23 November 2017

News Flash

‘एसटीपी’ एक उमदे गुंतवणूक धोरण

‘एसटीपी’ ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची एक सर्वात चांगली रणनीती आहे.

व्यापार प्रतिनिधी | Updated: July 10, 2017 1:02 AM

‘एसटीपी’ ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची एक सर्वात चांगली रणनीती आहे

एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या सेवेतून श्री. नवीनचंद्र प्रधान नुकतेच निवृत्त झाले. त्यांना ४५ लाखांची रक्कम निवृत्ती लाभापोटी मिळाली. प्रधान यांच्या वित्तीय नियोजकाने, निवृत्ती लाभ म्हणून मिळणारी ही रक्कम दीर्घकालीन भांडवली वृद्धीसाठी समभागसंलग्न अर्थात इक्विटी फंडात गुंतविण्याचा सल्ला त्यांना दिला. मात्र त्यावेळची बाजार निर्देशांकांची पातळी ही नव्याने इक्विटी फंडात गुंतविण्यास प्रधान यांना योग्य वाटली नाही. परंतु पाच वर्षांच्या कालावधीत बाजारातील गुंतवणुकीबाबत प्रधान आशावादी आहेत. त्यामुळे प्रधान यांनी त्यांच्या वित्तीय नियोजकाला ही रक्कम इक्विटी फंडात टप्प्याटप्प्याने गुंतवावी असे सांगितले. वित्तीय नियोजकाने प्रधान यांना गुंतवणूक करता येईल अशा संभाव्य पाच इक्विटी फंडांची नावे निश्चित केली. प्रत्येक फंडात नेमकी किती गुंतवणूक करायची हे ठरल्यानंतर प्रधान यांनी त्याच फंड घराण्याच्या लिक्विड फंडात रक्कम गुंतविणे आवश्यक आहे असे ठरले. एक नियोजन आखून देण्यात आले आणि ठरावीक रक्कम दरमहा, आठवडय़ातून एकदा किंवा महिन्यातून एकदा लिक्विड फंडातून त्यांनी निश्चित केलेल्या इक्विटी फंडात गुंतविली जाईल, अशी तजवीज केली गेली.

दररोज, आठवडय़ातून एकदा, महिन्यातून एकदा, तीन महिन्यांतून एकदा अथवा गुंतवणूकदाराला जो सोयीचा वाटेल तो कालावधी निर्धारित करून एका फंडातून दुसऱ्या फंडात रक्कम गुंतविता येण्याची सुविधा म्युच्युअल फंडात आहे. या संकल्पनेला सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लान अर्थात ‘एसटीपी’ असे म्हटले जाते. याच संकल्पनेचा वापर करून प्रधान यांना लिक्विड फंडातून समभागसंलग्न अर्थात इक्विटी फंडात नियमित रक्कम गुंतविता आली आहे.

‘एसटीपी’ ही संकल्पना अधिक विस्ताराने समजून घेऊ या. तिचे मुख्यत: दोन प्रकार आहेत. फिक्स्ड एसटीपी आणि कॅपिटल अ‍ॅप्रिसिएश एसटीपी. पहिल्या प्रकारच्या एसटीपीमध्ये पूर्वनियोजित निश्चित रक्कम, निश्चित दिवशी एका फंडातून दुसऱ्या फंडात गुंतविली जाईल तर कॅपिटल अ‍ॅप्रिसिएश एसटीपीमध्ये मूळ रक्कम तशीच राहून मुद्दलावरील फक्त भांडवली वृद्धी दुसऱ्या फंडात गुंतविली जाते. फिक्स्ड एसटीपीमध्ये लिक्विड किंवा रोखे फंडातून रक्कम इक्विटी फंडात तर कॅपिटल अ‍ॅप्रिसिएश एसटीपीमध्ये काहीसे उलट म्हणजे इक्विटी फंडातील नफा हा रोखे गुंतवणूक असलेल्या फंडात गुंतविला जातो.

