अब्जावधी डॉलरच्या अवाढव्य अशा जागतिक अन्नपदार्थ बाजारपेठेत हवामान अंदाजाचे मोठे महत्त्व आहे. केवळ किमतीवरील परिणामच नव्हे तर आपल्या देशाची अन्नसुरक्षा जपणे हे प्रत्येक देशापुढे आव्हान असताना हवामानविषयक अचूक माहिती मिळणे ही कळीची आणि अर्थातच अत्यंत महागडी सेवा ठरली आहे.

मूलत: कमोडिटी बाजारातील किमती या मागणी आणि पुरवठा या अर्थशास्त्रीय घटकावर अवलंबून असल्या तरी प्रत्यक्ष मागणी आणि प्रत्यक्ष पुरवठा यापेक्षा त्याबद्दलच्या अपेक्षा आणि अंदाजांचाच जास्त प्रभाव बाजारावर होत असतो. या अपेक्षा आणि अंदाज निर्माण करण्यात अनेक प्रकारची माहिती कारणीभूत असते. जसे देशाच्या अर्थसंकल्पातून जाहीर होणारी वस्तूंच्या आयात-निर्यात शुल्क रचना आणि धोरणातील बदल, पेरण्या आणि उत्पादनाचे आगाऊ अंदाज, त्याचप्रमाणे परराष्ट्रांमधील घडामोडी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार या साधारणत: वस्तूच्या किमतीवर खूप प्रभाव टाकत असतात.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Increase in number of cancer patients in India
भारताला कर्करोगाचा विळखा आणखी घट्ट! जाणून घ्या कोणत्या कर्करोगाचा धोका वाढला…
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

मात्र या सर्व गोष्टींइतकाच किंबहुना थोडा जास्तच महत्त्वाचा घटक वस्तूंच्या किमतीवर वर्षभर प्रभाव टाकत असतो तो म्हणजे हवामान. प्रामुख्याने कृषी आणि कृषी-आधारित उत्पादनांवर हवामानाचा जास्त परिणाम होत असला तरी बिगर-कृषी वस्तूंवरही अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. तर या हवामानाचे एवढे काय असे महत्त्व आहे हे समजावून घेणे फार महत्त्वाचे आहे. साधारणत: आपला हवामानाशी संबंध म्हणजे लोकलच्या गर्दीत उभे असताना, ‘या वर्षी फारच लवकर उकडायला लागलंय बुवा’ हे म्हणण्यापलीकडे किंवा टीव्ही वाहिन्यांवरील बातमीपत्राच्या शेवटी आजचे हवामान सदरात दिलेल्या तापमानाच्या आकडय़ांपलीकडे फारसा नसतो. अवकाळी पाऊस आला तर पिकाचे खूप नुकसानच झाले असणार या समजाने आपण हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिगवर चर्चा करू लागतो अथवा उत्सुकता दाखवतो. मात्र कमोडिटी बाजारात कार्यरत व्यक्ती आणि कंपन्या किंवा कृषीविषयक सल्ला आणि सेवा देणाऱ्या सरकारी आणि खासगी कंपन्या यांच्यासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातील हवामानावर वर्षांचे १२ महिने आणि दिवसाचे २४ तास लक्ष ठेवावे लागते.

भारतापुरते बोलायचे झाल्यास सर्वात महत्त्वाचा हवामानविषयक अंदाज म्हणजे जून-सप्टेंबरमध्ये येणाऱ्या मोसमी पावसाचा अंदाज. आपल्या देशातील शेती ही प्रामुख्याने प्रत्यक्ष पावसावर अवलंबून असून, काही मोजक्या राज्यातच सिंचनाची चांगली व्यवस्था आहे. शेवटी या सिंचनासाठी पाणीही पाऊस झाला तरच येते. म्हणून हवामान खात्याच्या एप्रिलअखेरीस येणाऱ्या पहिल्या अंदाजाची सर्व जण आतुरतेने वाट पाहात असतात.

