News Flash

हवा अंधारा कवडसा..

पत्रकारिता.. प्रामाणिक पत्रकारिता..करणाऱ्याच्या आयुष्यात असे प्रसंग अनेकदा येतात.

संग्रहित छायाचित्र

आपल्याला वाटतं तसं जगात फक्त काळं आणि पांढरं इतकंच माणसांचं वर्गीकरण नसतं. पांढऱ्याशुभ्र जनांत काही तरी काळेपण असू शकतं आणि ज्याला आपण काळाकुट्ट म्हणून ओळखत असतो त्यात कुठेतरी श्वेतधवल पट्टे असू शकतात. याचा अर्थ इतकाच की माणसांची नायक आणि खलनायक अशी आणि इतकीच प्रतवारी करणं चूक आहे..

पत्रकारिता.. प्रामाणिक पत्रकारिता..करणाऱ्याच्या आयुष्यात असे प्रसंग अनेकदा येतात. जेव्हा व्यवस्थेतले शीर्षस्थ.. मग ते कधी शिक्षणसम्राट असतात, कधी कोणत्या खात्याचे मंत्री असतात, कधी वरिष्ठ नोकरशहा असतात, कधी एखाद्या कोणत्या नामांकित संस्थेचे प्रमुख असतात, कधी महत्त्वाच्या रुग्णालयाचे संचालक असतात किंवा कधी कधी थेट मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानच असतात..सलगीने पत्रकाराच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात : तुमचं आणि आमचं ध्येय एकच आहे. समाजाचा विकास. तेव्हा या विकासासाठी आपण खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजे.. या विकासाच्या लढाईत तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे..

असाच संवाद ‘द बोस्टन ग्लोब’ या वर्तमानपत्राचा संपादक मार्टी बॅरन आणि बोस्टनचे आर्चबिशप काíडनल बर्नाड लॉ यांच्यात होत असतो. प्रसंग असाच. धर्मगुरूंनी या संवादासाठी शोधून काढलेला. आणि त्याला निमित्त होतं बोस्टन ग्लोबचे शोधपत्रकार हाती घेत असलेल्या बातमीचं. बोस्टनमधल्या काही ख्रिश्चन धर्मगुरूंनी लहान मुलांवर केलेल्या लंगिक अत्याचारांचा वृत्तमाग बोस्टन ग्लोब घेत असतं. बातमी साहजिकच खळबळजनक. छापून आली तर इतक्या मोठय़ा धर्मसंस्थेची पापं वेशीवर टांगण्याचं पुण्य निश्चितच वर्तमानपत्राच्या नावावर जमा होणार. तेव्हा ती छापून येऊ नये अशी चर्चची इच्छा असणं तसं साहजिकच. त्याच हेतूनं आर्चबिशप लॉ हे संपादक बॅरन याला म्हणतात : शहराशी संबंधित सर्व यंत्रणा एकदिलाने काम करत असतील तर त्या शहराची प्रगती होते. तेव्हा कधी काही मदत लागली तर सांगायला अनमान करू नकोस. आपण एकत्र काम करायला हवं.

त्यावर संपादक बॅरन यानं दिलेलं उत्तर तमाम पत्रकार आणि वाचक या दोघांनीही निश्चितच लक्षात ठेवायला हवं.

तो म्हणतो : मदतीच्या इच्छेबद्दल धन्यवाद. पण वर्तमानपत्राला आपलं नियत कर्तव्य चोख पार पाडायचं असेल तर त्याचं धोरण एकला चालो रे.. असंच असायला हवं. याचा अर्थ असा की वर्तमानपत्रानं आपल्याबरोबर कोण आहे कोण नाही याची फिकीर करू नये.

