सअपेक्षेप्रमाणे आगामी लोकसभेच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने सत्तारूढ पक्षाने पहिले पाऊल उचलले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी (की आपली मतपेढी भक्कम करण्यासाठी?) निवडक कृषी उत्पादनाच्या हमीभावात वाढ केली. महागाई वाढण्यास जी कारणे विश्लेषकांना अपेक्षित होती त्यापैकी हे महत्त्वाचे कारण होते. सरकारच्या या धोरणाची दुसरी बाजू अशी की, कृषी उत्पादनाची आधारभूत किंमत वाढल्यामुळे कृषी उत्पादकांचे उत्पन्न वाढल्याने हे पैसे खर्च होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते. रुपयाचे घटलेले विनिमय मूल्य आणि महागाईच्या दरात अपेक्षित असलेल्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेला कमीत कमी हानी पोहोचावी म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेने जूनच्या पतधोरण आढाव्याच्या वेळी व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ केली आहे. या पतधोरण आढाव्याच्या वेळी रिझव्‍‌र्ह बँकेच्या समष्टी अर्थशास्त्राच्या विश्लेषणानुसार आगामी वर्षभरात किरकोळ किमतीवरील आधारित महागाईचा दर ५ ते ५.२५ टक्के राहणे अपेक्षित आहे. महागाईचा दर या पातळीपर्यंत पोहोचला तर अजून प्रत्येकी पाव टक्क्याच्या एक किंवा दोन दरवाढीची विश्लेषकांना अपेक्षा आहे. रेपो दर ६.५० ते ६.७५ दरम्यान राहिल्यास तीन ते पाच वर्षे मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करणाऱ्या फंडाची निवड करणे फायद्याचे ठरेल.

अ‍ॅक्सिस स्ट्रॅटेजिक बाँड फंड हा मीडियम टर्म बाँड फंड असून गुंतवणुकीचे सक्रिय व्यवस्थापन असलेला हा फंड आहे. देवांग शहा या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. हा फंड गुंतवणुकीचा मोठा हिस्सा ‘ट्रिपल ए’ आणि ‘डबल ए’ पत असलेल्या आणि पाच वर्षांपेक्षा कमी मुदत असलेल्या रोख्यांत गुंतवणूक करणारा फंड आहे. सध्या गुंतवणूक केलेल्या रोख्यांची सरासरी मुदत २.४ वर्षे, तर मॉडिफाइड डय़ुरेशन १.९ वर्षे आहे. पोर्टफोलिओचे ‘यील्ड टू मॅच्युरिटी (वायटीएम)’ ९.२६ टक्के आहे. फंडाने गुंतवणूक केलेल्या रोख्यांच्या परताव्याचा दर संदर्भ दरापेक्षा (रेपो दर) २.०० ते २.२५ टक्के अधिक असतो. कमी पत असलेले परंतु किमान रेपो दराहून २ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा असणाऱ्या रोख्यांत गुंतवणूक करतो.

‘सेबी’च्या जोखिमांकनानुसार या फंडाची रिस्क प्रोफाइल ‘मॉडरेट’ या प्रकारात मोडणारी आहे. जोखीम आणि परतावा यांच्यात नेहमीच संबंध असतो. गुंतवणुकीतील जितकी जोखीम अधिक तितका परतावा अधिक. हा फंड ‘ट्रिपल ए’ आणि ‘डबल ए’ पत असलेल्या रोख्यांत गुंतवणूक करणारा फंड असल्याने या फंडातील गुंतवणुकीवर पुढील तीन वर्षांत ७.५ ते ८.२५ टक्के दराने परताव्याची अपेक्षा करणे रास्त ठरेल. समष्टी अर्थशास्त्रीय कारणांनी रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात वाढ केली तरीसुद्धा हा फंड अल्पमुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करणारा असल्याने व्याजदरवाढीमुळे रोख्यांच्या किमतीत कमी घट होईल. बँक मुदत ठेवींवर व्याजदर वाढत असले तरी ही वाढ कमी मुदतीच्या ठेवीत होत आहे. बँक मुदत ठेवींपेक्षा या फंडातील गुंतवणूक कर कार्यक्षम आहे. सध्या बँकांच्या कमी मुदतीच्या ठेवींचे व्याजदर वाढत असल्याने नव्याने केलेल्या या मुदत ठेवींची पुनर्गुतवणूक कमी व्याजदरात होण्याचा धोका अधिक आहे. नव्याने मुदत ठेव करावी अशा व्याजदराच्या शोधात निघालेल्या गुंतवणूकदारांना हरवलेल्या व्याजदराची खंत कमी करेल, असा हा फंड आहे. बँक ठेवींचे व्याजदर आणि त्यावर भरावा लागणारा आयकर लक्षात घेता करपश्चात परतावा म्युच्युअल फंडातील तीन वर्षे किंवा अधिक मुदतीच्या गुंतवणुकीवरील परताव्यापेक्षा कमीच असतो.

स्थिर उत्पन्न गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांना या तीन वर्षांहून अधिक काळासाठी गुंतवणूक करण्याचा एक पर्याय उपलब्ध आहे. वाचकांनी आपल्या जोखिमांकाचा विचार करून या फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय करावा.

अ‍ॅक्सिस स्ट्रॅटेजिक बाँड फंड

* फंड प्रकार             :      मीडियम टर्म बाँड फंड

* फंडाची पहिली एनएव्ही     : २८ मार्च २०१२

* सध्याची एनएव्ही  (६ जुलै २०१८ रोजी)

वृद्धी                   :                १७.०५

लाभांश               :                १०.१६

* जोखीम प्रकार      :      मध्यम

* फंडाचा संदर्भ निर्देशांक : क्रिसिल कंपोझिट बाँड फंड इंडेक्स

* किमान एसआयपी       :      १०००

* किमान गुंतवणूक         :      ५०००

* मॉड डय़ुरेशन                :      १.९ वर्षे

* वायटीएम                     :      ९.२६%

* प्रमाणित विचलन         :     ०.०७५१

* एग्झिट लोड : गुंतवणुकीच्या १० टक्के ३६५ दिवसांपर्यंत लोड नाही, उर्वरित गुंतवणुकीवर ३६५ दिवसांपर्यंत १ टक्का, ३६५ दिवसांनंतर लोड नाही.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)