19 March 2018

News Flash

मतभेदांतलं मांगल्य

१९८७ साली शिकागो विद्यापीठातले तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक अ‍ॅलन ब्लुम यांनी एक अप्रतिम पुस्तक लिहिलं

गिरीश कुबेर | Updated: October 7, 2017 6:51 AM

अमेरिकी पत्रकार ब्रेट स्टीफन्स

‘‘मतभेद व्यक्त करण्यासाठी ते मत आपण पहिल्यांदा समजून घ्यायचं. त्याच्या विचाराचं चिंतन, मनन करायचं. आणि ते झालं की त्या विचाराचा आणि तो मांडणाऱ्याचा संपूर्ण सन्मान करीत पूर्ण आदबीनं मतभिन्नता मांडायची..बौद्धिक मतभेद हे जिवंत समाजाचा आत्मा आहेत, हे लक्षात ठेवायचं.’’

‘‘मित्रांनो.. सर्वप्रथम या समारंभासाठी मला बोलावलंत त्याबद्दल आपले आभार. माझ्या भाषणाचा विषय आहे The Dying Art Of Disagreement.. मरणपंथाला लागलेले मतभेद. हा मुद्दा माझ्यासाठीच असं नाही तर आपल्या समाजासाठीदेखील अत्यंत महत्त्वाचा आहे. मतभेद हे आपल्या समाजाच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहेत.

‘मला मान्य आहे’, असं म्हणणं.. मग ते एखाद्या संघटनेचं सदस्यत्व असेल, राजकीय पक्ष, धार्मिक संघटनेचं म्हणणं असेल.. हे कोणत्याही समाजाच्या, समुदायाच्या स्थिरतेसाठी आवश्यक असतं. पण ‘मला मान्य नाही’ असं सांगण्याची ताकद ही लोकशाही व्यवस्थेस स्थिरत्वाकडून प्रगतिपथावर नेण्यासाठी आवश्यक असते. या तीन शब्दांत आपल्या दृष्टिकोनास विस्तारण्याची, सहिष्णुतेची पातळी वाढवण्याची आणि बौद्धिक चैतन्य फुलवण्याची क्षमता असते. गॅलिलिओ, डार्विन, मंडेला असे अनेक जण ‘मला मान्य नाही’ या तीन शब्दांच्या क्षमतेनं मोठे झाले.

पण आता मला मान्य नाही, असं म्हणायची ताकद आपण गमावून बसतोय का?

१९८७ साली शिकागो विद्यापीठातले तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक अ‍ॅलन ब्लुम यांनी एक अप्रतिम पुस्तक लिहिलं. ब्लुम हे प्लेटो, रूसो यांच्या सुगम भाषांतरासाठी ओळखले जातात. त्यांच्या नव्या पुस्तकाचं नाव द क्लोझिंग ऑफ अमेरिकन माइंड. अमेरिकेचं मन बंद होताना.. असं. हे पुस्तक प्रकाशित झालं त्या वेळी मी महाविद्यालयात होतो. प्लेटो, वेबर, स्ट्रॉस अशांचं वाचण्याइतका मोठा नव्हतो. पण ब्लुम यांचं हे पुस्तक मी वाचलं. त्यानंतर ठरवलं.. शिकागो विद्यापीठातच पुढचं शिक्षण घ्यायचं.

आता मी विचार करतोय, की मी काय शिकलो या विद्यापीठात? पुराणमतवाद, परंपरावाद हे तर नक्कीच नाही. आम्हाला धर्मावर प्रेम करा अशी शिकवण दिली गेली नाही. आम्ही सच्चे अमेरिकी देशभक्त व्हायलाच हवं असा आमच्या शिक्षकांचा आग्रह नव्हता. मार्क्‍सवाद, भांडवलशाही किंवा अगदी पाश्चात्त्यांचा चंगळवाद यातल्या कशावर तरी आम्ही प्रेम करायलाच हवं असं आम्हाला कोणी सांगितलं नाही किंवा कधी सुचवलंही नाही. खरं तर पारंपरिक अर्थानं आपण ‘शिकवणं, शिक्षण देणं’ म्हणतो तसं कधी कोणी आम्हाला ‘शिकवलं’ होतं की नाही, हासुद्धा मला आता प्रश्न पडतो.

मग आम्ही काय करायचो विद्यापीठांत?

