20 November 2017

News Flash

फंड विश्लेषण : प्रथम तुला वंदितो..

फंडाच्या गुंतवणुकीत वृद्धी आणि रोकडसुलभता यांचा योग्य समतोल राखलेला दिसून येतो.

वसंत माधव कुलकर्णी | Updated: August 28, 2017 5:20 AM

आयडीएफसी स्टर्लिग इक्विटी फंड

आयडीएफसी स्टर्लिग इक्विटी फंड

सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या जनकत्वावरून लोकमान्यांच्या ९८व्या स्मृतिवर्षांत वादाच्या पाश्र्वभूमीवर श्रींची प्राणप्रतिष्ठा झाली. गावोगावच्या ज्या घरात किंवा मंडपात श्रींची स्थापना झाली आहे अशा ठिकाणी चैतन्य ओसंडून वाहात आहे. महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक राजधानीतही मानाच्या पाच गणपतीसहित अन्य गणपती स्थानापन्न झाले. महाराष्ट्रातील हवशे गवशे नवशे पुण्याचे गणपती पाहण्यासाठी पुण्यनगरीत दाखल होतात. पाच मानाच्या गणपतीसोबत चोखंदळ पुणेकर चौकाचौकातील गणपतींचे दर्शन घेतो. बाहेरगावांहून आलेल्यांना एखादा चोखंदळ पुणेकर गणेश दर्शनासाठी मार्गदर्शक म्हणून लाभला तर हा पुणेकर हिराबाग, खडकमाळ, खजिना विहीर, चोळखण आळी, बोहरी आळी इत्यादी ठिकाणच्या सार्वजनिक गणपतीचे दर्शन घडविल्याशिवाय राहात नाही. हे गणपती चित्तवेधक सजावटी आणि नयनरम्य देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. गणेशोत्सवादरम्यान येणाऱ्या दोन सोमवारी अशाच दोन अनवट परंतु परताव्यांचे भरघोस माप पदरात घालणाऱ्या या म्युच्युअल फंडांची ओळख करून घेणार आहोत.

गुंतवणूक परिघात उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांपैकी मिड कॅप म्युच्युअल फंड किंवा मिड कॅप समभागांना गुंतवणूक विश्वात  ‘स्वीट स्पॉट’ म्हणून संबोधले जाते. या कंपन्यांचा वृद्धी दर लार्ज कॅपपेक्षा अधिक व गुंतवणुकीतील जोखीम स्मॉल कॅपपेक्षा कमी असल्याने मिड कॅप हे चोखंदळ गुंतवणूकदारांच्या ‘मर्मबंधातली ठेव’ असतात.

मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांचे स्पर्धक या असंघटित क्षेत्रातील असतात. वस्तू व सेवा कर अर्थात ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीपश्चात मुख्यत्वे असंघटित क्षेत्रातील उत्पादक कर कक्षेत आल्याचा फायदा मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांना होईल, असा अंदाज विश्लेषकांकडून वर्तविला जात आहे. मिड कॅप गुंतवणुकीत धोका अधिक असतो. मिड कॅप आणि सेक्टोरल फंड यांचा परतावा आकर्षक असला तरी प्रसंगी मुद्दल गिळंकृत करणारे असा या फंडांबद्दल परंपरागत समज आहे. आयडीएफसी स्टर्लिग इक्विटी फंड हा आपली गुंतवणूक लीडर्स अ‍ॅण्ड चॅलेंजर्स आणि इमर्जिंग बिझनेसेस अशा दोन गटात विभागतो. भविष्यात बहुप्रसवा (मल्टी बॅगर्स) होण्याची क्षमता असलेले समभाग ‘लीडर्स अ‍ॅण्ड चॅलेंजर्स’ या प्रकारात मोडतात. सरासरी ५० ते ६० टक्के पोर्टफोलिओ लीडर्स अँड चॅलेंजर्स या प्रकारातील असून हे समभाग स्मॉल आणि मिड कॅप प्रकारातील असतात. इमर्जिंग बिझनेसेस हे पुरेशी रोकड सुलभता असलेले मिड कॅप समभाग असतात. या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची सूत्रे एप्रिल २०१६ पासून अनुप भास्कर यांच्याकडे आली आणि डॅनियल पिंटो यांची त्यांचे साहाय्यक म्हणून ऑक्टोबर २०१६ पासून नेमणूक झाली. अनुप भास्कर यांनी आयडीएफसी फंड घराण्यात दाखल होण्याआधी यूटीआय म्युच्युअल फंडात निधी व्यवस्थापनाबरोबरच या फंड घराण्याचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद भूषविले आहे. डॅनियल पिंटो हे यूटीआय म्युच्युअल फंडात निधी व्यवस्थापक होते. अनुप भास्कर यांनी एसबीआय म्युच्युअल फंड आणि सुंदरम म्युच्युअल फंडातही निधी व्यवस्थापक म्हणून काम केले आहे.

