खरे तर हे प्रकरण होतं आगीचं.  संशय घ्यावा असंही त्यात काहीच नव्हतं. तरी विमा कंपनीतील एका अधिकाऱ्याला या आगीतून  माणूस सुखरूप वाचला कसा, हा प्रश्न सतावू लागला.  त्याने शोध घेतल्यानंतर  एका उपकरणामुळे वेगळीच धक्कादायक माहिती समोर आली..

फिटनेस ट्रॅकरमुळे एक छान सोय होते. काही निर्धारित अंतर चालण्याचा, धावण्याचा वगैरे व्यायाम करता येतो. शरीरातली चरबी आज किती जाळली ते कळतं. किती जाळायला हवी त्याचं लक्ष्य निर्धारित करता येतं. व्यायाम केलाय की नाही त्याची नोंद होते आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्या दिनचर्येत कमीजास्त काही करता येतं. परत ही सगळी माहिती आपल्या हातातल्या मोबाइलला पुरवली जाते. त्यामुळे या सगळ्या नोंदी कशा आपसूक होत जातात. काही लक्षात ठेवायला लागत नाही. तेव्हा या सगळ्या गुणवैशिष्टय़ांमुळे हे फिटनेस ट्रॅकर आल्यापासून वापरायची सवय लागलीये.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

तर एकदा काय झालं हा हातावरचा ट्रॅकर आणि मोबाइल यांच्यातला संपर्क तुटला. म्हणजे ट्रॅकरमधली माहिती मोबाइलमध्ये जाईचना. दोन दिवस गेले. शेवटी ट्रॅकर कंपनीच्या कॉल सेंटरला फोन केला. अमेरिकी उच्चारशैलीत तिथल्या माणसानं स्वागत केलं. विचारलं काय झालंय. सांगितलं त्याला. त्यानं पत्ता विचारला. तोही दिला. तो म्हणाला, एक मिनिटभर फोनवरच राहा. मी बघतो.

साधारण मिनिटभरानं तो फोनवर आला. म्हणाला, तीन दिवस ही माहिती फोनवर दिली गेलेली नाही. म्हटलं हो, म्हणूनच तुम्हाला फोन केला. पण तो पुढे जे काही म्हणाला त्यानं धक्काच बसला. या तीन दिवसांत तुम्ही पुण्यात होतात.. नंतर दक्षिण मुंबईत एका कार्यक्रमात चार तास होतात.. मग या ठिकाणी होतात.. तिकडे गेला होतात.. वगैरे वगैरे. थोडक्यात या तीन दिवसांतल्या सर्व हालचाली या हातावरच्या ट्रॅकरनं आपल्या मूळ धन्याला कळवल्या होत्या. आणि तंत्रज्ञानाचा विकासही इतका की त्या कॉल सेंटरवरच्या अनभिज्ञ व्यक्तीनं जिथे कुठे तो होता तिथून माझ्या हातावरच्या मोबाइलमध्ये ही सगळी माहिती क्षणार्धात भरून दिली.

गेल्या आठवडय़ात ओहायोतल्या रॉस कॉम्प्टन याचं जे काही झालं त्यावरनं या फिटनेस ब्रँडचा प्रसंग आठवला.

झालं असं की रॉस यांच्या घराला आग लागली. मोठा गंभीर प्रसंग. घराचं बांधकाम सगळं लाकडी. घरातलं सामानसुमान बरंचसं लाकडी. त्यामुळे आग पसरायला वेळ लागला नाही. ती इतक्या झपाटय़ानं पसरत गेली. त्यात आगीमुळे पसरणारा धूर. समोरचं काही दिसेना आणि काय करावं काही सुचेना.

तरीही रॉस यांची तत्परता इतकी की त्या वातावरणातही त्यांनी घरातली रिकामी बॅग शोधून काढली. त्यात आपला लॅपटॉप वगैरे भरला. आणखी काही महत्त्वाचे असे घरातले जिन्नस होते तेही बॅगेत भरले. त्यांनी एका हातात ती बॅग घेतली आणि दुसऱ्या हातानं घरातल्या काठीनं खिडकीच्या काचा फोडल्या. तळमजल्यावरच घर होतं त्यांचं. त्यामुळे आपल्याला लगेच पळता येईल हे त्यांना माहीत होतं. त्यांचा अंदाज खरा होता. खिडकीच्या काचा फोडल्या गेल्यामुळे रॉस सुखरूप बाहेर पडू शकले.

त्यानंतर अग्निशमन अधिकाऱ्यांनी इमारतीचा ताबा घेतला. आग विझवली. सुदैवाने जीवितहानी अशी काही तीत झाली नाही. सगळेच्या सगळे रहिवासी सुखरूप वाचले. कोणालाच काही झालं नाही.

मग रीतसर चौकशी. आगीच्या कारणांचा शोध. इमारत दोन मजली होती. म्हणजे तळमजला आणि आणखी एक. शनिवार-रविवार नसल्यानं इमारतीत कोणी घरात नव्हतं. सगळेच कामानिमित्त बाहेर पडलेले. म्हणजे इमारतीत एकच व्यक्ती. रॉस कॉम्प्टन. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला चांगलंच महत्त्व आलं. जे काही घडलं ते त्यांनाच माहीत होतं आणि त्यांनीच ते अनुभवलेलं होतं. हे लक्षात घेऊन रॉस यांनी आपल्याला कोणत्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं याचं अगदी सविस्तर वर्णन केलं. आग लागल्याचा अंदाज पहिल्यांदा कधी आला तिथपासून ते आपण काचा फोडून बाहेर कसे आलो इथपर्यंत रॉस यांनी सगळी कहाणी अगदी उत्तमपणे नमूद केली. त्यांच्या प्रसंगावधानाने अग्निशमन अधिकारी फारच प्रभावित झाले. हे असं बॅग भरून महत्त्वाच्या वस्तू घेऊन घर सोडणं म्हणजे तर फारच कौतुकास्पद कृत्य. हे करणाऱ्या रॉस यांच्यावर त्यामुळे कौतुकाचा वर्षांव होत होता.