वाचायचो. भरपूर वाचायचो आणि वाचलेल्यावर प्रश्न विचारायचो. वाचलेलं ताडून बघायचो. वाचलेल्यापेक्षा प्रत्यक्ष वेगळं काही वाटलं तर हे असं का, असा प्रश्न आम्हाला पडायचा. त्याचं उत्तर मिळेपर्यंत आम्ही त्या प्रश्नाचा पिच्छा सोडायचोच नाही. हे आमचं शिकणं होतं. वर्गात शिक्षक आणि विद्यार्थी अशा औपचारिक संबंधांतून जे दिलं जातं त्यापेक्षा हे कितीतरी मोठं होतं. एका अर्थी आमचं शिक्षण म्हणजे स्वत:ला चौकस ठेवण्याचा एक धडा होता.

वाचायचं. समजून घ्यायचं. प्रश्न विचारायचे. उत्तरं घ्यायची. त्या उत्तरांवर प्रश्न विचारायचे. वाद घालायचे. जगातलं कोणतंही तत्त्व पवित्र, अंतिम सत्य वगैरे नाही आणि कोणताही विचार अपवित्र, क्षणभंगुर वगैरे नाही.. ही आम्हाला दिली गेलेली शिकवण होती. आम्ही विचार करायला हवा, प्रश्न विचारायला हवेत.. यासाठी आम्हाला उत्तेजन देणारे आमचे शिक्षकच होते. उदारमतवाद आणि उदारमतवादाचं शिक्षण म्हणजे काय ते आम्ही अनुभवलं. या काळात एक दिव्य विचाराचा साक्षात्कारच आम्हाला झाला.

काळाच्या ओघात महान ठरलेला कोणताही विचार हा त्या काळातील प्रस्थापित विचारांशी व्यक्त केलेला मतभेद असतो.

सॉकेट्रिसचे त्या वेळी होमरशी मतभेद होते. अ‍ॅरिस्टॉटल तर प्लेटोशी भांडला होता. लॉक आणि हॉब्स यांच्यातही तीव्र मतभेद होते आणि रूसो तर या दोघांशी वैचारिक वाद घालायचा. आणि नित्शे कोणाशी भांडला नाही? विटगेनस्टेन आयुष्यभर स्वत:शीच संघर्ष करत बसला.

यातला एकही मतभेद वैयक्तिक नव्हता. तो राजकारणाच्या क्षुद्र संकल्पनेतून दिसणारा राजकीय वादही नव्हता. यातले कित्येक वाद तर यातला एखादा निवर्तल्यानंतर दशकांनी, शतकांनीसुद्धा झालेत. पण यातली लक्षात घ्यायलाच हवी अशी बाब म्हणजे हे वाद कधीही गैरसमजावर आधारलेले नव्हते. किंबहुना एखाद्या विचाराच्या पूर्ण आकलनानंतरच त्याबाबत मतभेद निर्माण होऊ शकतात. एखादा विचार इतका आत्मसात करायचा की तो उच्छ्वासातूनही बाहेर पडावा. याचा अर्थ असा की मतभेद व्यक्त करण्यासाठी ते मत आपण पहिल्यांदा समजून घ्यायचं. त्याच्या विचाराचं चिंतन, मनन करायचं. आणि ते झालं की त्या विचाराचा आणि तो मांडणाऱ्याचा संपूर्ण सन्मान करीत पूर्ण आदबीनं मतभिन्नता मांडायची. ती मांडत असतानादेखील ज्या विचाराशी आपण मतभेद व्यक्त करीत आहोत तो विचार आपणास मान्य व्हावा यासाठी प्रतिवादाद्वारे प्रयत्न होऊ शकतो याचं भान बाळगायचं आणि त्यासाठी मनाचा मोकळेपणा कायम राखायचा.

‘द क्लोझिंग ऑफ द अमेरिकन माइंड’ या पुस्तकाला अमेरिकी विद्यापीठातल्या या सळसळत्या वादांची पार्श्वभूमी आहे. अ‍ॅलन ब्लुम त्यात दाखवून देतो की उदारमतवादी लोकशाहीच्या रक्षणासाठी उदारमतवादी शिक्षितांची गरज असते. वैचारिक मुक्तता ही काही केवळ परिसंवादी शब्दयोजना असून चालत नाही. ‘मला तुझे मत मान्य नाही’ असं म्हणणाऱ्याचंही स्वागत करण्याची वृत्ती ही निगुतीनं जोपासावी लागते.

