25 November 2017

News Flash

फंड विश्लेषण : कर नियोजनासाठी ‘ईएलएसएस’ पर्याय नक्कीच लाभकारक!

महिंद्र म्युच्युअल फंडाची पहिली योजना असलेल्या महिंद्र लिक्विड फंडाला ४ जुलै रोजी एक वर्ष

वसंत माधव कुलकर्णी | Updated: July 17, 2017 1:02 AM

Mahindra Mutual Fund Kar Bachat Yojna

महिंद्र म्युच्युअल फंड कर बचत योजना

चालू आर्थिक वर्षांची पहिली तिमाही सरल्याने चाणाक्ष करदाते या वर्षीच्या कर नियोजनासाठी टॅक्स सेव्हिंग फंडांचा नक्कीच विचार करतील या अपेक्षेने ईएलएसएस फंड गटातील या नवीन बालकाची ही ओळख..

महिंद्र म्युच्युअल फंडाची पहिली योजना असलेल्या महिंद्र लिक्विड फंडाला ४ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले. भारतातील ४२ म्युच्युअल फंडात पहिल्या वर्षांत मालमत्तेत २,५०० कोटींचा टप्पा गाठणारा महिंद्र म्युच्युअल फंड हा एकमेव म्युच्युअल फंड आहे. या म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार भारतातील १५० ठिकाणी विखुरलेले आहेत. हे सुद्धा या फंडाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. पहिल्या वर्षांत गुंतवणूकदारांसाठी १५० ठिकाणी विक्रीसेवा उपलब्ध असलेला हा पहिलाच फंड.

या वर्षपूर्तीच्या निमित्ताने वैयक्तिक गुंतवणूकरांसाठी उपलब्ध झालेल्या महिंद्र कर बचत या पहिल्या योजनेला आठ महिने पूर्ण झाले आहेत. फंडाची प्राथमिक विक्री गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बंद झाली. प्राथमिक विक्री बंद झाली तेव्हा, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका व फेडकडून संभाव्य व्याजदर आढावा या दोन गोष्टींचा बाजारावर परिणाम अपेक्षित होता. सेबीच्या नियमानुसार गुंतवणुकीसाठी कायम खुल्या असलेल्या योजनांना सर्व निधी सहा महिन्यांत गुंतवणूक करण्याची मुभा असते. ऑक्टोबर २०१६च्या गुंतवणूक तपशिलानुसार फंडाने २५ टक्के रक्कम गुंतविली होती व ७५ टक्के रक्कम आभासी रोकड प्रकारच्या गुंतवणूक साधनांत होती. नोव्हेंबरअखेर फंडाच्या एकूण निधीपैकी ९६ टक्के गुंतवणूक समभागात गुंतविली गेली होती. नोव्हेंबर महिन्यांत निश्चलनीकरण व अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर बाजारात झालेल्या घसरणीचा फायदा घेत. शिल्लक निधी गुंतविला गेला हे स्पष्टच आहे. साहजिकच फंडाची गुंतवणूक आकर्षक मूल्यांकनात झाल्याचे स्पष्ट होते.

