10 April 2020

News Flash

विमा विशेष.. जीवन विमा संरक्षण कशी कराल सुरुवात?

खर्च भविष्यात वाढणारे असतात. जीवन विमा पॉलिसीचे प्रीमियम भरण्याबाबत अनिश्चितता असते.

प्रतिनिधिक छायाचित्र

एखादी व्यक्ती काम करण्यास सुरुवात करते, कमावू लागते. त्या व्यक्तीच्या जीवनातील हा महत्त्वाचा नवीन टप्पा आणि अनुभव असतो. त्यामुळे पैसे खर्च करण्याचे नवखे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला गवसते. तसेच स्वत:च्या पायावर उभे राहिल्याने आत्मसन्मान वाढीस लागतो. आयुष्याचा विचार पैशाच्या बाबतीत करण्याची जी क्षमता येते, ती निश्चितपणे कठोर मेहनतीचे फलित असते. या टप्प्यानंतर आयुष्य जगण्याची मजा औरच असते. परंतु जीवनातील या टप्प्याचा विचार करताना एखाद्याने जबाबदारीची जाणीवही मनात ठेवणे आवश्यक ठरते. त्यामुळे नजीकच्या आयुष्यात ही व्यक्ती आपल्या आई-वडिलांची काळजी, लग्नासारख्या जबाबदाऱ्या उचलण्यासाठी समर्थ होते. त्यामुळे आर्थिक मिळकत खिशात येऊ लागल्यावर खालील गोष्टींचे भान ठेवणे रास्त ठरेल.

*  गुंतवणुकीपूर्वी संरक्षण

पैसे कमावण्यास सुरुवात झाल्यावर जे टप्पे चार हात दूर आहेत असे वाटतात, ते अचानक कवाडावर थाप मारत असल्याचे जाणवतात. स्वप्नपूर्तीची आस लागते. स्वप्ने साकारण्यासाठी बचत, गुंतवणुकीची गरज जाणवते. पैसा गुंतवण्यासाठी कोणती जागा संरक्षक आहे हे जाणून घेणे कठीण असते. जरी तुम्हाला तुमच्या बचतीतून- तुमच्या गुंतवणुकीतून कमाई करायची असल्यास कधीही तुमची बचत, स्वप्ने, उद्दिष्टे आणि आयुष्य संरक्षित करणे हुशारीचे असते. यामुळे पॉलिसीधारक आणि लाभधारकाच्या जीवनात एखादा दुर्दैवी प्रसंग घडल्यास त्याच्या बचतीला धक्का न लावता टिकून राहता येते. त्यामुळेच बचत करताना गुंतवणुकीपूर्वी संरक्षण घ्या.

* लवकर संरक्षण करा, फायदा जास्त मिळवा

आर्थिक संरक्षणाचा निर्णय लवकर घेणे नेहमीच शहाणपणाचे ठरते. तुमच्या वयाच्या उमेदीच्या काळात प्रीमियमची रक्कम कमी असते. तसेच जबाबदाऱ्यादेखील कमी असतात. खर्च भविष्यात वाढणारे असतात. जीवन विमा पॉलिसीचे प्रीमियम भरण्याबाबत अनिश्चितता असते. कदाचित आता तुम्ही सुदृढ आहात, त्यामुळे प्रीमियम भरणे कदाचित एखाद्या आर्थिक ओझ्यासारखे वाटू शकते, पण जर तुम्ही अचानक आजारी पडलात तर मग तुम्ही जीवन विमा पॉलिसीची खरेदीच करू शकणार नाही. त्याशिवाय भविष्यात वय, आरोग्याची स्थिती, धूम्रपान इत्यादी घटकांमुळे आजच्या समान विमा कवचाकरिता तुमचा प्रीमियम वाढू शकतो.

* थेट फायदे

निर्णायक संरक्षण लाभाशिवाय, सर्व विमा पॉलिसी या कर बचतीच्या साधनाप्रमाणे असतात. कारण जे प्रीमियम भरले जातात, त्यांना कलम ८०सी अंतर्गत किमान दीड लाखांची कर सवलत मिळते. तसेच आयकर कायद्याच्या कलम १०(डी) अंतर्गत मृत्यू लाभ/परिपक्वता लाभावरही कर सवलत मिळते. विमा हे असे साधन आहे, जे एखादी व्यक्ती दीर्घकालीन गुंतवणूक करत असल्यास त्याची गृहखरेदी, मोटार खरेदी किंवा निवृत्तीचे नियोजन यासारखी दीर्घकालीन उद्दिष्टे सफल होतात. शिवाय, जर तुम्ही योग्य जीवन विमा विकत घेतला तर गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड कर्जाची काळजीही घेतली जाते. या संपूर्ण प्रक्रियेमुळे तुमच्यावर जबरदस्तीने का होईना, बचतीची सवय लागते व आर्थिक नियोजन अंगी भिनते.

* कशी कराल सुरुवात

संरक्षणाची पहिली पायरी म्हणजे आयुष्याच्या विविध टप्प्यांवर येणारी आर्थिक उद्दिष्टे ओळखणे. बाजारातील विमा योजना या व्यक्तीच्या वय, आयुष्याचा टप्पा, प्रीमियमची रक्कम आणि कवच या अनुरूप संरक्षणाचा पर्याय देऊ  करतात. तुम्ही टर्म इन्श्युरन्स (शुद्ध मुदत विमा) घेऊ शकता, ज्याचा प्रीमियम कमी असतो आणि ज्यात लाभधारकाला मृत्यू लाभ दिले जातात. पारंपरिक किंवा युनिट-लिंक्ड पॉलिसी मृत्यू लाभ देऊ करते आणि पॉलिसी परिपक्व झाल्यावर ठरावीक एक रक्कम देते. हा पर्याय टर्म प्लानपेक्षा पसंतीचा आहे. मात्र त्यात ज्यादा पैसा गुंतवावा लागतो. ही पॉलिसी तुम्ही ती विकू शकता किंवा त्यातून मिळकत कमवू शकता.

एकदा का साजेसे उद्दिष्ट साध्य झाले की, तुम्ही विमा कंपनीच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा शाखेत जाऊ शकता किंवा सल्लागाराकडून सुयोग्य मार्गदर्शन घेऊ शकता. तुमच्या उद्दिष्टांनुसार माहिती मिळवा, योजनेची वैशिष्टय़े जाणून घ्या, नियम आणि तरतुदी काळजीपूर्वक वाचा. दाव्याच्या पूर्ततेचे गुणोत्तर तपासा, विमा पुरवठादाराचा ब्रॅण्ड तपासून घ्या व पॉलिसी निवडा. तुमच्या आई-वडिलांचा सल्ला घ्या, कारण त्यांनी अगोदर अशा पद्धतीची खरेदी केलेली असते. त्यामुळे तुम्हाला अंदाज बांधता येतील. आजच्या काळात जीवन विमा तुमच्या दरवाजापर्यंत आला आहे; तुमच्या बकेट लिस्टमध्ये तो प्राधान्याने असू द्या. तुम्ही संरक्षित झालात की, आयुष्यात सगळे यश तुमचेच आहे!

(लेखक, आदित्य बिर्ला सन लाइफ इन्श्युरन्स कंपनीचे मुख्य वितरण अधिकारी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2018 1:04 am

Web Title: life insurance essential tips for buying life insurance
Next Stories
1 फंड विश्लेषण : हरवले ते गवसले का?
2 बाजाराचा तंत्र कल : ‘दिसते मजला सुखचित्र नवे’
3 माझा पोर्टफोलियो : व्यवस्थादृष्टय़ा मोलाची साखळी
Just Now!
X