आता ही वृत्ती आपल्या विद्यापीठांतनं लोप पावतीये का?

ब्रुकिंग्जनं केलेल्या पाहणीनुसार विविध विद्यापीठांतल्या तब्बल ४४ टक्के विद्यार्थ्यांना आपल्याला ‘हेट स्पीच’ देण्याचा अधिकारही घटनादत्त आहे, हेच माहिती नाही. म्हणजे आपण कितीही टोकाचा विचार मांडला तरी तो मांडणाऱ्याचं रक्षण करणं ही व्यवस्थेची जबाबदारी हेच त्यांना ठाऊक नाही. अन्य ५१ टक्क्यांना वाटतं आपल्या विरोधी मत मांडणाऱ्याला दांडगाईनं गप्प बसवण्यात काहीही गैर नाही. कहर म्हणजे एखादा विचार मांडणाऱ्याला गप्प करण्यासाठी हिंसाचार योग्यच आहे असं २० टक्के विद्यार्थ्यांचं मत आहे.

ही ‘विचारधारा’ (?) आता सर्वच विद्यापीठांत दिसू लागलीये. कॅलिफोर्निया विद्यापीठात इस्रायली राजदूत आयकेल ओरेन यांचं भाषण विद्यार्थ्यांनी बंद पाडलं, बर्कलेत बेन शापिरो यांना तर सुरक्षा रक्षकांना घेऊनच जावं लागलं, दुसऱ्या एका महाविद्यालयात हीथर मॅक्डोनल्ड यांना प्रवेशच करता आला नाही, येलमध्ये एरिका आणि निकोलस ख्रिस्टाकिस यांची हुर्यो उडवली गेली..

हे असले प्रकार होऊ लागलेत त्याचं एकच कारण आहे.

ते म्हणजे शिक्षणाची गाडी रुळावरून घसरलीये. अशिक्षण म्हणजे शिक्षण असं आपल्याला वाटू लागलंय. विचारस्वातंत्र्य, उदारमतवाद म्हणजे काय हे नव्या पिढीला कळेनासंच झालंय. त्यामुळे उजव्या किंवा डाव्या बाजूला झुकल्याखेरीज आपल्याला पर्यायच नाही, असं विद्यार्थ्यांना वाटतं हल्ली. नागरिक शिक्षण या संकल्पनेचा पार चुथडा करून टाकलाय आपण. हे असे नासमज विद्यार्थी मग महाविद्यालयात जातात. तिथे मग त्यांची ओळख होते ती अमुक धर्माचा/वर्णाचा/लैंगिकतेचा वगैरे वगैरे. म्हणजे सामाजिक भूमिका हाच त्यांचा परिचय. मग प्रत्येक जण पुढे प्रयत्नात असतो ते आपला ‘परिचय’ दामटण्याच्या..

यातून मग उदय होतो अस्मितांचा. आयडेंटिटी पॉलिटिक्स. तो होताना वैचारिक प्रगल्भतेअभावी युक्तिवाद आणि शारीरिक इजा यांतील अंतरदेखील कमी कमीच होत चाललंय. अशा अस्मितांच्या समूहाला पटणार नाही असा युक्तिवाद कोणी केलाच तर तो केवळ अयोग्य ठरवून आपण थांबत नाही आता. तो युक्तिवाद अनैतिक ठरवू लागतो आपण आणि एखाद्या गोष्टीच्या कपाळावर अनैतिक म्हणून शिक्का मारला की तिला अस्तित्वाचा अधिकारच उरत नाही. आणि जिचं अस्तित्वच नाकारायचं आहे तिच्यावर चर्चा करायचीच कशाला.. असं म्हणत आपण प्रतिवादाची मुस्कटदाबीच करू लागतो.

हे अरिष्ट टाळायचं कसं?

बौद्धिक मतभेद हे जिवंत समाजाचा आत्मा आहेत, हे लक्षात ठेवायचं. विशेषत: माध्यमांनी. वाहतुकीचा व्यवसाय वा एखादी वस्तू विकणं आणि पत्रकारिता यात मूलत:च फरक आहे. काही देशांतील खाद्यपदार्थ सपक असतील पण तिथलं सरकार कार्यक्षम असू शकतं, हे ब्रिटनने दाखवून दिलं गेल्या शतकांत. काही देश असेही असतील की तिथल्या खाद्यपदार्थाना अवीट गोडी असेल पण सरकारं सपक आहेत. उदाहरणार्थ फ्रान्स.