अपवाद फक्त एकाचा. अग्निशमन दलातला जो विम्याचं प्रकरण हाताळणारा होता त्याचा काही या कहाणीवर विश्वास बसत नव्हता. आगीच्या ज्वाळा दैत्याच्या लाल लाल जिभांसारख्या चहूबाजूंनी एकदा का घेरायला लागल्या की भल्याभल्यांचा धीर सुटतो. आपण वाचणार की नाही हे कळेनासं होतं. आणि अशा वेळी ही व्यक्ती अगदी प्रवासाला निघाल्यासारखी बॅग वगैरे भरून घर सोडण्याइतका डोक्याचा शांतपणा कसा काय दाखवू शकते? हा प्रश्न त्या कर्मचाऱ्याला पडला होता. पण त्याचं उत्तर काही मिळत नव्हतं. परिस्थितीजन्य पुरावा होता तो असा साधासरळ. आग लागली आणि त्यात अडकून पडलेल्या कोणा एकानं आपल्या घराची काच फोडून अंगणात उडी मारून जीव वाचवला. वरवर पाहता इतकी साधी सोपी सरळ घटना ही. पण त्यातल्या एकाचा त्यावर विश्वास बसत नव्हता, एवढं मात्र खरं. पण आपला अविश्वास व्यक्त कसा करायचा आणि त्याहूनही मुख्य म्हणजे तो सिद्ध कसा करायचा, हे काही त्याला कळत नव्हतं. त्यानं आपली ही घालमेल दुसऱ्या एका सहकाऱ्याला बोलून दाखवली. तोही विचार करायला लागला.

पण केवळ योगायोग! नंतर केवळ योगायोगानं हे दोघे अग्निशमन दलाच्या वैद्यकतज्ज्ञाशी बोलत होते. या वैद्यकतज्ज्ञाच्या भूमिकेला महत्त्व होतं. कारण आगीच्या विम्याचा वगैरे तपशील तो हाताळत होता. म्हणजे विम्याचे पैसे मिळण्यासाठी सर्व संबंधितांना या वैद्यकाचं प्रमाणपत्र आवश्यक होतं. त्यासाठी तयारी करत असताना या डॉक्टरच्या एक लक्षात आलं आणि तो चमकला.

रॉस कॉम्प्टन यांच्या छातीत पेसमेकर बसवलेला होता. गंभीर स्वरूपाच्या हृदयशस्त्रक्रियेनंतर रॉस यांच्या छातीत हा पेसमेकर बसवावा लागला होता. रॉस यांचं हृदय अशक्त होतं. ते पूर्ण ताकदीनं काम करत नव्हतं. त्यामुळे रॉस यांच्या हृदयाला मदत म्हणून हा पेसमेकर काम करत होता.

ते डॉक्टर म्हणाले, हा तपासून पाहू या. त्याची माहिती मिळवण्यासाठी अग्निशमन यंत्रणा आणि डॉक्टर यांनी न्यायवैद्यकाची अनुमती मागितली. ती मिळाली. त्यानंतर या पेसमेकरमधली माहिती.. डेटा.. संकलित केला गेला. त्यातून सत्य उघड झालं.

ते असं होतं की रॉस म्हणत होते त्याप्रमाणे त्यांना कोणतीही धावपळ करावी लागली नव्हती. खिडकीची काच फुटली होती हे नि:संशय. पण तीमधून उडी वगैरे मारली हा शुद्ध बनाव होता. पेसमेकरचा डेटा दाखवत होता धाप लागेल, हृदयाची गती वाढेल अशी कोणतीही शारीरिक हालचाल रॉस यांनी केली नव्हती.

हा डेटा न्यायालयात दिला गेला.

हे पहिलं प्रकरण आहे ज्यात पेसमेकरचा डेटा पुरावा म्हणून ग्राह्य़ धरला गेला. आता खोटी माहिती दिल्याप्रकरणी रॉस यांच्यावर खटला भरला गेलाय. या आगीत त्यांचे काय हितसंबंध होते याचीही चौकशी सुरू झालीये. पण मुद्दा तो नाही.

तो आहे आपल्यावर कोण कोण डोळा ठेवणार हा. व्यक्तिस्वातंत्र्यवादी अमेरिकी संघटनांनी या सगळ्याला विरोध सुरू केलाय. ही अशी नवी उपकरणं आपल्या खासगी आयुष्यावर गदा आणतायत, असं त्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या एका टीव्ही कंपनीची चौकशी सुरू झालीये. कारण हा टीव्ही घरातल्यांवरही नजर ठेवतो, असा आरोप आहे. हे वाढत चाललंय आता.

कोणी तरी आहे तिथं.. हे कळलंच होतं. आता इथंही आहे कोणी तरी हे लक्षात येतंय.

 

गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

@girishkuber