समभाग गुंतवणुकीला बाजार-जोखीमेचा पैलू असतो, त्यामुळे ही जोखीम कमी करण्यासाठी ‘एसटीपी’चा वापर करण्याचा सल्ला म्युच्युअल फंड विक्रेते देत असतात. वर उल्लेख केलेल्या उदाहरणात प्रधान यांना पाच इक्विटी फंडात प्रत्येकी ९ लाख गुंतवायचे आहेत, परंतु ते एकरकमी न गुंतविता टप्प्याटप्प्याने गुंतविले जावेत असे त्यांनी ठरविले. यासाठी त्यांनी ‘एसटीपी’चा पर्याय वापरला. ‘एसटीपी’च्या माध्यमातून नेमकी कशी रक्कम गुंतविली जाते हे उदाहरणाने समजावून घेऊ. वर्षांपूर्वी प्रधान यांच्या नियोजनकाने त्यांना ‘एसटीपी’ धोरणान्वये करावयाच्या गुंतवणुकीसाठी सोबत दिलेली तीन कोष्टके दाखविली.

समजा प्रधान यांनी १ जुलै २०१६ रोजी ९ लाख रुपये लिक्विड फंडात गुंतविले आणि ११ जुलैपासून दररोज ५ हजार रुपये निश्चित केलेल्या इक्विटी फंडात गुंतविण्यास सुरुवात केली तर ही मालिका ७ एप्रिल २०१७ पर्यंत सुरू राहिली असती. या गुंतवणुकीवर त्या इक्विटी फंडाच्या ४ जुलैच्या ‘ग्रोथ’ पर्यायातील एनएव्हीनुसार २७.८५ टक्के वार्षिक नफा झाला असता. एसटीपीचा कालावधी मुख्यत्वे गुंतलेली रक्कम व एसटीपीची रक्कम यावर निर्धारित असतो. समजा, रोज २,००० रुपये एसटीपीच्या माध्यमातून गुंतविले असते तर ९ लाख संपण्यासाठी ४७८ कामकाजाचे दिवस लागले असते. प्रधान हे दररोजऐवजी ही रक्कम साप्ताहिक किंवा मासिक पद्धतीनेही गुंतवू शकतात. प्रधान यांना वित्तीय नियोजकाने दाखविलेल्या उदाहरणातील इक्विटी फंडात एकरकमी १ लाख रुपये १ जुलै २०१६ रोजी थेट गुंतविले असते तर प्रधान यांच्या आजच्या गुंतवणुकीचे मूल्य १,२१,५९७ रुपये असते आणि वार्षिक परताव्याचा दर तुलनेने कमी २१.६७ टक्के दिसला असता. प्रदीर्घ काळ चाललेली एसटीपी एकाच वेळी केलेल्या गुंतवणुकीपेक्षा कमी किंवा अधिक नफा देईल किंवा नाही हे नक्की सांगता येणार नाही. परंतु गुंतवणुकीची जोखीम नक्कीच कमी होईल. जे गुंतवणूकदार २५ हजारांपेक्षा अधिक रकमेची ‘एसआयपी’ करतात त्यांना चांगले सल्लागार लिक्विड फंडात ‘एसआयपी’ करून इक्विटी फंडात रोज १,००० रुपये लिक्विड फंडातून इक्विटी फंडात एसटीपी करण्याचा सल्ला देतात. कारण दर दिवशी निश्चित रक्कम गुंतविल्याने बाजारातील दैनंदिन चढ-उतारांच्या जोखीमेचा आघात सौम्य होऊन, ‘रूपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग’ चांगल्या प्रकारे होते.

arth05

‘एसटीपी’ ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची एक सर्वात चांगली रणनीती आहे. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपीप्रमाणेच एकरकमी मोठी गुंतवणूक न करता ‘एसटीपी’चा वापर केल्यास गुंतवणुकीतील जोखीम नक्कीच कमी करता येते. गुंतवणुकीत शिस्त बाळगणे आवश्यक असते. हा हेतू ‘एसटीपी’मुळे साध्य होईल. अल्पावधीत झालेली घसरण किंवा व्याज दर कमी अधिक झाल्यास गुंतवणुकीच्या दीर्घकालीन परताव्यावर परिणाम होतो. हे ‘एसटीपी’च्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास टाळता येणे शक्य आहे. शेवटी ‘एसटीपी’ करताना सारासार विचार करायलाच हवा. जेव्हा बाजाराचे आकर्षक मूल्यांकन असते तेव्हा थेट समभाग गुंतवणूक करणे हिताचे असते. जेव्हा बाजार निर्देशांक शिखराच्या जवळ असतात तेव्हा घसरणीचा धोका टाळण्यासाठी ‘एसटीपी’चा वापर करणे हिताचे असते.

arthmanas@expressindia.com

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

First Published on July 10, 2017 1:02 am

Web Title: stp the best strategies to invest in a mutual fund