फंडाने गुंतवणुकीत अनुक्रमे बँका, वाहन पूरक उद्योग, किरकोळ विक्री, बांधकाम आणि प्रकल्प, वित्तीय सेवा आणि सिमेंट या उद्योगांना गुंतवणुकीसाठी प्राथमिकता दिलेली आहे. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक फ्युचर रिटेल रॅमको सिमेंट, इंडसिंध बँक, बजाज फायनान्स, केईसी इंटरनॅशनल या कंपन्यांच्या समभागात आहे. हा फंड मिड कॅप प्रकारचा असल्याने ५५ ते ६० समभागांचा गुंतवणुकीत समावेश असतो. या फंडाचे वैशिष्टय़ असे की, ज्या कंपन्या भांडवल उभारणीसाठी समभाग वारंवार विक्रीला (किमान १० वर्षे) काढत नाहीत, तशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक हा या फंडाचा एक महत्त्वाचा निकष आहे. फंडाची धुरा नवीन निधी व्यवस्थापकांकडे आल्यानंतर फंडाची माहिती तंत्रज्ञान, आरोग्य निगा क्षेत्रातील गुंतवणूक कमी करून टप्प्याटप्प्याने बँका, वाहने आणि वाहन पूरक उद्योग यांच्यातील गुंतवणूक वाढत गेली. मिड कॅप फंडाच्या यशात योग्यवेळी योग्य उद्योगांत गुंतवणूक करणे (सेक्टोरल  रोटेशन) महत्त्वाचे असते. ही गोष्ट या फंडाच्या निधी व्यवस्थापकांनी उत्तम साधली आहे. या काळात फंडाची बँका व गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांतील गुंतवणूक ९ टक्कय़ांवरून १९ टक्कय़ांवर गेली आहे. त्या खालोखाल फंडाने आर्थिक आवर्तनाशी निगडित असलेल्या वाहने आणि उपभोग्य वस्तू यांच्यातील गुंतवणूक वाढवताना किरकोळ विक्री दालने असलेल्या कंपन्यांतून गुंतवणूक वाढविली. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीचा सर्वाधिक फायदा या क्षेत्राला होणार आहे. या क्षेत्रातील फ्युचर रिटेलमध्ये सर्वाधिक गुंतवणूक असलेला हा एकमेव फंड आहे. हे व अशी अनेक या फंडाची आगळी वैशिष्टय़े आहेत.

फंडाच्या गुंतवणुकीत वृद्धी आणि रोकडसुलभता यांचा योग्य समतोल राखलेला दिसून येतो. मागील महिन्याभरात फंडाने गुजरात अल्कली, डिशमॅन, काबरेरंडम आणि टेक महिंद्रा हे समभाग विकून ईआय हॉटेल्स, कल्पतरू पॉवर, स्टर्लिंग टूल्स, केपीआयटी टेक्नोलॉजी, फ्युच्युर फॅशन अँड लाइफस्टाईल या समभागांत नव्याने गुंतवणूक करण्यास सुरवात केली आहे.

