करबचतीचा फायदा घ्यावयाचा असेल तर गुंतवणूक काही ठरावीक कालावधीसाठी धारण करणे ही महत्त्वाची अट आहे. वेगवेगळ्या गुंतवणुकीसाठी हा कालावधी वेगवेगळा आहे. हा कालावधी किती आहे आणि हा कालावधी संपेपर्यंत जर गुंतवणूक धारण केली नाही तर काय परिणाम होतो ते आपण बघू या..

‘कलम ८० सी’नुसार केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीविषयी माहिती आपण मागील लेखाद्वारे घेतली. जर या गुंतवणुकीची उत्पन्नातून वजावट घेऊन करबचतीचा फायदा घ्यावयाचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे हे अभिप्रेतच आहे. यामध्ये ही गुंतवणूक काही ठरावीक कालावधीसाठी धारण करणे ही महत्त्वाची अट आहे. वेगवेगळ्या गुंतवणुकीसाठी हा कालावधी वेगवेगळा आहे. हा कालावधी किती आहे आणि हा कालावधी संपेपर्यंत जर गुंतवणूक धारण केली नाही तर काय परिणाम होतो ते आपण बघू या :

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
TDS on salary tax regime
पगारावरील टीडीएस वाचवण्यासाठी जुनी की नवी कोणती कर रचना निवडणार? जाणून घ्या

जीवन विमा पॉलिसी :

करदात्यांना भविष्यकाळात पैशांची सोय व्हावी आणि आपल्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा या दीर्घकालीन उद्देशातून जीवन विमा घेतला जातो. यातून सक्तीची बचत होते आणि याचा फायदा करदात्याला मिळतो. याशिवाय जीवन विमा हफ्त्याची वजावट उत्पन्नातून मिळते. करदात्याने हा विमा मुदतीपर्यंत चालू ठेवला तर मुदतपूर्तीनंतर मिळालेले पैसे (बोनससहित) करमुक्त असतात. याला काही अपवाद आहेत.

खालील परिस्थितीत मुदतीनंतर मिळालेले पैसे करपात्र आहेत :

* १ एप्रिल २००३ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत जारी केलेल्या विमा पॉलिसीच्या बाबतीत कोणत्याही एका वर्षांत विमा हफ्ता, विमा रकमेच्या २० टक्क्य़ांपेक्षा जास्त असल्यास,

* १ एप्रिल २०१२ नंतर जारी केलेल्या विमा पॉलिसीच्या बाबतीत कोणत्याही एका वर्षांत विमा हफ्ता, विमा रकमेच्या १० टक्क्य़ांपेक्षा जास्त असल्यास.

* फक्त अपंगांसाठी १ एप्रिल २०१३ पासून जारी केलेल्या विमा पॉलिसीच्या बाबतीत ही १० टक्क्य़ांची मर्यादा ही १५ टक्के इतकी आहे.

वरील अटी मृत्यूनंतर मिळालेल्या विमा रकमेसाठी लागू नाहीत. म्हणजेच मृत्यूनंतर वारसदारांना मिळालेली रक्कम करमुक्तच असते.

बऱ्याच वेळेला असे होते की करदाता काही कारणाने विम्याचे हफ्ते भरू शकत नाही आणि विमा पॉलिसी रद्द होते किंवा करदात्याने इतर कारणाने मुदतीपूर्वी विमा पॉलिसी रद्द केली तर खालील परिस्थितीत ‘कलम ८० सी’नुसार त्यावर्षीच्या विमा हफ्त्याची वजावट मिळत नाही, शिवाय मागील वर्षांत घेतलेली वजावटसुद्धा या वर्षीच्या उत्पन्नात गणली जाते आणि त्यावर कर भरावा लागतो :

* एकल हफ्ता विमा (सिंगल प्रीमियम) पॉलिसी असेल आणि ती पॉलिसी घेतल्या तारखेपासून दोन वर्षांत रद्द केली तर,

* आणि इतर विमा पॉलिसीच्या बाबतीत विमा पॉलिसी दोन वर्षांचा विमा हफ्ता भरण्यापूर्वी रद्द केली तर.

करदात्याने वरील तरतुदींचा विचार करून विम्याची मिळालेली रक्कम करपात्र आहे किंवा नाही ते ठरवावे. जर करपात्र असेल तर ती विवरणपत्रात दाखवून त्यावर कर भरावा. करमुक्त नसलेल्या विमा रकमेवर उद्गम कराच्या तरतुदी लागू केल्यामुळे अशा रकमेची माहिती प्राप्तिकर खात्याकडे जाते. आपल्या उत्पन्नात अशी रक्कम न जुळल्यास प्राप्तिकर खात्याकडून विचारणा होऊ शकते.

