गेल्या वर्षभरात निर्देशांकावर अनुक्रमे सेन्सेक्सवर ७,४६० आणि निफ्टीवर २,३०० गुणांची वाढ झाली. अशी ही दिमाखदार, डोळे दिपावणारी तेजी २००३ ते २००८ च्या तेजीमय कालखंडाची आठवण करून देते. मे २००३ ला मुंबई शेअर बाजार निर्देशांक अवघा ३,००० अंशांवर आणि निफ्टी ९२० अंशांवर होता. १० जानेवारी २००८ रोजी सेन्सेक्स २१,२०६, तर निफ्टीने ६,३५७चा उच्चांक प्रस्थापित केला. निर्देशांक पाच वर्षांत सातपट झाला. अशा या रम्य आठवणींना उजाळा देणाऱ्या घटना गेल्या वर्षभरात घडल्या. त्यामुळे यावर्षीही हा ‘तेजीचा वारू’ असाच उधळेल की त्याला लगाम बसेल? याचा समतोल आढावा आपण घेऊ या.

चतुरस्र कवयित्री शांताबाई शेळके यांचं एक सुंदर वाक्य आहे. ‘डोक्यात असतं ते काव्य व कागदावर असतं कलाकुसर’ त्याप्रमाणे माझ्या डोक्यातही तेजीचे अतिशय सुंदर, मोहक असेच चित्र आहे. ज्यात नजीकच्या काळात निफ्टीवर १०,६०० ते १०,६५० आणि नंतर १०,८०० ते ११,००० चे उच्चांक आहेत. पण अर्थव्यवस्थेवर जे ओरखडे येत आहेत अथवा संभवत आहेत त्यामुळे कलाकुसरीची किंतु-परंतुची गरज निर्माण होत आहे.

निर्देशांकाने तेजीची नवनवीन शिखर गाठण्याआड येणारे किंतु-परंतु..

  • वर्ष २०१८ मध्ये कच्च्या तेलाचे आलेख हे अतिशय तेजीत असणार आहेत आणि ते प्रति पिंप ८० डॉलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जे भारतीय अर्थव्यवस्थेस घातक आहे.
  • चलन विनिमय दरात डॉलर हा ६४.५०च्या वर टिकल्यास डॉलर सशक्त होऊन ६६ हे डॉलरचे वरचे उद्दिष्ट असेल.
  • वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि प्रत्यक्ष करातून उद्दिष्टापेक्षा कमी महसूल संकलन झाल्यामुळे सरकारला ५० हजार कोटी बाजारातून उभारण्याची गरज भासत आहे. ज्यामुळे वित्तीय तूट ही ३.२ टक्क्य़ांवरून ३.७ टक्क्य़ांपर्यंत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी चलनवाढ होऊन, रिझव्‍‌र्ह बँकेकडून कर्जावरील व्याजदर कमी होण्याची शक्यता धूसर होणार आहे.
  • सध्या शीतपेटीत असलेल्या पण दोघांनाही हुक्की आली की ‘चला युद्धाचा खेळ खेळू या’ असा उत्तर कोरिया-अमेरिकेचा युद्धज्वर. अशा पाश्र्वभूमीवर निफ्टी एकदा ९,७५० ते १०,००० पर्यंत खाली येऊ शकतो.

या तेजी-मंदीच्या समतोल आढाव्यानंतर पुढील आठवडा कसा असेल त्याचा आढावा घेऊ या.

शुक्रवारचा बंद भाव: सेन्सेक्स: ३४,०५६.८३ निफ्टी : १०,५३०.७०

येणाऱ्या दिवसात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांना अनुक्रमे प्रथम ३४,४०० आणि १०,५७५ ते १०,६५०चा भरभक्कम अडथळा असेल. हा अडथळा यशस्वीरीत्या पार केला तर ३४,८०० / १०,८०० अशा निर्देशाकांच्या पातळ्या दृष्टिपथात येतील. अन्यथा निर्देशांकांना ३४,४०० आणि १०,५७५ ते १०,६५०चा अडथळा पार करण्यात अपयश येत असल्यास निर्देशांक प्रथम ३३,२०० ते ३३,५०० आणि १०,३५० ते १०,२५० पर्यंत खाली येऊ शकतो. हे स्तर टिकवण्यात यशस्वी ठरल्यास निर्देशांक पुन्हा तेजीसाठी सज्ज होतील.

सोन्याचा  किंमत-वेध

सोन्याच्या भावाने रु. २८,०००चा आधार घेऊन मंदीच्या गत्रेतील तेजीची झुळूक सुरू झाली आहे. येणाऱ्या दिवसात सोन्याचे भाव सातत्याने पंधरा दिवस रु. २९,००० च्या वर टिकल्यास सोने झळाळून उठेल आणि रु. २९,३०० आणि नंतर २९,६०० ते २९,७०० ही वरची उद्दिष्ट असतील (सोन्याचे भाव ‘एमसीएक्स’वरील व्यवहारावर आधारित)

लक्षणीय समभाग

  • श्नायडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
  • (बीएसई कोड – ५३४१३९)
  • शुक्रवारचा बंद भाव : रु. १२६.३५

श्नायडर इलेक्ट्रिकलचा आजचा बाजारभाव १०० (१२५), ५०(१२६), २०(१२५) अशा सर्व दिवसांच्या चलत सरासरी (मूिव्हग अ‍ॅव्हरेज) वर बेतलेला आहे. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बँड) हा रु. ११५ ते १३० आहे. समभागाची तेजीच्या दृष्टीने ‘कलनिर्धारण पातळी’ ही रु. १३५ आहे. रु. १३५ च्या वर उलाढालीचा आधार (व्हॉल्यूम) असल्यास प्रथम वरचे उद्दिष्ट रु. १५० व नंतर रु. १६५ ते १७५ असेल. दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे रु. २०० ते २२५ असेल. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु. ११४ चा स्टॉप लॉस ठेवावा.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्टॉप लॉसआणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.