मिड कॅप फंडात गुंतवणूक करताना फंडाची मालमत्ता हा महत्त्वाचा मुद्दा असतो. १,५५३ कोटी रुपयांची मालमत्ता असलेला हा फंड गुंतवणुकीसाठी आदर्श समजला पाहिजे. अनेक मिड कॅप फंडांनी असे दाखवून दिले आहे की, फंड मालमत्ता वाढल्यावर परताव्याचा दर कमी होतो. म्हणून १,२०० ते १,५०० कोटी रुपयांदरम्यान मालमत्ता असलेले मिड कॅप फंड गुंतवणुकीसाठी आदर्श असतात. ७ मार्च २००८ रोजी या फंडाची पहिली एनएव्ही जाहीर झाली. या दिवसापासून नियोजनबद्ध पद्धतीने (एसआयपी) दरमहा ५००० रुपये गुंतविणाऱ्या गुंतवणूकदारांच्या ५.७० लाखाच्या गुंतवणुकीचे २४ ऑगस्ट २०१७ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १५.८९ लाख रुपये झाले आहेत. या गुंतवणुकीचा परताव्याचा दर २०.८७ टक्के आहे. या फंडाच्या एनएफओमधील १ लाखाच्या गुंतवणुकीचे ५.०७ लाख झाले असून परताव्याचा दर २०.३३ टक्के आहे. फंडाची मालमत्ता एका मर्यादेत असल्याने, नफावसुली आणि योग्यवेळी वसूल केलेला नफा पुन्हा समभागात गुंतविणे शक्य होते. सध्या फंडाचे १० वे वर्ष सुरू आहे. फंडाच्या १ वर्षांच्या चलत परताव्याने ७८ टक्के वेळा ३ वर्षांच्या चलत परताव्याने, ९१ टक्के वेळा आणि ५ वर्षांच्या चलत परताव्याने, १०० टक्के वेळा संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक परतावा मिळविला आहे.

कोकणात एखाद्या सुगरण स्त्रीने बनविलेला उकडीचा मोदक हाताने वळलेला की साच्यातील मोदक यांतील फरक ओळखता येत नाही. इतके कौशल्य त्या सुगरणीने संपादित केलेले असते. आजच्या फंडाच्या निधी व्यवस्थापकाची जोडगोळी व विशेषत: अनुप भास्कर यांचे मिड कॅप ओळखण्याचे कसब मोदक हाताने वळणाऱ्या सुग्रण स्त्रीने प्राप्त केलेल्या कौशल्यासारखेच. सुंदरम सिलेक्ट मिड कॅपसारखा फंड आज वटवृक्ष झालेला दिसून येतो. त्या फंडाचे अनुप भास्कर हे संस्थापक निधी व्यवस्थापक राहिले आहेत. बाजारातून समृद्धीची निर्मिती ही केवळ बुद्धिवैभवाने होते. अनेक निधी व्यवस्थापकांच्या काम करण्याच्या मेजावर गणपतीची लहान मूर्ती विराजमान असते. अनेकांना गणपती ‘फ्रेंड आणि फिलॉसॉफर’ वाटतो. गुंतवणूक कौशल्याने संपत्तीची निर्मिती करणाऱ्या बुद्धिदात्याला दंडवत!

आयडीएफसी स्टर्लिग इक्विटी फंड

एक दृष्टिक्षेप..

* फंडाची पहिली एनएव्ही :  ७ मार्च २००७

*  सध्याची एनएव्ही  (२४ ऑगस्ट २०१७)

वृद्धी पर्याय       :   ५०.९४ रुपये

लाभांश पर्याय   :    २१.१९ रुपये

*  फंड प्रकार : मिड अ‍ॅण्ड स्मॉल कॅप फंड

*  संदर्भ निर्देशांक : निफ्टी फ्री फ्लोट मिड कॅप १००

*  किमान एसआयपी : १००० रुपये

*  किमान गुंतवणूक  : ५००० रुपये

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com

First Published on August 28, 2017 1:02 am

Web Title: fund analysis idfc sterling equity fund