पण असा एकही देश या भूतलावर आढळणार नाही की जिथे उत्तम पत्रकारिता नाही आणि तरीही सरकार, प्रशासन, मुक्तचिंतन आदींसाठी सुयोग्य वातावरण आहे. हे सर्व उत्तम हवं असेल तर तिथली पत्रकारिताही उत्तमच असायला हवी. कारण चांगली पत्रकारिता हा समाजोपयोगी सत्याकडे जाण्याचा दुवा असतो. मुक्त, तार्किक, समंजस आणि समजूतदार लोकशाहीसाठी हा दुवा जपायला हवा.’’

( पुलित्झर पुरस्कारविजेते अमेरिकी पत्रकार ब्रेट स्टीफन्स यांनी माध्यमांशी संबंधित ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील लोवी इन्स्टिटय़ूट येथे २३ सप्टेंबर रोजी दिलेल्या भाषणाचा संक्षिप्त आणि स्वैर अनुवाद.)

गिरीश कुबेर @girishkuber

girish.kuber@expressindia.com

 

First Published on October 7, 2017 3:50 am

Web Title: pulitzer prize winner american journalist bret stephens speech in sydney
टॅग Bret Stephens
 1. Devawrat Vidhate
  Nov 3, 2017 at 8:28 pm
  महाराष्ट्रातील फार कमी लोकांना माहित आहेत ही माणसं तरीपण सांगतो . बेन शापिरो , milo yiannopoulos , डग्लस मरे , पामेला गेल्लेर , ayaan hirsi ali , maryam namazie ह्या सर्वांची भाषणे बंद पाडली गेली युनिव्हर्सिटीएस मध्ये आणि या सर्व left wing universities होत्या हे सांगायला तुम्ही विसरले . आणि त्यातले ayaan hirsi ali , maryam नामाझियें या दोघी left wing आक्टिविस्ट असून त्याना बोलू दिला गेला नाही .कारण त्या EX - मुस्लिम होत्या म्हणून आणि आपल्या सारखे तिथे पण left विंग आणि मुस्लिम्स ह्याचे घनिष्ठ संबंध आहेत . आणि बाकीचे तर right wing वाले होते म्हणून ,त्यासाठी एवढा लांब जायची गरज नाही आपल्या JNU मध्ये काय चालला आहे ते बघा तिथे पण हें सर्व होतं आहे एव्हड्या वर्ष पासून पण तुम्हाला त्याचंच काई एवढा कवतिक काई माहित ..?
  Reply
  1. S
   sankalp
   Oct 27, 2017 at 1:33 pm
   Nehamich dusara sange bramhdyan ..Itaki nisapksh patrakarita ahe tar puravyavar adharit agralekh loksatta ne mage ka ghetala?
   Reply
   1. R
    rajendra
    Oct 9, 2017 at 6:16 am
    आपल्या पत्रकारांना पुढारलेल्या देशातल्या अश्या पत्रकार,लेखकांचे भारी बुवा कवतिक ! त्यांना साधी गोष्ट लक्षात येत नाही हे सगळे पुढारलेले देश प्रखर राष्ट्रवादाची कास घेऊनच प्रगत झाले आहेत म्हणून तर आज तुम्ही त्यांचे गुणगान गात आहात. आधी इथला राष्ट्रवाद चांगला फुलवा व आपल्या देशाला त्यांच्या पंक्तीला बसावा, मग इतरांना असे फुकाचे उपदेशामृत पाजा, कारण आज जिथे सामान्यांना कोरडी भाकर मिळायचे हाल त्यांना तुम्ही असा क्रीमचा केक कोंबायला चालला आहात !!
    Reply
    1. M
     Manoj
     Oct 8, 2017 at 4:37 am
     विचार करायला लावणारा लेख. पण काही प्रश्न पडतात. मतभेद मांडणे आणि विरोधासाठी विरोध यात फरक करावा का आणि कसा ? दोन्ही बाजूंचे ऐकून समतोल विचार करणे आणि कुंपणावर बसणे यात सीमारेषा कोणती ?
     Reply
     1. A
      Abhi Kapoor
      Oct 7, 2017 at 8:28 pm
      महान विचार.... भारतात सध्या या विचारांची खूप गरज आहे..
      Reply
      1. Load More Comments