16 December 2017

News Flash

नियोजन भान.. : अर्थ प्रवासाआधीची पूर्वतयारी..

काही प्रमाणात मुलं आता बाहेरच्या देशात जाऊन पुढचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेत होती.

तृप्ती राणे | Updated: June 19, 2017 12:34 AM

अर्धा डझन कच्चे लिंबू! भाग

सुट्टी संपल्यामुळे ट्रेनची गर्दी वाढलेली होती. १०वी/१२वीच्या रिझल्टनंतर सर्वाच्या तोंडी महाविद्यालयीन प्रवेशाच्या गप्पा सुरू होत्या. कुठलं कॉलेज, कोणते विषय यापेक्षा कुठला क्लास आणि त्याच्या वेळेला जुळवून घेणारं, उपस्थितीबद्दल काटेकोर नसणारं कॉलेज कोणतं हे जास्त महत्त्वाचं होतं. त्यात काही प्रमाणात मुलं आता बाहेरच्या देशात जाऊन पुढचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेत होती. मग या मुलांच्या माता अगदी नाक वर करून सांगत होत्या- इथे भारतात कुठे मिळतंय चांगलं शिक्षण. म्हणूनच कर्ज काढून का होईना, पण मुलाला परदेशी पाठवायचं ठरवलं. तिथे कसं सगळं छान आणि व्यवस्थित! शिवाय तिथल्या नोकरीमध्ये पैसे पण चांगले मिळतात ना. हे पण खरं आहे की खर्चाची जुळवाजुळव करताना नाकीनऊ  आले. पण काय करणार! शेवटी मुलाच्या भविष्यासाठी करतो ना आपण हे. त्यावर कोणीतरी मध्येच टोमणा मारला- अहो पण तिथे शिकून मग नोकरीसाठी इथे यावं लागलं तर? डॉलरमध्ये खर्च आणि रुपयांत पगार! आज त्या सॉफ्टवेअरवाल्यांचं कसं होतंय? शिवाय आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार इथल्या उद्योगांमध्ये पैसे घालत आहेत. तर मग प्रगती इथे आहे की परदेशात? हासुद्धा विचार करायला हवा.

आपले कच्चे लिंबू ही चर्चा मस्तपैकी एन्जॉय करत होते. अभी दिल्ली दूर है! असं जरी वाटलं तरी जिग्ना आणि तिलोत्तमा विचारात मात्र पडल्या होत्या. कारण दोघींच्या मुलांचं शिक्षण व्हायचंय ना. खर्चाची तरतूद आत्तापासूनच करावी लागणार होती. पण सोनलला भेटल्यापासून त्यांना ही खात्री मात्र वाटत होती की हे काम त्या दोघी व्यवस्थित पद्धतीने करू शकतील. शिवाय आज सोनल सर्वाच्या प्रश्नांची उत्तरं देऊन सगळंच स्पष्ट करून देणार होती. म्हणजे आता आपले लिंबू स्वत:ची गुंतवणूक करायला तयार! ठाणे स्टेशन आलं आणि सोनल व सुगंधाताई डब्यात ढकलाढकली करत शिरल्या. सोनल आज जरा जास्तच खूश दिसत होती. चेहरा अगदी खुलला होता. आल्याबरोबर मिठाईचा डब्बा जिग्नाच्या हातात देऊन म्हणाली- माझं प्रमोशन झालं! या महिन्यापासून मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करणार. आता माझ्या हाताखाली ४-५ ज्युनियर अ‍ॅडव्हायझर असतील. त्यांना व्यवस्थित तयार करून त्यांच्याकडून काम करून घ्यायचं! छोटे गुंतवणूकदार ते सांभाळणार आणि मोठय़ा गुंतवणूकदारांना मी, असं ठरलंय. सगळ्या जणींनी एकसाथ तिचं अभिनंदन केलं आणि मिठाई तोंडात घातली. सकाळी सकाळी छान बातमी मिळाल्यामुळे सगळ्या खूश झाल्या.

पुढे सोनल म्हणाली- आपल्या गेल्या भेटीत तुम्ही बरंच काही समजून घेतलंत. त्यावर बरेच प्रश्नसुद्धा तुम्हाला पडले. आज मी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे. चला तर मग सुरू करूया.

