे भान!
2 विचार करण्याची ‘संधी’..
3 हवाई दलप्रमुखांचा इशारा..
Just Now!
X