कुणी विचारले,  ‘‘कार्यालय’ म्हणजे काय?’’, तर आपण सहज उत्तर देऊ, ‘काम करण्याची जागा!’ पण ‘‘कार्यालय म्हणजे यापलीकडे काय असू शकते?’’ असे कुणी विचारले तर आपण जरा कोडय़ात पडू. आज शहरी, निमशहरी तसेच ग्रामीण भागातील कित्येक कामाच्या जागा या अत्यंत तणावपूर्ण असतात. कामाच्या वेळा, अपेक्षांचे दडपण, कामाच्या ठिकाणी असलेले राजकारण, एकमेकांमधील स्पर्धा यामुळे शरीरात थकवा व्यापून राहिलेला असतो.

अनेकांना कामाच्या ठिकाणी जाण्याकरिता वाहनाने प्रवास करावा लागतो, कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत:लाही पुरेसा वेळ देता येत नाही. सुट्टीच्या दिवशी हमखास जास्त झोप काढली जाते, बाहेरचे खाणे होते मात्र स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष केव्हा बरे द्यायचे! आजकाल कित्येक कार्यालयांमध्ये आरोग्यविमा काढून दिला जातो, जे स्वागतार्ह आहे, परंतु पुरेसे नाही. वर्षांकाठी रक्ताच्या चाचण्या केल्या, हाडांची ठिसूळता तपासली, कोलेस्टेरॉल तपासले, हृदयाचे आलेख काढून घेतले की तब्येत चांगली राहण्याची शाश्वती मिळते का आणि या चाचण्या करून घेण्यासाठी थोडीफार आर्थिक मदत पुरवली की कार्यालयांची जबाबदारी संपून जाते का, हे प्रश्न आपल्याला पडायला हवेत. कार्यालयांमध्ये तासन्तास बसून काम केल्याने पाठ दुखते, मान अवघडते, रोज बसून करावयाच्या कामांमुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते, कार्यालयात सकस आहार न मिळाल्याने तेलकट चायनीज किंवा वडापाववर पोट भरवले जाते, कार्यालयांमध्ये काही आरोग्यपूर्ण सोयी नसल्याने स्वच्छतेशी संबंधित आजार होतात, परंतु या सगळ्या गोष्टींवरचे उपाय मात्र आपण कार्यालयाच्या बाहेर शोधतो.

सुदृढ राहण्यासाठी कार्यालयापासूनच सुरुवात करायला काय हरकत आहे, असा विचार आता जगातील काही मोजकी कार्यालये करू लागली आहेत. खरे तर गेल्या काही दशकांपासून कार्यालयांमध्ये आरोग्यविषयक माहिती पुरवण्यासाठी डॉक्टरांच्या तासिका आयोजित करण्याचा उपक्रम काही कार्यालये राबवीत होती, परंतु अभ्यासातून असे लक्षात येऊ लागले की या माहितीचा प्रत्यक्ष उपयोग केला जाईलच असे नाही. ‘‘रोज पाच हजार पावले चाला’’, असे डॉक्टरने सांगूनही दिवसातून आठ तास बसून काम करणारा कर्मचारी ते अमलात आणण्याची शक्यता नगण्य असते. मग कार्यालयातच, काम करता करता किंवा कामातून थोडी फुरसत काढून अशा आरोग्यपूर्ण सवयी अंगीकारता आल्या तर!