इमर्जन्सी फंड (आपत्कालीन निधी)

प्रश्न : लिक्विड फंडामधले पैसे कधीही काढता येतात का?

– या फंडामधले पैसे काढताना त्या म्युच्युअल फंडाची कट-ऑफ वेळ लक्षात घेणं गरजेचं आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी ही माहिती नीट मिळवून घ्यावी आणि नमूद करून ठेवावी.

प्रश्न : लिक्विड फंड पूर्णपणे सुरक्षित असतात का?

– कोणतेही म्युच्युअल फंड १०० टक्के सुरक्षित नसतात. त्यांची जोखीम जरी कमी असली तरी असतेच. म्हणून समजून मगच पैसे गुंतवावे. लिक्विड म्युच्युअल फंडाची गुंतवणूक कशात आहे आणि ती किती सुरक्षित आहे याची नीट चौकशी करावी. न समजल्यास पैसे बँक ठेवींमध्ये (एफडी) मध्ये ठेवलेले बरे.

प्रश्न : आधी एसआयपी सुरू करायची की आधी इमर्जन्सी फंड तयार करायचा?

– जर तुमच्यावर कोणतीही जबाबदारी नसेल तर एसआयपी आणि इमर्जन्सी फंड दोन्हीमध्ये गुंतवणूक एकाच वेळेला सुरू केली तर चालेल. पण आर्थिक जबाबदाऱ्या असणाऱ्यांनी पहिला इमर्जन्सी फंड बनवायचा आणि मग बाकी गुंतवणूक करायची.

आरोग्य विमा

प्रश्न : हा विमा कोणत्या कंपनीकडून घ्यावा?

– भारतीय विमा विकास व नियामक प्राधिकरण (आयआरडीएआय) ही सरकारी नियामक यंत्रणा प्रत्येक वर्षी प्रत्येक विमा कंपनीची माहिती प्रकाशित करते. त्यात प्रत्येक कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो (दावे निवारणाचे प्रमाण) दाखवण्यात येतो. ज्या कंपनीसाठी हे प्रमाण जास्त आहे आणि पॉलिसी विकण्याचा अनुभव चांगला आहे अशा कंपनीकडून विमा घ्यावा.

प्रश्न : जर काम करत असल्या ठिकाणी विमा काढला असेल आणि स्वत:चा वेगळा विमा पण असेल तर क्लेम कसा करायचा?

– शक्यतो कॉर्पोरेट विमा कव्हर पहिलं वापरावं. त्यानंतर उरलेला क्लेम व्यक्तिगत विमा कंपनीकडे करावा. असं केल्याने व्यक्तिगत आरोग्य विम्यामध्ये ‘नो-क्लेम’चा फायदा मिळतो.

आयुर्विमा

प्रश्न : आयुर्विमा कोणत्या कंपनीकडून घ्यावा?

– आरोग्य विमा सारखीच आयुर्विमा कंपन्यांची माहिती आयआरडीएआय प्रकाशित करते. येथेही ज्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो जास्त आहे आणि पॉलिसी विकण्याचा अनुभव चांगला आहे अशा कंपनीकडून विमा घ्यावा.

प्रश्न : गृहकर्जाचा विमा त्याच्यापुरताच मर्यादित असतो का?

– जर गृहकर्जाबरोबर विमा घेतला असेल तर तो कर्ज फेडल्यावर संपतो. परंतु जर वेगळा विमा घेतला असेल तर त्याच्या मुदतीपर्यंत चालू राहतो.

प्रश्न : लहान मुलांच्या नावाने विमा काढायचा का?

– लहान मुलांवर कोणतीही आर्थिक जबाबदारी नसते. त्यामुळे त्यांना विम्याची आवश्यकता नसते.

प्रश्न : एजंटकडून पॉलिसी घ्यावी की ऑनलाइन घ्यावी?

– ऑनलाइन पॉलिसी जरी स्वस्त असली तरी तिचा दावा करण्यासाठी तुमच्या नॉमिनीला धावपळ करावी लागते. एजंटकडून घेतलेल्या पॉलिसीमध्ये ही मेहनत टाळता येते. ऑनलाइन पॉलिसी घेताना ती व्यवस्थितपणे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

प्रश्न : विम्याचा दावा केव्हा नाकारला जातो?