मात्र फेब्रुवारी-मार्चपासूनच परदेशातील प्रमुख हवामान सेवा कंपन्या ढोबळ अंदाज व्यक्त करायला सुरुवात करतात आणि त्याचा येथील गहू, तांदळावर तसेच इतर किमतीवर प्रभाव पडायला सुरुवात होते. म्हणजे पेरणी केलेल्या जिन्नसांचे प्रत्यक्ष उत्पादन नोव्हेंबर-जानेवारीमध्ये येणार असले तरी हवामान अंदाजाच्या बातम्या मार्चपासूनच किमतीवर परिणाम करतात.

उदाहरणार्थ, मोसमी पाऊस या वर्षी सरासरीपेक्षा कमी राहणार अशी बातमी आली तर तांदूळ, तूर, सोयाबीनसारख्या वस्तूंच्या किमतीत पेरणी अगोदरच वाढ होते. कारण या वस्तूंचा पुरवठा कमी पावसामुळे घटणार असे अंदाज व्यक्त होऊ लागतात. बाजार किमती या मागणी-पुरवठा यापेक्षा त्याबद्दलचे ‘सेंटिमेंट्स’ किंवा अंदाजबांधणीवर जास्त अवलंबून असतात, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.

अलीकडच्या काही वर्षांत ‘अल-निनो’ आणि ‘ला-निना’ या हवामानविषयक दोन प्रमुख शब्दांच्या मुक्तहस्ते वापर होताना दिसतो. अनेक देशांची कृषीविषयक धोरणे त्यानुसार बदलत असतात. या दोन्ही हवामानविषयक घटनांचा प्रत्यक्ष पाऊस-पाण्यावर आणि पर्यायाने कमोडिटी बाजारावर पडणारा प्रभाव खूपच मोठा आहे, तेव्हा ‘अल-निनो’ आणि ‘ला-निना’ यांचा अर्थ क्लिष्ट वैज्ञानिक भाषेत समजावून घेण्याऐवजी, फक्त परिणामांच्या अंगाने सरळ-सोपा भाषेत त्यांना समजून घेऊ या.

या दोन्ही घटकांचा जागतिक पाऊस-पाण्यावर थेट परिणाम होत असतो हे आता सिद्ध झाले आहे. ‘अल-निनो’मुळे भारतात आणि आशियाई देशांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. भारतात तांदळाचे प्रचंड उत्पादन होते ते मुख्यत: पावसाच्या पाण्यावर. तेव्हा अल-निनो जेवढा जास्त प्रभावी तेवढे तांदळाचे उत्पादन कमी होणार हा अंदाज लगेचच बांधला जातो. तांदळाच्या किमती भारताबरोबर जगातही लगेच वाढू लागतात. कारण भारताबरोबर थायलंड, व्हिएतनाम हे देशही जगाला तांदूळ पुरवतात. तसेच भारताला आणि जगाला पामतेलाच्या रूपात परवडणारे खाद्यतेल पुरविणाऱ्या मलेशिया आणि इंडोनेशियाला ‘अल-निनो’मुळे कमी पाऊस होतो आणि उत्पादन घटते. म्हणून खाद्यतेलाच्या किमती ‘अल-निनो’ प्रभावानंतरच्या एक वर्षभर चढय़ाच असतात.

याच्या अगदी उलट ‘ला-निना’ हा घटक प्रभाव साधतो. ‘ला-निना’मुळे भारत आणि आशियाई देशांत अधिक पाऊस होतो. मात्र दक्षिण अमेरिका, जी जगाला सोयाबीन, सोया तेल आणि पशू तसेच कुक्कुटपालन क्षेत्रासाठी सोयामील आणि पेंड पुरविते त्या ब्राझील आणि अर्जेटिन या दोन देशांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे या वस्तूंच्या किमती चढय़ा राहतात.

या दोन हवामानविषयक घटनांव्यतिरिक्त अन्यही पाऊस आणि तापमानविषयक घटनांचे मोठे परिणाम वस्तूंच्या किमतीवर फार आधीपासून होतात. जसे, कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा रशिया, युक्रेनमध्ये दुष्काळ म्हणजे जागतिक बाजारात गव्हाच्या किमती भडकणारच. कारण या चार देशांवरच जगातील प्रमुख देश या धान्यासाठी अवलंबून आहेत.