* * *

हा प्रसंग आहे ‘स्पॉटलाइट’ या सिनेमातला. नुकतंच सर्वोत्कृष्ट सिनेमाचं ऑस्कर त्याला मिळालं. सत्य घटनेवर आधारित आहे तो. बोस्टन ग्लोब या वर्तमानपत्रानं शहरातल्या चर्चमधले धर्मगुरूंचे हे असले घृणास्पद प्रकार खरोखरच उघडकीस आणले. ते करताना व्यवस्था आणि वर्तमानपत्रं यांच्यातल्या संघर्षांची कहाणी म्हणजे हा सिनेमा. तो अस्वस्थ करत नाही. आदळआपट करत नाही. उगाच संदेशिबदेश द्यायला जात नाही. वर्तमानपत्राला नायकत्व देत धर्मगुरूंना तो खलनायक ठरवत नाही. दुष्ट आणि सुष्टांच्या लढाईत सुष्ट कसे जिंकले याची बाळबोध कहाणी तो सांगत नाही. तो फक्त जे काही घडलं ते दाखवतो. आणि महत्त्वाचं म्हणजे खरोखर त्या काळची वातावरणनिर्मिती करून ते दाखवतो.

तो भावतो त्यातल्या विषयामुळे आणि वास्तव दर्शनामुळे. त्यातनं चित्रकर्मीचा गृहपाठ दिसतो. तो फारच महत्त्वाचा. (तो नसला की चित्रपट किती हास्यास्पद होतो हे समजून घ्यायचं असेल त्यांनी कटय़ार काळजात घुसली वा नटसम्राट पाहावा. कटय़ारमधल्या हास्यास्पद पगडय़ा, खाँसाहेबांचा भीषण अभिनय, सत्तरच्या दशकातला असूनही नटसम्राटमध्ये सहज दिसणाऱ्या पाचशे रुपयांच्या नोटा, कोणाचे तरी वडील हरवले म्हणून सगळ्यांना बडवत सुटलेले पोलीस.. ही सर्व कच्च्या गृहपाठाची उदाहरणं. अशी अनेक देता येतील. असो.) या उलट ‘स्पॉटलाइट’. त्यातलं वर्तमानपत्राचं कार्यालय, तिथले ताणतणाव, बातमीची उत्सुकता, बातमीदाराचा अभिनय करणाऱ्यांचं वागणं, संपादक, त्यावेळचा समाज, धर्मसत्तेची प्रतिक्रिया. यात सगळं सगळं काही खरं आहे. पण तेच काही त्याचं मोठेपण नाही. हा सिनेमा महत्त्वाचा ठरतो आणखी एका खरेपणासाठी.

खऱ्या पत्रकारितेसाठी.

पत्रकारिता या व्यवसायाचं एकंदरच घाऊक मनोरंजनीकरण होत असताना आणि ‘‘आता काय बुवा लोकांना वाचायलाच आवडत नाही..’’, असं स्वत:च म्हणणाऱ्या संपादकांची वर्दळ आपल्याकडे वाढत असताना हा सिनेमा डोळ्यात झणझणीत अंजन घालतो. वर उल्लेखलेल्या प्रसंगाबरोबरच त्यातला एक संवाद अशा पत्रकारितेचं महत्त्व अधोरेखित करणारा आहे.

संपादक बॅरन त्याच्या सहकाऱ्यांना धर्मगुरूंची बातमी कशा पद्धतीनं आपण देणार आहोत, ते सांगत असतो. या चच्रेत एक वार्ताहर लंगिक दुष्कृत्यं करणाऱ्या धर्मगुरूंची नावं सांगतो. तरी संपादक स्तब्धच. त्याच्या चेहेऱ्यावर काहीच भाव नाहीत. मग सहसंपादक यावेळी या संदर्भातील कायद्याचा दाखला देतो आणि म्हणतो.. म्हणजे आपण या व्यक्तींची गरकृत्यं आणि कायद्यातल्या त्रुटी दाखवणार तर..  त्यावर संपादक बॅरन म्हणतो : आपण व्यक्तीच्या विरोधात नाही तर व्यवस्थेच्या विरोधात आहोत. त्रुटी दाखवायच्या आहेत त्या व्यक्तीतल्या नाही तर व्यवस्थेमधल्या.

