मुंबई : बाजारातील प्रमुख निर्देशांकात वर्षांरंभापासून सुरू झालेल्या घसरणीमुळे निवडक उद्योगक्षेत्रातील समभाग गुंतवणुकीसाठी आकर्षक मूल्यांकनाला उपलब्ध असल्याचे मत आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी महेश पाटील यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केले.

‘काही निवडक कंपन्यांचा दीर्घकालीन नफा आणि उत्सर्जनातील वाढ होण्याची शक्यता विचारात घेता या कंपन्या आकर्षक मूल्यांकानाला उपलब्ध आहेत. कंपन्यांना कर्ज देणाऱ्या बँका आणि वैयक्तिक कर्जदारांना कर्ज वाटप करणाऱ्या बँकांच्या मूल्यांकनातील फरक लक्षात घेता आम्हाला कंपन्यांना कर्ज देणाऱ्या बँका आकर्षक मूल्यांकनात उपलब्ध आहेत असे वाटते. या बँकांच्या नफ्यातीचा आगामी तीन ते चार वर्षांतील वृद्धिदर लक्षात घेतला तर या बँका भविष्यात चांगला परतावा देतील,’ असा आशावाद महेश पाटील यांनी व्यक्त केंला.

बँकिंगव्यतिरिक्त औषधनिर्माण आणि उपभोगाच्या वस्तूंच्या निर्मात्यांचे समभागसुद्धा आकर्षक मूल्यांकनात उपलब्ध आहेत. नवीन औषधांच्या वितरणास अमेरिका-युरोपातील स्थानिक अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी मिळण्याचे दृष्टिपथात असल्याने या कंपन्यांना निर्यातीची दारे खुली होतील, असे ते म्हणाले. हवामान खाते आणि स्कायमेटच्या अंदाजानुसार या वर्षी भारतात दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज असून याचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला होणार असल्याने उपभोगाच्या वस्तू निर्मात्या कंपन्यांना त्याचा फायदा होईल असे ते पुढे म्हणाले.