23 February 2019

News Flash

आरोग्य विमा : आर्थिक आणि भावनिक गरज..

नोकरी संपल्यावर किंवा सुटल्यावर विमा संरक्षण हवेच.

गुंतवणूक कट्टा..

तृप्ती राणे

त्या दिवशी नेहमीप्रमाणे घरातले सगळे आरामात रात्री उशिरापर्यंत गप्पा मारीत बसले होते. सहा जणांच्या कुटुंबामध्ये आई, बाबा, मुलगा, सून आणि दोन नातवंडं असा चमू होता. झोपायला जायला म्हणून बाबा खुर्चीतून उठले आणि तेथेच कोसळले!

‘काय झालं बाबा, अहो उठा उठा, आजोबा, आजोबा’ – अशा हाकांनी घर दणाणून गेलं.

अवेळी जोराचे आवाज ऐकून शेजारीसुद्धा पळत आले. लगेचच आजोबांना जवळच्या मोठय़ा हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासून सांगितले – ‘मोठा हृदयविकाराचा झटका! तातडीने ऑपरेशन करावं लागणार.’

निर्णय घ्यायलासुद्धा फार वेळ हातात नाही! कुटुंबाने दुसरा क्षणही न दवडता होकार दिला. मग डॉक्टरने खर्चाचा कागद हातात दिला आणि आधी निम्मे पैसे भरायला सांगितले. मुलगा धडाधड खाली गेला आणि क्रेडिट कार्ड स्वाइप केले. सगळे सोपस्कार झाल्याबरोबर आजोबांना शस्त्रक्रियेसाठी आत घेतले आणि सुदैवाने सगळे व्यवस्थित पार पडले. सात दिवसांनी आजोबांना घरी जायची परवानगी मिळाली आणि सगळे कुटुंबीय खूश झाले. मुलाने उरलेले बिल भरले आणि बाबांना घरी घेऊन आला. आजोबा भयंकर हिशोबी होते. जरा बरे वाटल्याबरोबर मुलाला खोदून खर्चाबद्दल विचारू लागले. मुलगा उत्तर देणे टाळत होता. ‘सगळं नीट जुळवलं, तुम्ही यात पडू नका, तुमच्यापेक्षा पैसा मोठा नाही,’ असे सांगून त्यांना गप्प करायचा प्रयत्न करत होता.

पण आजोबा कसले ऐकतात! हट्टच धरून बसले. ‘आधी सांग नाही तर जेवणार नाही.’ शेवटी मुलाने हात टेकले आणि काहीसे अवघडत त्याने सांगितले – ‘सगळा खर्च – ६.५ लाख, आरोग्य विमा २ लाख. उरलेले पैसे गुतंवणूक मोडून जमा केले.’

नातवाच्या पुढच्या शिक्षणासाठी जमा केलेली गुंतवणूक त्यांच्या ऑपरेशनमुळे मोडावी लागली हे समजल्यावर आजोबांना फार वाईट वाटले. काय बरे चुकले या कुटुंबाचे? पंधरा वर्षांपूर्वी काढलेले आरोग्य विमा कव्हर पुरेसे आहे का, हा प्रश्न जर कुणी विचारला असता तर कदाचित ही परिस्थिती बदलता आली असती. आपल्या देशात आरोग्याशी निगडित असलेले खर्च हे सामान्य महागाईच्या तुलनेत दुपटीने वाढत आहेत.

म्हणून आरोग्य विमा घेताना खालील गोष्टी लक्षात ठेवा-

१ प्रत्येकाकडे स्वत:चा खासगी विमा असणे गरजेचे. कामाच्या ठिकाणी विमा असला तरीसुद्धा. नोकरी संपल्यावर किंवा सुटल्यावर विमा संरक्षण हवेच.

२ कव्हर घेताना आजच्या खर्चावर पुढे महागाईमुळे होणारी वाढ याचा ताळमेळ घालून मग निर्णय घ्यावा. उदाहरण- पाच वर्षांपूर्वी मणक्याच्या ऑपरेशनचा खर्च २.५ लाख होता, तोच आता ५ लाख इतका झालेला आहे.

३साधारणपणे वयाच्या चाळिशीपर्यंत कव्हर घ्या. त्यामुळे पुढची काही वर्षे ‘नो क्लेम बोनस’ मिळून तुमचे विमा कव्हर आपोआप वाढेल.

४ कव्हर आयुष्यभर चालू ठेवता येईल हे बघा (Life Time Renewability).

५एकाच वर्षांमधे कव्हर वापरून पुन्हा वापरता येईल का हे तपासा. याला ‘रिस्टोरेशन बेनिफिट’ म्हणतात. एकाच व्यक्तीला एकापेक्षा अधिक वेळा किंवा एकाच आजारासाठी एकापेक्षा अधिक कुटुंबीयांना जर आजारपणाचा खर्च होत असेल तर अशा प्रकारचे विमा कव्हर दुपटीने काम करते.

६ प्रतीक्षा कालावधी (Waiting Period) समजून घ्या. तो साधारणपणे ३-४ वर्षांचा असतो. या काळामधे विमा घेताना असलेले आजारांसाठी क्लेम करता येत नाही. कमीत कमी प्रतीक्षा कालावधी थोडा महाग असतो पण वेळप्रसंगी उपयोगी पडतो.

७ ‘टॉप-अप’ आणि ‘सुपर टॉप-अप’चे पर्याय नीट समजून घ्या. यातून कमी प्रीमियममध्ये कव्हर वाढवता येते.

८ गंभीर आजारांसाठी वेगळी तरतूद हवी. गंभीर आजार विम्यामध्ये एक हाती रक्कम मिळते ज्याने पुढचे खर्च सांभाळता येतात.

९ विमा घ्यायच्या आधी विमा कंपनीची नीट माहिती मिळवा. तिचा Incurred Claim Ratio बघा (७०% पेक्षा अधिक आणि ९०% पेक्षा कमी).

१० क्लेम कसा करायचा, कधी करायचा, कोणते कागद कधीपर्यंत आणि कुणाला द्यायचे – या गोष्टींची नोंद पॉलिसीबरोबर ठेवा.

११ विमा घेताना असलेले आजार लपवू नका. अनेक वर्षे प्रीमियम भरूनसुद्धा तुमचा क्लेम नाकारला जाईल.

१२ ‘सब-लिमिट’ असलेले विमा कव्हर घेऊ  नका. हॉस्पिटलचा खर्च करताना कोणत्या गोष्टीसाठी किती खर्चाची तरतूद विम्यामध्ये आहे – हे टेन्शन नकोय.

आपल्या कुटुंबीयांची काळजी, त्यांच्यासाठी योग्य आरोग्य विमा संरक्षण देऊन तुम्ही भावनिक आणि आर्थिक दोन्ही ध्येयांची पूर्तता करा!

स्रोत : व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइन, २९ जून २०१८

*‘सेबी’च्या निर्देशांनुसार पुनवर्गीकरणाने फंडांच्या नावांतील बदलासह उल्लेख

हे सर्व म्युच्युअल फंड हे रेग्युलर ग्रोथ पर्यायातील आहेत.

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

सूचना :

’ जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्या किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.

’ या सदरामध्ये गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युचुअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युचुअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे नाहीये.

’ यातील काही म्युचुअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु माझ्या पोर्टफोलिओचा या सदरांमधील पोर्टफोलिओंच्या कामगिरीबरोबर काहीही संबंध नाही.

trupti_vrane@yahoo.com

First Published on July 2, 2018 4:52 am

Web Title: best medical insurance plan medical insurance need health insurance plans