कंपन्यांच्या तिमाही निकालांचा आढावा घेतला असता या निकालांचा निश्चित कल नसून वेगवेगळ्या उद्योगांतील कंपन्यांचा संमिश्र कल दिसत आहे. मारुती, हिंदुस्थान युनीलिव्हरसारख्या व्यक्तिगत उपभोगाच्या वस्तू आणि कर्ज आदी सेवा देणाऱ्या कंपन्यांचे निकाल समाधानकारक असून समभागांचे उत्सर्जन (अर्निग) उत्साह वाढविणारे आहेत. तर कंपन्यांना कर्ज देणाऱ्या बँकांच्या नफ्यातून अनुत्पादित कर्जासाठी तरतूद करणे सुरूच आहे. रिझव्‍‌र्ह बँक अनुत्पादित कर्जाबाबत ठोस आणि कडक भूमिका घेत असल्याने बँकांची थकीत कर्जासाठी तरतूद वाढत आहे. उद्योग क्षेत्र उत्पादन क्षमतेच्या ६५-७० वापर करत असल्याने भांडवली वस्तूच्या कंपन्यांचे निकाल उत्साहवर्धक नाहीत. भांडवली वस्तू आणि औद्योगिक वापराच्या वस्तू यांच्या मागणीत वाढ होऊन या कंपन्यांची नफाक्षमता वाढण्यास उत्सर्जनात वाढ होण्यास दोन ते तीन तिमाही वाट पाहावी लागेल. बाजाराचे निर्देशांक याच आशेवर रोज नवीन शिखरे पादाक्रांत करीत आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा विचार केल्यास रुपयाच्या अवमूल्यनाचा फायदा होत असला तरी जुन्या कंत्राटांचे नूतनीकरण आधीपेक्षा कमी दराने होत आहे. प्रमुख बाजारपेठ असलेल्या अमेरिका आणि युरोप खंडात नवीन प्रकल्पांच्या मागणीच्या अभावी या  माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा वृद्धी दर दुहेरी आकडय़ात पोहोचणे कठीण असल्याचे जाणवते. टीसीएस आणि इन्फोसिस यांचे मूल्यांकन नव्याने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी बेताने घ्यावे, असेच आहे. ग्राहकोपयोगी वस्तू आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा पी/ई १६ ते १८ दरम्यान असला तरी दोघांच्या वृद्धीदरांत फरक आहे हे विसरून चालणार नाही. औषध निर्माण क्षेत्राचा विचार केल्यास समभागांच्या किमतींनी सुरुवातीच्या तळापासून उसळी घेतली असली तरी औषध निर्माण क्षेत्रातील प्रश्न संपले असे म्हणता येणार नाही. दिवसेंदिवस सरकारने कंपन्यांच्या अनिर्बंध नफ्याला कात्री लावण्याच्या उद्देशाने अनेक किंमत नियंत्रण असलेल्या औषधांच्या यादीत नव्याने भर पडत चालली आहे. अमेरिकेतील बाजारपेठेच्या वातावरणात फारशी सुधारणा झालेली नाही.

राष्ट्रीयीकृत बँकांच्या समभागांनी मारलेली उसळी यात भावनेचा भाग अधिक आहे. प्रत्यक्षात सरकारी धोरणाचा या बँकांना नेमका किती फायदा होईल याबद्दल साशंकता वाटते. आज राष्ट्रीयीकृत बँकांसमोरच्या अनेक मुद्दय़ांवर सरकारकडून धोरणात्मक स्पष्टता नसल्याने बँकांचे सारे प्रश्न संपले असे मानून गुंतवणूक करणे हा आततायीपणा असेल. निर्देशांक नवीन शिखरांना स्पर्श करीत असले तरी गुंतवणूक विचारपूर्वक करायला हवी आणि अपेक्षित परतावा मिळण्यासाठी गुंतवणुकीचा कालावधी पाच ते सात वर्षे हवा. त्यापेक्षा कमी कालावधीत अपेक्षित परतावा मिळणे कठीण आहे.

कंपन्यांच्या तिमाही निकालांचा आढावा आणि गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचा अभ्यास केल्यास पीटर लिंच यांच्या ‘‘Far more money has been lost by investors preparing for corrections, or trying to anticipate corrections, than has been lost in corrections themselves’’ या वाक्याचे स्मरण व्हावे. आज भारतातल्या गुंतवणूकदारांची अवस्था ही अशी आहे. विशेषत: बाजार निर्देशांक कोणत्या तरी कारणाने खाली येतील आणि मला गुंतवणुकीची संधी मिळेल अशा विचारांनी प्रेरित झालेल्या गुंतवणूक-इच्छुकांनी म्युच्युअल फंडात होणारी मासिक ५ हजार कोटी इतकी ‘एसआयपी’ गुंतवणूक आणि एकरकमी होणारी दरमहा सरासरी २ हजार कोटी गुंतवणूक लक्षात घेतली तर नजीकच्या काळात बाजारात मोठी घसरण होऊन गुंतवणुकीची संधी मिळेल असे वाटत नाही.

अजय बोडके

लेखक प्रभुदास लीलाधर या दलाली पेढीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य गुंतवणूक व्यवस्थापक (पीएमएस) आहेत.