– चुकीची माहिती देणं, वेळेवर प्रीमियम न भरणं, वेळेवर योग्य कागदपत्रं जमा न करण्यामुळे दावा नाकारला जाऊ शकतो.

गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांची सांगड

प्रश्न : गुंतवणुकीच्या नवीन पर्यायांमध्ये पैसा गुंतवताना काय काळजी घ्यावी? जास्तीचे एफडी मोडून म्युच्युअल फंडात घालावे का?

– कोणत्याही नवीन गुंतवणुकीची सुरुवात करताना थोडय़ा रकमेने आणि वेळेच्या अंतराने करावी. म्हणजेच सगळे एफडी मोडून एकाच वेळी म्युच्युअल फंडात न घालता, थोडी थोडी रक्कम आठवडा, पंधरवडा किंवा महिन्याच्या अंतराने गुंतवावी.

प्रश्न : डेट म्युच्युअल फंड किती सुरक्षित असतात?

– आधी सांगितल्याप्रमाणे कोणताही म्युच्युअल फंड हा १०० टक्के सुरक्षित नसतो. म्हणून डेट म्युच्युअल फंडात पैसे गुंतवताना आणि गुंतवल्यानंतर नियमित आढावा घेणं महत्त्वाचं आहे.

प्रश्न : बॅलन्स्ड किंवा इक्विटी म्युच्युअल फंड यामध्ये नक्की फायदा होतो का?

– शेअर बाजाराशी संलग्न कोणतीही गुंतवणूक १०० टक्के फायदेशीर असेलच असं नाही. पण गेल्या १५ वर्षांचा जर आपण आढावा घेतला, तर या गुंतवणुकीने चांगले परतावे दिलेले आहेत. परंतु आधी म्हटल्याप्रमाणे नियमित आढावा घेणं गरजेचं आहे. तज्ज्ञ मंडळींचा वेळोवेळी सल्ला घेऊन नफा कमावून घ्यावा.

प्रश्न : एसआयपीमधली गुंतवणूक किती वर्षे चालू ठेवावी?

– तुमचं आर्थिक उद्दिष्ट जवळ आलं की गुंतवणुकीतून पैसे काढून सुरक्षित ठिकाणी गुंतवावेत. एसआयपी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय असला तरीही योग्य वेळेला त्यातून बाहेर पडणे महत्त्वाचे आहे. आणि जर आपण निवडलेला फंड नीट कामगिरी करत नसेल, तरीसुद्धा एसआयपी बंद करायचा निर्णय घ्यावा.

प्रश्न : आपल्यासाठी योग्य म्युच्युअल फंड कुठला हे कसं शोधायचं?

– प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनी त्यांच्या सर्व फंडांची माहिती इंटरनेट पुरवते. शिवाय valueresearch.com, moneycontrol.com यासारख्या वेबसाइटवरूनसुद्धा आपण माहिती मिळवून आपल्यासाठी योग्य फंड निवडू शकतो. काही माहिती वृत्तपत्रांमधूनसुद्धा मिळते. तिचाही आपण फायदा करून घेऊ शकतो.

प्रश्न : शेअर्समध्ये गुंतवणुकीची सुरुवात कशी करावी?

– आधी योग्य शिक्षण घ्यावं, मग थोडे पैसे ओळखीच्या कंपनीमध्ये गुंतवून अनुभव घ्यायला सुरुवात करावी. गुंतवणूकसंबंधी ज्ञान वाचनातून आणि तज्ज्ञ मंडळींच्या अनुभवातून मिळवावं. आजकाल वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून शेअर गुंतवणुकीबाबत भरपूर लिहिलं जातंय. शिवाय स्वत: नियमित वेळ काढून एखाद्या कंपनीचं विश्लेषण करून मग इंटरनेटवर इतरांचं विश्लेषण वाचावं. असं करत करत आपलं ज्ञान आणि अनुभव वाढवावा.

कर वाचवण्यासाठी

प्रश्न : कर नियोजन कधी करावं?