कॅनडा आणि अमेरिकेतील ‘वर्कसाइट वेलनेस प्रोग्राम’ अर्थात कार्यालयीन आरोग्य-उपक्रम पाहिले तर असे लक्षात येते की कार्यालयीन आरोग्य-उपक्रम हे कर्मचाऱ्यावरील ‘उपकार’ म्हणून बघायचे नाहीत तर त्यांचा ‘हक्क’ म्हणून बघायचे, असा जणू दंडकच तेथील बहुतांश कार्यालयांनी घातलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणातून लक्षात आले की कॅनडामधील जवळजवळ ६० टक्के जनता ही बसून काम करते, सुमारे ३५ टक्क्यांहून अधिक जनतेला स्थूलतेने होणाऱ्या त्रासांनी ग्रासले आहे, ६६ टक्के लोकांना कामाच्या ठिकाणी तणावग्रस्त वाटते आणि २१ टक्के कर्मचारी कोणत्या ना कोणत्या प्रकारे धूम्रपान करतात. ग्लोबल बिझनेस आणि इकॉनॉमिक राऊंडटेबलच्या अहवालानुसार कर्मचाऱ्यांना येणाऱ्या मानसिक ताणामुळे कॅनेडीयन अर्थव्यवस्थेचे दरवर्षी सुमारे ३५ बिलियन डॉलर्सचे नुकसान होते. अमेरिकेतील सर्वेक्षणही असे सांगते की, कामाच्या ठिकाणी असलेला ताण हा आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर स्वरूप धारण करीत आहे. हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे महागडे आजार आज अमेरिकेत मोठय़ा प्रमाणावर दिसून येतात. आठवडय़ातील पाच दिवस कार्यालयांमध्ये काम करणारे लाखो लोक सुदृढ राहावेत यासाठी प्रयत्न करायचे असतील तर त्यांचा जास्तीत जास्त वेळ जिथे जातो त्या कार्यालयांपासूनच सुरुवात व्हायला हवी, याची जाणीव तेथे हळूहळू रुजते आहे! निरोगी कार्यालयांसाठी अत्यंत अभिनव कल्पना तेथील काही ठिकाणी राबवल्या जातात.

कॅनडामधील एका कार्यालयाच्या लक्षात आले की शाळा सोडली आणि लहानपण सरले की आपली ‘मधली सुट्टी’ अतिशय कंटाळवाणी होऊन जाते. आहे त्याच जागी बसून जेवण करत उखाळ्या-पाखाळ्या करण्यापेक्षा काही रंजक खेळ उपलब्ध करून दिले तर? त्यांनी कार्यालयाच्या मागच्या अंगणात एक छोटेखानी असे बास्केटबॉलचे मैदान तयार केले, कॉफी पिण्याच्या जागेवर ‘मंगळवार स्पेशल’ खोली तयार केली, जेणेकरून खोलीतच शरीराची भरपूर हालचाल होईल अशा स्पर्धा घेता येतील.

अमेरिकेतील ‘गुगल’ या कंपनीच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी सायकली ठेवलेल्या असतात. एका विभागातून दुसऱ्या विभागात जाण्यासाठी त्या उपयोगाला येतात. कार्यालयातील खाण्याच्या सर्व जागांमधील अन्नपदार्थावर रंगीत चिकटपट्टय़ा लावून कोणता पदार्थ किती सकस आहे, हे दर्शवलेले असते. कर्मचाऱ्यांनी आवर्जून ‘पॉवर नॅप’ काढावी अर्थात १५ मिनिटांची डुलकी काढावी यासाठी खोली असते आणि मनाला प्रसन्न वाटावे याकरिता प्रत्येक कर्मचाऱ्याच्या टेबलावर एक झाडाची कुंडी असते. इतकेच नाही तर कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या अंगणातील छोटीशी जागा त्यांची स्वत:ची बाग फुलवायला दिली जाते.

काही कार्यालयांमधील मुख्य अधिकाऱ्यांनी एक छान पद्धत सुरू केली आहे- चालता चालता मीटिंग. महत्त्वाचे मुद्दे कागदावर उतरवून घ्यायचे आणि ठरवलेल्या वेळेत कार्यालयाच्या अंगणात चालत चालत चर्चा करायची. या पद्धतीचा आणखी एक फायदा असा की यात अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील उच्च-नीचतेची भावना कमी व्हायला मदत होते, अधिक खुलेपणाने बोलता येते आणि ताणही कमी होतो.

स्टॉकहोम येथील स्थानकावर लोकांनी जिन्याचा वापर करावा याकरिता ‘पियानो स्टेअर’ची अनोखी कल्पना राबवली गेली आहे. प्रत्येक पायरी चढली की पियानोच्या एका सुराचा सुरेल आवाज निघतो आणि अगदी गर्दीच्या वेळीही तो जिना सुंदर संगीत निर्माण करीत राहतो. अशा पियानो जिन्याची कल्पना राबवण्यासाठी आता जगातील अनेक बडय़ा कंपन्या उत्सुक आहेत!