अब्जावधी डॉलरच्या अवाढव्य अशा जागतिक अन्नपदार्थ बाजारपेठेत हवामान अंदाजाचे किती महत्त्व आहे, हे यावरून लक्षात येते. केवळ किमतीच नव्हे तर आपल्या देशाची अन्नसुरक्षाच जपणे हे प्रत्येक देशापुढे आव्हान असताना हवामानविषयक अचूक माहिती ही महत्त्वाचीच आणि अर्थातच अत्यंत महागडी सेवा ठरली आहे. हवामान सल्ला आणि सेवा या ढोबळ स्वरूपात संकेतस्थळामार्फत मोफत किंवा अल्पदरात मिळत असल्या तरी ग्राहकाभिमुख आणि सखोल अशा हवामान सेवा पुरविणाऱ्या काही अमेरिकन आणि जपानी कंपन्यांची मासिक वर्गणी अविश्वसनीय महाग असते.

जागतिक पातळीवर कमोडिटी ट्रेडिंग करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या या सेवांवर प्रचंड खर्च करीत असतात. थोडक्यात हवामान सेवा आणि सल्ला हा एक स्वतंत्र फायद्यातील उद्योग आहे. असेही म्हटले जाते की, वस्तूच्या त्या त्या वेळच्या किमतीमध्ये ‘हवामान’ या घटकाचाही १५-२० टक्के वाटा असतो.

जागतिक तापमानवाढीचा प्रश्न जटिल होत असताना, पुढील दशकात सरासरी तापमानात २ अंश सेल्सियसची वाढ होण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. या परिस्थितीत गव्हाच्या उत्पादनाला भारतात मोठा फटका बसू शकेल. गहू या पिकाच्या अन्नसुरक्षेमधील सिंहाचा वाटा लक्षात घेता शास्त्रज्ञांनी आतापासूनच गव्हाची शेती कशा पद्धतीने टिकविता येईल याचे संशोधन सुरू केले आहे. आजच्या रिअल-टाइम आणि ऑनलाइन जगतात हवामानाचा कमोडिटी बाजारावर, वायदे बाजारावर किती आणि कसा परिणाम होतो, हे खालील उदाहरणावरून लक्षात येते. या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा ‘ला-निना’चा पहिला अंदाज वर्तविला गेला त्याच्या दुसऱ्याच मिनिटाला अमेरिकेमध्ये साखरेच्या वायदा दरात ४-५ टक्के वाढ झाली, कारण ‘ला-निना’ म्हणजे ब्राझीलमध्ये दुष्काळ, असा स्पष्ट अर्थ आणि जगातील साखरेचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या ब्राझीलमध्ये साखरेचा पुरवठा कमी होणार हे तर्क त्यामागे होते. त्याचप्रमाणे अल-निनोच्या प्रत्येक अंदाजासरशी पामतेलाच्या वायद्यांमध्ये वाढ होत असते.

आता एवढय़ा महत्त्वाच्या हवामानाचे वायदे बाजारात ट्रेडिंग झाले नाही तरच नवल. बर्फवृष्टी, वादळ, पर्जन्यमानाशी निगडित घटना-अंदाजांचा वायदे बाजारातील व्यवहारांवर थेटच परिणाम होत असतो. वायदेबाजाराला त्यांचे अंदाज बांधणारे सेवांचा जितका उपयोग त्यापेक्षा जास्त उपयोग हा पीक-विमा क्षेत्रातील कंपन्यांना होत असतो. हवामानातील उलथापालथीने पिकांचे नुकसान होऊन प्रचंड विमा मोबदला द्याव्या लागल्याने होणाऱ्या तोटय़ापासून संरक्षणासाठी त्यांना हे ‘जोखीम व्यवस्थापन’ करावेच लागते.

(लेखक वस्तू बाजार  विश्लेषक )

श्रीकांत कुवळेकर ksrikant10@gmail.com