कर नियोजन आर्थिक वर्षांच्या सुरुवातीलाच करावं. यामुळे शिस्तबद्धपणे गुंतवणूक करता येते.

प्रश्न : कर भरावा की कर वाचवण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करावी?

– कर नियोजन करताना आपल्या आर्थिक गरजांचा आढावा घेऊन मगच पैसे गुंतवावे. कर वाचवण्यासाठी असलेले पर्याय, यांच्यातून हवे तेव्हा पैसे काढता येत नाहीत. त्यामुळे गरज असल्यास कर भरावा आणि गुंतवणूक आपल्याला हवी तेव्हा काढता येईल अशा पर्यायात करावी.

सोनल थोडा श्वास घेत म्हणाली – हुश्श!! केवढे प्रश्न, पण सगळे योग्य होते. मला खूप बरं वाटलं. तुम्ही सर्वानी मी सांगितलेल्या गोष्टी नीट ऐकून घेतल्या व त्यावर विचार करून हे प्रश्न काढलेत. तर आता मला खरं खरं सांगा की तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची मी समाधानकारक उत्तरं देऊ  शकले का?

यावर तिलोत्तमा म्हणाली – हो तर! मला आता कोणतीही शंका नाही. मीनाक्षीनेसुद्धा दुजोरा दिला – सोनल आक्का! मला आता गुंतवणुकीबाबत आत्मविश्वास वाटायला लागलाय. आजवर आप्पा सगळंच बघत होते. पण यापुढे मी त्यांना समजावून स्वत:च गुंतवणूक करणार. अर्थात त्यांनासुद्धा पटवून देणार. तेवढय़ात जिग्ना म्हणाली – सोनल, तुमचे खूप खूप आभार. आज तुमच्यामुळे मला पैशाचं महत्त्व कळलं. तुम्ही दिलेल्या माहितीमुळे योग्य गुंतवणूक कशी करायची हे फक्त मलाच नाही, तर माझ्या नवऱ्याला देखील कळलं आहे. सिल्वी म्हणाली – सोनल, तुझ्याकडून मला गुंतवणुकीचं ज्ञान तर मिळालं, शिवाय एकटी स्त्री म्हणून मला पुढे कोणकोणते चॅलेन्जेस आहेत हेसुद्धा तू जाणवून दिलंस!

सोनलला खूप समाधान वाटलं की इतके दिवस तिने ज्यांच्यावर मेहनत घेतली ते कच्चे लिंबू आता पिकू लागले आहेत. सर्वाना तयार केल्याचा तिला खूप आनंद वाटत होता. ती म्हणाली – चला तर, पुढच्या वेळी मला तुमचा पोर्टफोलिओ बनवून दाखवा. किती पैसे कुठे ठेवणार, कोणत्या एसआयपी सुरू करणार, हे प्रत्येकीने लिहून आणायचं. चालेल? सगळ्या जणी खुशीत ओरडल्या – हो सोनल, नक्की!

एवढं ऐकून सोनल ट्रेनमधून उतरली.

 

आजची टीप: वरील दिलेली माहिती ही सर्वसाधारणपणे गुंतवणुकीच्या विश्वाच्या संदर्भात आहे. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही. वाचकांनी वास्तवात गुतंवणूक करताना स्वत: माहिती मिळवून किंवा गुंतवणूक सल्लागाराच्या मार्गदर्शनाने करावी. शिवाय आधी म्हटल्याप्रमाणे शेअर बाजाराशी निगडित कोणतीही गुंतवणूक जोखमीची असते. त्यामुळे या लेखाच्या आधारावर गुंतवणूक करू नये. वाचकाने घेतलेले निर्णय हे त्याचे स्वत:चे असून लेखक कोणत्याही प्रकारच्या नुकसानास जबाबदार नाही.

सूचना : वरील नमूद नावाचा कुणाही व्यक्तीशी – जीवित अथवा मृत, संबंध नाही. या व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक आहेत आणि आर्थिक नियोजनाच्या कथेत फक्त वेगवेगळ्या व्यक्तिरेखा म्हणून भूमिका साकारत आहेत.

trupti_vrane@yahoo.com

First Published on June 19, 2017 12:34 am

Web Title: finance travel trupti rane article