किती महत्त्वाचा मुद्दा आहे हा. तो सहजपणे आपल्याला व्यवस्था ही व्यक्तीच्या वरच असायला हवी, ते सांगून जातो.

हा झाला पत्रकारांनी, माध्यमांनी या सिनेमातून काही शिकावं असा भाग.

* * *

आता जनतेविषयी.

जनतेनं शिकायचं हे की कोणतीही एक वा अनेक व्यक्ती म्हणजे व्यवस्था नव्हे. यात धर्मगुरूंना उघडय़ा पाडणाऱ्या संपादकाचं उदात्तीकरण नाही की अनतिक कृत्यं करणाऱ्या धर्मगुरूंची जाहीर निर्भर्त्सना करणं वगरे दिखाऊ प्रकार नाहीत. बोस्टन ग्लोबचे पत्रकार धर्मगुरूंच्या लंगिक विकृतीचे बळी शोधण्यासाठी जंगजंग पछाडतात. त्यांना भेटतात तेव्हा त्यातला प्रामाणिकपणा मोठा अनुभवण्यासारखा आहे. त्यात उगाच नाटय़ नाही, भावनांचे कढ नाहीत की रडारड नाही. सगळं कसं सरळ. जसं घडलं तसंच. पण यात आपल्या जनतेला शिकण्यासारखं काय?

हेच की आपल्याला वाटतं तसं जगात फक्त काळं आणि पांढरं इतकंच माणसांचं वर्गीकरण नसतं. पांढऱ्याशुभ्र जनांत काही तरी काळेपण असू शकतं आणि ज्याला आपण काळाकुट्ट म्हणून ओळखत असतो त्यात कुठेतरी श्वेतधवल पट्टे असू शकतात. याचा अर्थ इतकाच की माणसांची नायक आणि खलनायक अशी आणि इतकीच प्रतवारी करणं चूक आहे.

याच टप्प्यावर चांगल्या माध्यमांचं काम सुरू होतं. ते म्हणजे समाजाला जो नायक वाटतोय त्याच्यातलं खलनायकत्व दाखवून त्याला अधिक चांगला नायक व्हायला भाग पाडायचं. ‘स्पॉटलाइट’ नेमकं तेच दाखवतो. अलगदपणे. कोणताही अभिनिवेश नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली बातमी खरी ठरल्यावर राजकीय व्यासपीठावर जाऊन भाषणं ठोकणं नाही. ‘अमुक तमुक इम्पॅक्ट’ असं स्वत:चं स्वत:च बावळट कौतुकही या संपादकाकडनं होत नाही. पण म्हणूनच उत्तम पत्रकारितेचा पुलित्झर पुरस्कार त्याला मिळतो.

ही बोस्टन ग्लोबची सत्यकथा समजून घेताना आपल्याला आणखी एक आश्चर्य वाटतं. ते म्हणजे इतक्या वादग्रस्त बातम्या देऊनही धर्मगुरूंच्या संयत प्रतिक्रिया. कोणीही या वर्तमानपत्रावर बहिष्काराची हाक देत नाही, त्याचे अंक जाळले जात नाहीत की बातम्या देणाऱ्यांना वा संपादकांना..‘बघून घेऊ’चे फोन येत नाहीत.

त्याचमुळे ‘स्पॉटलाइट’ हा केवळ सिनेमा नाही. तो प्रकाशझोत आहे..आपल्या अंधारावरचा.. या अंधारावर कसा कवडसा हवाय ते शिकवणारा.

girish.kuber@expressindia.com

 @girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2016 5:43 am

Web Title: journalism real journalism
टॅग : Journalism
Next Stories
1 नव्या बुडबुडय़ाकडे..
2 ग्राहकहिताचे राष्ट्रप्रेम..
3 जे कधीच नव्हते त्याची..
Just Now!
X