फंडाची सर्वाधिक गुंतवणूक बँकिंग, वाहन निर्माते, वाहन उद्योगासाठी पूरक उत्पादनांचे निर्माते, तेल व वायूक्षेत्र, ग्राहकोपयोगी वस्तू या उद्योगक्षेत्रात आणि रोकडसुलभ रोखे गुंतवणुका आहेत. मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक व इन्फोसिस या पाच कंपन्यांत फंडाने सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. ईएलएसएस योजनांतील गुंतवणूक गुंतवणूकदारांना तीन वर्षे काढता येत नाहीत. फंडाला सुरुवात झाल्यापासून गुंतवणूकदारांची विशेष पसंती नसलेली परंतु तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत आश्वासक परतावा अपेक्षित असलेल्या बँकिंग व वित्तपुरवठा क्षेत्राचा समावेश आघाडीच्या पाच उद्योगक्षेत्रांत असणे हे फंडाचे वैशिष्टय़ नोंदवावे लागेल. फंड व्यवस्थापन अधिक परतावा मिळविण्यासाठी अतिरिक्त जोखीम घेत नसले तरी म्युझिक ब्रॉडकास्ट (रेडिओ सिटी) सारखा मिड कॅप समभाग प्राथमिक विक्रीत खरेदी करून भांडवली नफा कमावण्याची संधी फंडाने सोडली नाही. मे महिन्याच्या गुंतवणूक विवरणात आघाडीच्या १० गुंतवणुकांमध्ये दिसणाऱ्या या समभागाचा समावेश, तर जूनच्या गुंतवणूक विवरणात तो तळाचा समभाग आहे. तरी फंडाचा पोर्टफोलियो टर्नओव्हर रेशो कमी आहे. पहिल्या पाच गुंतवणुकांचे एकूण गुंतवणुकीशी प्रमाण मागील तीन महिन्यांत २८ टक्के राखलेले असून पहिल्या १० गुंतवणुकांचे प्रमाण ४२ टक्क्यांदरम्यान आहे. हा फंड समभागकेंद्रित जोखीम स्वीकारणारा नसून गुंतवणुकीत समतोल व वैविध्य राखणारा फंड आहे.

वैयक्तिक कर नियोजन हा शब्दसंचय वारंवार वापरला जातो. परंतु बहुसंख्य करदाते व्यावसायिक कर सल्लागारांचे मार्गदर्शन अभावानेच घेतात. एखादी व्यक्ती बँकेत मुदत ठेवी करीत असेल तर मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याज त्या गुंतवणूकदाराच्या अन्य उत्पन्नात धरून एकूण उत्पन्नावर आयकर आकारणी होते. हीच बचत त्या व्यक्तीने तीन वर्षे रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडात किंवा एका वर्षांसाठी आर्ब्रिटाज फंड किंवा इक्विटी सेव्हिंग्ज फंडात गुंतविली तर तर ही गुंतवणूक कर कार्यक्षम ठरते. वैयक्तिक करदाते कर वजावटीसाठी उपलब्ध पर्यायांपैकी पीपीएफ व विम्याचा हप्ता सर्वाधिक पसंत करतात. एक वेळ मुदतीचा विमा खरेदी केल्यामुळे किमान पुरेसे विमा कवच घेतल्याने कुटुंबाला सुरक्षा मिळते. विमा व बचत एकत्रित असलेल्या विमा योजना ना पुरेसे विमा संरक्षण देतात ना या योजनांवर मिळणारा परतावा महागाईच्या दराहून कमीच असतो. मागील २० वर्षांत कर वजावटपात्र गुंतवणूक साधनांपैकी सर्वाधिक परतावा ईएलएसएस अर्थात कर वजावटीस पात्र फंडांनी दिला आहे. यासाठी तज्ज्ञ सल्लागार हे मुदतीचा विमा व म्युच्युअल अर्थात कर वजावटीस पात्र असलेल्या ईएलएसएस फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.

चालू आर्थिक वर्षांची पहिली तिमाही सरल्याने चाणाक्ष करदाते या वर्षीच्या कर नियोजनासाठी ईएलएसएस फंडांचा नक्कीच विचार करतील या अपेक्षेने ईएलएसएस फंड गटातील नवीन बालकाची ही ओळख. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ३२ हजाराचे शिखर गाठलेले असताना अन्य फंडांच्या तुलनेत सर्वाधिक १२ टक्के गुंतवणूक रोकडीच्या रूपात ठेवणारा हा फंड समभाग गुंतवणुकीतील जोखीम कमी नक्कीच करत आहे. अवघे आठ महिन्यांचे वय असलेला हा फंड उत्तम परतावा देणाऱ्या पहिल्या पाच फंडांत दिसला नाही तरी हा फंड परताव्यात सातत्य राखणारा व सरासरीहून अधिक परतावा देणारा असेल असा विश्वास वाटतो.

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

shreeyachebaba@gmail.com

First Published on July 17, 2017 1:02 am

Web Title: fund analysis mahindra mutual fund kar bachat yojna