वीरेंद्र सेहवागची फलंदाजी मुक्तछंदातली. फटक्यांच्या तांत्रिकतेची बंधने त्याने कधीच जोपासली नाहीत. त्यामुळेच तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्याच्याकडे कधीच पाहिले गेले नाही. कसोटी, एकदिवसीय किंवा टी-ट्वेन्टी क्रिकेटचा कोणताही प्रकार असो, प्रत्येक चेंडू हा सीमापार धाडण्यासाठीच असतो, हीच आक्रमकता त्याच्या यशाची गुरुकिल्ली ठरली. त्याची फलंदाजी म्हणजे प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी एक वादळच असायचं. म्हणूनच नजफगढचा नवाब असे बिरुद मिरवणाऱ्या वीरूला क्रिकेटविश्वात ‘प्रतिसचिन’ म्हणायचे. पण त्याच्या फलंदाजीच्या शैलीत विवियन रिचर्ड्स जाणवायचा. सुरुवातीच्या काही वर्षांत मधल्या फळीत उमेदवारी केल्यानंतर सलामीच्या स्थानासाठी त्याला बढती मिळाली आणि मग त्याची फलंदाजी खऱ्या अर्थाने बहरली. जगातील सर्वोत्तम सलामीवीर फलंदाज म्हणून त्याची ख्याती होती. समोर कोणत्याही गोलंदाजाची तमा न बाळगणाऱ्या या मनमौजीच्या ओठांवर नेहमीच किशोरकुमारची गाणी किंवा भजने असतात. निवृत्तीप्रसंगीसुद्धा त्याचा स्वभावगुण कायम होता. ‘‘गेली अनेक वष्रे मला सल्ले देणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे, परंतु त्यांपैकी बरेच सल्ले न स्वीकारल्याबद्दल मी माफी मागतो. पण त्याला काही कारणे आहेत, मी माझ्या मार्गाने जगतो,’’ ही त्याची प्रतिक्रियाच बोलकी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणातच शतक झळकावून या ‘वीरू’अध्यायाला प्रारंभ झाला. मुल्तान कसोटीतील त्रिशतक हा त्याच्या कारकीर्दीतील सर्वोच्च बिंदू. पाकिस्तानी गोलंदाजांना हताश करणाऱ्या त्या खेळीमुळे सेहवागला ‘मुल्तानचा सुल्तान’ ही उपाधी क्रिकेटरसिकांनी दिली. २००८ मध्ये वीरूने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्रिशतकाची पुनरावृत्ती केली आणि वेगवान त्रिशतकाचा विश्वविक्रमही प्रस्थापित केला. एकदिवसीय क्रिकेटमधील द्विशतकही त्याच्या नावावर होते. सचिन तेंडुलकरसोबत एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची सलामीची जोडी चांगलीच गाजली. सेहवागची कारकीर्द त्याच्या खेळींप्रमाणेच वादांमुळेही गाजली. २००७च्या विश्वचषकापर्यंत राहुल द्रविडकडून भारताच्या नेतृत्वाची धुरा सेहवागकडे जाणार अशी चर्चा होती; परंतु सूर हरवलेल्या सेहवागचे संघातील स्थानही डळमळीत झाले आणि कर्णधारपदी महेंद्रसिंग धोनीचा राज्याभिषेक झाला. २०११च्या विश्वविजेतेपदाच्या प्रवासातील बांगलादेशविरुद्धचा पहिलाच सामना सेहवागने गाजवला होता. विश्वचषकानंतर काही महिन्यांनी वीरूला कानाने ऐकूच येणे बंद झाले आणि त्याला त्यातून सावरण्याचे शिवधनुष्य पेलावे लागले. २०१२ मध्ये धोनीने सलामीच्या स्थानासाठी बदलते धोरण स्वीकारले आणि सेहवागच्या क्षेत्ररक्षणाबाबतही ताशेरे ओढले. त्या वेळी धोनी-सेहवाग वादाला खमंग फोडणी देण्याचे कार्य प्रसारमाध्यमांनी चोख केले होते. तिथूनच सेहवागच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली. काही वर्षांनी डोळ्यांच्या समस्येनेही त्याला घेरले. त्यामुळे चश्मेबद्दूर वीरू मैदानावर अवतरला. पण त्याच्या फटकेबाजीचे काव्य हरवल्याची प्रचीती मैदानांवर येऊ लागली. मैदानी ‘वीर’ (वीरू) रसाच्या शोधात सेहवाग बराच काळ झगडला. आयपीएलच्या लिलावातही त्याचा भाव घसरला, पण तरीही तो खचला नाही. क्रिकेट हा श्वास मानणाऱ्या सेहवागने आयपीएल, स्थानिक क्रिकेटमध्ये जोमाने प्रयत्न केले. अखेरीस त्याला कळून चुकले की आता थांबायला हवे. त्यामुळे तितक्याच मुक्त आणि स्पष्टपणे त्याने क्रिकेटला अलविदा केला, पण त्याच्या खेळींचे मुक्तछंदातले साहित्य सदैव क्रिकेटरसिकांच्या मनांवर अधिराज्य गाजवील.