28 January 2020

News Flash

येथे ‘कर’ माझे जुळती..

सध्या देशात सर्वत्र रोकड आणि रोकडरहित या दोन शब्दांची सर्वाधिक चर्चा आहे.

सध्या देशात सर्वत्र रोकड आणि रोकडरहित या दोन शब्दांची सर्वाधिक चर्चा आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाला आता ५० दिवस होत आले आहेत. परंतु, तरीही चलनकल्लोळ अद्याप संपलेला नाही. बँकांबाहेर दररोज लागणाऱ्या रांगा, एटीएममधील खडखडाट, जुन्या नोटांचा प्रश्न, दोन हजार रुपयांचे सुट्टे न मिळणं अशा रोजच्या बातम्यांमध्ये आता ठिकठिकाणी कोटय़वधींच्या नोटा पकडल्याच्याही बातम्या येत आहेत आणि त्याचबरोबर प्राप्तिकर भरण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या कडक निर्णयांची चर्चादेखील जोर धरत आहे. या पाश्र्वभूमीवर ‘प्राप्तिकर’ हा आपल्या सर्वाच्या जिव्हाळ्याचा तरीही गुंतागुंतीचा विषय ऐरणीवर आला आहे. जवळपास प्रत्येक नागरिकाचा प्राप्तिकराशी संबंध येतो (किंवा तो येत नाही ना, हे पाहण्यासाठीही त्याला प्राप्तिकराबाबत जाणून घ्यावेच लागते!). त्यातही नोकरदार मंडळींसाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय. परंतु, आपल्या आर्थिक जगण्याशी इतका जवळचा मुद्दा असतानाही प्राप्तिकराबाबत आपण नेहमीच गोंधळलेले असतो. अशा वेळी साहजिकच आपण चार्टर्ड अकांऊंटटकडे धाव घेतो. अशा वेळी त्याला त्याच्या सेवेचे शुल्क मोजावे लागते. परंतु, प्राप्तिकर कसा काढावा, याची माहिती आपण एकदा नीट समजावून घेतली तर, आपल्याला आयुष्यभर ते कठीण जाणार नाही.

अन्य क्षेत्रांप्रमाणेच प्राप्तिकर जाणून घेण्यासाठीही स्मार्टफोनच्या अ‍ॅपने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अँड्रॉइड व आयओएसच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये प्राप्तिकर दर्शवणारे असंख्य अ‍ॅप उपलब्ध आहेत. दर्शन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअिरगचे ‘इन्कम टॅक्स कॅल्क्यूलेटर’ (Income Tax Calculator) हे त्यातीलच एक अ‍ॅप. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या वार्षिक उत्पन्नावर किती प्राप्तिकर भरावा लागेल, हे सहज काढू शकता. याशिवाय हे अ‍ॅप तुम्हाला करपरतावा किती मिळेल, याचीही माहिती पुरवते. मासिक उत्पन्न, घरभाडे भत्ता, अन्य स्रोतांतून मिळणारे उत्पन्न, लघु तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न अशा प्रत्येक वर्गातील उत्पन्नाची गोळाबेरीज करून विविध कर कलमांतर्गत उपलब्ध असलेल्या वजावटीच्या आधारे तुम्हाला एकूण किती प्राप्तिकर भरावा लागू शकतो, हे या अ‍ॅपमधून समजू शकते. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या उत्पन्न आणि वजावटीचे आकडे नोंदवावे लागतील. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाइन करभरणा करणेही सहज शक्य आहे.

या अ‍ॅपमध्ये ‘क्विक टॅक्स कॅल्क्युलेटर’ही सुविधा आहे. त्याआधारे तुम्ही काही क्षणांत तुमचे आर्थिक तपशील नोंदवून प्राप्तिकराची माहिती मिळवू शकाल. हे अ‍ॅप तुम्हाला करमर्यादा, उपकर, अधिभार यांसह संपूर्ण तपशील पुरवते.

या अ‍ॅपद्वारे तुम्ही दोन वर्षांतील करपरतावाही पडताळून पाहू शकता. ८० क, ८०ड, ८०डड, ८०ईई अशा सर्व प्रकारच्या वजावटीबाबत या अ‍ॅपमध्ये माहिती आहे. ही सर्व माहिती नोंदवून येणारा कराचा तपशील तुम्ही पीडीएफ तसेच इमेजच्या स्वरूपात आपल्या मोबाइल अथवा संगणकावर साठवून ठेवू शकता.

या अ‍ॅपप्रमाणेच अनेक अ‍ॅप्स आहेत जे तुम्हाला प्राप्तिकराबाबत माहिती देऊ शकतील. ‘एम-गव्हर्नन्स’चेही ‘इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर’ हे अ‍ॅप आहे. परंतु, त्याबाबत वापरकर्त्यांनी तक्रारी केल्या असल्याने त्याचा तपशील येथे देण्यात आलेला नाही.

असिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com

First Published on December 24, 2016 12:30 am

Web Title: income tax calculator cashless transaction mobile payment apps
Next Stories
1 एका ‘टच’वर वीज बिल
2 गणिताशी मैत्री
3  ‘बोलता बोलता ‘नोट्स’
Just Now!
X