खरे तर या वर्षी केवळ लार्ज कॅप कंपन्यांची शिफारस करायचे ठरविले होते. मात्र काही कंपन्या आपल्या कामगिरीने आकर्षित करतात. मला पॉण्डी ऑक्साइड अँड केमिकल्स अशीच सापडली. १९९२ मध्ये श्री. आर. डी. बन्सल यांनी भागीदारीत झिंक धातूचे – जस्ताचे ट्रेडिंग सुरू केले. त्यानंतर पुड्डुचेरी येथे झिंक ऑक्साइडचे उत्पादन चालू केले. जानेवारी १९९६ मध्ये खुली भागविक्री – आयपीओद्वारे पॉण्डी ऑक्साइड अँड केमिकल्स लिमिटेडने बाजारात पदार्पण केले आणि हा भागीदारीचा व्यवसाय ताब्यात घेतला. गेली वीस वर्षे कंपनी प्रामुख्याने लेंड मेटल, ऑक्साइड आणि पीव्हीसी अ‍ॅडिटिव्हच्या उत्पादनात आहे. ही उत्पादने कच्चा माल म्हणून वाहन उद्योगात तसेच रासायनिक कारखान्यात वापरली जातात. सुदैवाने वाहन उद्योगाचे दिवस सध्या चांगले चालले आहेत. सौर ऊर्जेच्या वाढत्या मागणीमुळे औद्योगिक बॅटरीज्ला चांगली मागणी आहेच. तीन वर्षांपूर्वी कंपनीने आपली उत्पादन क्षमता दुप्पट म्हणजे ५७,००० टनांवर नेली आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुड्डुचेरी  येथे कंपनीचे कारखाने असून आंध्र प्रदेशातील उत्पादन अमर राजा बॅटरीज् या प्रमुख ग्राहक कंपनीजवळच केले जाते. कंपनीच्या एकूण उलाढालींपैकी सुमारे ५० टक्के उलाढाल निर्यातीतून होते. जपान, कोरिया, इंडोनेशिया आणि आखाती देशांखेरीज कंपनीचे इतर देशांतही ग्राहक आहेत. गेल्या तीन वर्षांत कंपनीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. साहजिकच या कालावधीत कंपनीचा शेअरदेखील २८ रुपयांवरून ५५० रुपयांवर गेला. मार्च २०१७ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने ७५८.६८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २६.२७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो १५९ टक्के अधिक आहे. यंदा तसेच आगामी कालावधीत कंपनीकडून अशाच भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. केवळ ५.५८ कोटी रुपयांचे भाग भांडवल असलेली आणि फक्त मुंबई शेअर बाजारावर नोंदणी असलेली पॉण्डी ऑक्साइड अँड केमिकल्स सध्या ४२० रुपयांच्या जवळपास उपलब्ध आहे. ज्या गुंतवणूकदाराची थोडा धोका पत्करायची तयारी आहे असे गुंतवणूकदार हा शेअर खरेदी करू शकतात.

arth1-chart

सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.