‘हेल्दी आय.यू.’ या इंडियाना ब्लूमिंगटन येथे आखल्या गेलेल्या उपक्रमात कार्यालयामध्ये ठिकठिकाणी आरसे, व्यायामाकरिता वापरायची वजने, माहिती आणि सोपे सोपे व्यायाम करण्यासाठीच्या खास जागा यांची सोय करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे १०-१० जणांचे गट बनवून त्यांना दर आठवडय़ाला एकत्रितपणे पूर्ण करण्याचे एखादे आव्हान दिले जाते. ‘‘तुम्ही दहा जणांनी मिळून पुढच्या आठवडय़ापर्यंत दहा हजार पायऱ्या चढायच्या’’, असे सांगितले की आपोआपच गटातील प्रत्येक जण हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न सुरू करतो. जो गट जिंकेल त्या गटाला आठवडय़ाला एखादे सकस आहाराचे कूपन भेट दिले जाते.

स्त्रियांच्या आरोग्याच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन आता कित्येक कार्यालये गर्भवती स्त्रियांना आवश्यक आणि सोयीस्कर अशा खुर्च्या, लहान बाळांना स्तन्यपान करता यावे यासाठी खोली, कार्यालयात किंवा जवळच पाळणाघराची सोय तसेच पाळीच्या दिवसांत गरज पडल्यास विश्रांती घेण्यासाठी एखादी आरामखुर्ची अशा अतिशय स्वागतार्ह सोयी पुरवीत आहेत.

भारतात अशा प्रकारच्या निरोगी कार्यालयांचा अभाव जाणवतो. आजही कित्येक कार्यालयांमध्ये स्वच्छतागृहे अत्यंत दयनीय अवस्थेत असलेली दिसतात. शहरी भागांमध्ये अत्यंत कमी प्रकाशात, काचेच्या, वातानुकूलित जागांमध्ये तणावाखाली तासन्तास काम करणारे कर्मचारी वाहनाने प्रवास करून थकून घरी पोहोचतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वातावरणात येतात ते स्वत:च्या गरजांकडे दुर्लक्ष करीतच! निमशहरी भागांत आणि खेडेगावांमध्ये बांधल्या गेलेल्या कार्यालयांमध्ये सकस आहार, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहे असतीलच याची शाश्वती नसते. अव्यावसायिक क्षेत्रांमध्ये तसेच आर्थिकदृष्टय़ा कमकुवत लोकांच्या कामाच्या ठिकाणी असणाऱ्या गरजा अर्थातच याहूनही अधिक गंभीर आहेत आणि त्यांचा अभ्यास होणे तितकेच गरजेचे आहे. समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी मी कुठून सुरुवात करायची, असा प्रश्न साहजिकच मनात येतो. ‘‘आपल्या कार्यालयापासून’’, असे या प्रश्नाचे एक त्यातल्या त्यात सोपे उत्तर असू शकते. छोटय़ा छोटय़ा बदलांपासून सुरुवात करीत एका निरोगी कार्यालयात काम करण्याचे ध्येय आपण ठेवू शकतो. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या अधिकारक्षेत्रात असणाऱ्या धोरणांमध्ये काही निरोगी कार्यालयासाठीचे धोरण अमलात आणले, तर या बदलांना सुरुवात होऊ शकेल. जास्तीत जास्त सर्जनशीलता वापरून असे कित्येक अभिनव उपक्रम राबवता येऊ शकतात. याला शासकीय कार्यालये अर्थातच अपवाद नाहीत! हे सगळे घडवून आणण्यासाठी अर्थातच गरजेचा आहे कार्यालयाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा आणि आपल्या सहकाऱ्यांप्रति जबाबदारीची जाणीव! तुमचे, तुमच्या घरातल्या सर्वाचे कार्यालय निरोगी आहे का?

मुक्ता गुंडी सागर अत्रे

gundiatre@gmail.com