घर विक्री :

‘कलम ८० सी’नुसार नवीन घराच्या खरेदीसाठी भरलेले मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्काची वजावट उत्पन्नातून मिळते. तसेच गृहकर्जाच्या मुद्दल रकमेची वजावटही या कलमाद्वारे मिळते. हे घर ताबा घेतल्यानंतर पाच वर्षांच्या आत विकले तर ज्यावर्षी घर विकले त्यावर्षी या कलमानुसार गृहकर्जाच्या परतफेडीची किंवा मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क याची वजावट मिळत नाही. शिवाय मागील वर्षांमध्ये घेतलेली वजावटसुद्धा या वर्षीच्या उत्पन्नात गणली जाते आणि त्यावर कर भरावा लागतो.

दीर्घ मुदतीची भांडवली संपत्ती म्हणून स्थावर मालमत्तेची धारणकाळ मर्यादा तीन वर्षे कमी करून या वर्षीपासून दोन वर्षे जरी केली गेली असली तरी घराची विक्री करताना ‘कलम ८० सी’नुसार घेतलेल्या वजावटीचा विचार करावा. घर खरेदी केल्याच्या तारखेपासून दोन वर्षांनंतर विकले तर दीर्घ मुदतीचा भांडवली नफा दुसऱ्या घरात गुंतवून कर वाचविता येतो. अशा तऱ्हेने जरी कर वाचविता येत असला तरी या घरावर पूर्वी आधीच्या वर्षांत घेतलेली वजावट उत्पन्नामध्ये जमा होऊन त्यावर कर भरावा लागेल. म्हणजेच ज्यांनी घर खरेदी करताना आणि त्यानंतर ‘कलम ८० सी’नुसार वजावट घेतली आहे त्यांनी घर पाच वर्षांनंतर विकण्याचा विचार करावा.

‘कलम २४’नुसार व्याजाची वजावट घेतली असेल आणि घराची विक्री पाच वर्षांच्या आत केली तरी आधीच्या वर्षांमध्ये घेतलेल्या गृहकर्जाच्या व्याजाच्या वजावटीवर काही परिणाम होत नाही. ही वजावट उत्पन्नात गणली जात नाही, फक्त ‘कलम ८० सी’नुसार मुद्दल परतफेड, ज्याची पूर्वीच्या वर्षांत वजावट घेतली होती, ती रक्कम उत्पन्नात गणली जाते.

युलिप :

विमा योजनेच्या ‘युनिट लिंक्ड इक्विटी प्लान (युलिप)’मध्ये पैसे गुंतवून ‘कलम ८० सी’प्रमाणे वजावट घेतली असेल आणि हा प्लान पाच वर्षांत रद्द केला किंवा हफ्ता न भरल्यामुळे हा प्लान पाच वर्षांत रद्द झाला आणि त्याचे नूतनीकरण न केल्यास त्यावर्षी हफ्त्याची वजावट मिळत नाही. शिवाय मागील वर्षांमध्ये घेतलेली वजावटसुद्धा या वर्षीच्या उत्पन्नात गणली जाते आणि त्यावर कर भरावा लागतो.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना :

ज्येष्ठ नागरिक बचत योजना नियम २००४ आणि पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट नियम १९८१: या योजनेनुसार करदात्याने गुंतवणूक करून ‘कलम ८० सी’ची उत्पन्नातून वजावट घेतली असेल आणि खात्यात पैसे जमा केलेल्या तारखेपासून पाच वर्षांत पैसे व्याजासकट काढले तर ज्या वर्षी पैसे काढले त्यावर्षी ही काढलेली रक्कम उत्पन्नात गणली जाते. परंतु खालील रक्कम ही उत्पन्नात गणली जात नाही :

एक तर या खात्यावर मिळणारे व्याज. हे व्याज करपात्र असल्यामुळे करदात्याने त्या त्या वर्षीच्या उत्पन्नात दाखवून त्यावर कर भरलेला असतो. या रकमेवर एकदा कर भरला गेला असल्यामुळे परत कर भरावा लागत नाही.

दुसरे म्हणजे करदात्याच्या मृत्यूनंतर वारसदाराला मिळालेली रक्कम.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) :

हे खाते १५ वर्षांसाठी आहे. यानंतर खात्याचा कालावधी पाच-पाच वर्षांसाठी वाढविता येतो. १५ वर्षांनंतर व्याजासकट मिळालेली रक्कम ही करमुक्त आहे. हे खाते १५ वर्षे संपण्यापूर्वी बंद करता येत नाही. मात्र खातेदाराच्या मृत्यूनंतर हे खाते बंद होऊन पैसे वारसदाराला मिळतात. ते वारसदाराला करमुक्त असतात. मुदतीपूर्वी या खात्यातून सातव्या वर्षी पैसे काढता येतात. या खात्यातून काढलेली रक्कम करपात्र उत्पन्नात गणली जात नाही.

प्रवीण देशपांडे pravin3966@rediffmail.com

(लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार आहेत.)