एकशे चाळीस वर्षांचा शेअर बाजाराचा इतिहास व १२५ कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात आजही डीमॅट खात्यांची संख्या फक्त २.५ कोटी (२ टक्के) आहे. कोणाला माहीत, ही संख्या वाढवण्यासाठी उद्या ‘पंतप्रधान डीमॅट अकौंट्स’ योजना येईल. असे ‘हाकारे’ लावून नागरिकांना शेअर बाजाराकडे वळवण्याच्या ‘मॉडेल’चे काय होऊ शकते हे शांघायने दाखवले आहे.
साधारणपणे आठ वर्षांनी जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत घसरते असे म्हणतात. आधीची मंदी २००८ मध्ये आली होती. म्हणजे २०१६ मध्ये पुन्हा ती ‘घसरेल’ अशी भीती जाणकार व्यक्त करीतच होते. तेवढय़ात वर्षांच्या पहिल्याच आठवडय़ात चीनच्या शांघाय शेअर बाजारने दोनदा जोरदार आपटी खाल्लीदेखील! त्याचे ‘प्रतिध्वनी’ जगभर अजूनही उमटत आहेत.
बऱ्याच वेळा सट्टेबाजीच्या अतिरेकामुळेच शेअर बाजार कोसळतात हे खरे. पण अलीकडे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या प्रोफाइलमध्ये बदल होत आहेत. म्युच्युअल, विमा, पेन्शन कंपन्या नागरिकांच्या बचती गोळा करूनच शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करतात. अनेक देशांमध्ये मध्यम, निम्नवर्गीयांनी आपल्या बचती शेअर्समध्ये गुंतवाव्यात यासाठी मोहिमा काढल्या जातात. ‘शेअर्समध्ये गुंतवणूक करा, महागाईवर मात करा’ अशा जाहिराती! त्याला प्रतिसाददेखील मिळत आहे. वाचकांना, प्रथमच शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे शेजारी, नातेवाईक, सहकारी माहीत असतील. आजच्या ‘वित्तीयकरणाच्या’ युगात, शेअरबाजारच्या वरखाली होण्याने अर्थव्यवस्था, उत्पादन, रोजगार यांवर होणारा बरावाईट परिणाम टाळता येणे अशक्य होऊन बसले आहे. याचा अर्थ असा की, शेअर बाजारमधील चढउतारांमध्ये आता सामान्य नागरिकांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष स्टेक लागलेले असतात. यासाठीच ‘शांघाय’ कोसळण्याचे अर्थ सट्टेबाजीच्या पलीकडे जाऊन लावायला हवेत.
दररोजची शेअर्सची व डॉलर्सची उलाढाल, मार्केट कॅपिटलायझेशन अशा संख्यात्मक निकषांवर शांघायने, फक्त पंचवीस वर्षांत, जगातील अनेक काही शे वष्रे जुन्या शेअर बाजारांना मागे टाकले. पण स्थिरता, गुंतवणूकदारांची परिपक्वता असे निकष लावले, की जाणवते की, ते कोसळणे अपरिहार्य का होते.
‘शांघायचे’ कोसळणे अपरिहार्य
प्राय: समाजातील बचती घेऊन त्यांची शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या संस्थांना ‘संस्थात्मक (इन्स्टिटय़ूशनल) गुंतवणूकदार’ म्हणतात. तर व्यक्तींना ‘किरकोळ (रीटेल) गुंतवणूकदार’ संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभाग लक्षणीय असेल तर शेअर बाजार तुलनेने स्थिर असतात असे मानले जाते. पण चीनमध्ये किरकोळ क्षेत्राचे प्राबल्य आहे. हे प्राबल्य वाढण्यासाठी पुढील काही गोष्टी कारणीभूत ठरल्या : उच्च/ मध्यम/कनिष्ठ वर्गात लवकरात लवकर श्रीमंत होण्याचे वेड साथीच्या रोगासारखे पसरले. अनेक जण नोकऱ्या सोडून पूर्ण वेळ शेअरचा व्यवसाय करू लागले, ब्रोकर्सनी शेकडो कार्यालये उघडली. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँकाच नाही तर ब्रोकर्स कर्जे देऊ लागले! परिणामी चीनचे पाच कोटी नागरिक, त्यातील अनेक जेमतेम शिकलेले, पहिल्यांदाच शेअर बाजाराचे गुंतवणूकदार बनले. शेअर बाजारामधील गुंतवणूकदारांकडे कंपन्यांची बॅलन्स शीट, विनिमय व व्याज दरांचा प्रभाव, परदेशी गुंतवणूकदारांचा कल समजण्यासाठी जो किमान वकूब हवा तो त्यांच्याकडे नव्हता. अशा अभ्यासाअभावी गुंतवणूकदार चक्क झुंडीसारखे वागतात असा अनुभव आहे. गुंतवणूकदारांच्या या झुंडींनी शेअर्सची तुफान खरेदी केली आणि शांघाय निर्देशांक (आपल्या सेन्सेक्ससारखा) जुल २०१४ पासून फक्त बारा महिन्यांत २२०० वरून ५२०० वर नेला. शेअर बाजार कोसळणार का याचे अंदाज वर्तवण्याचे दोन गणिती निकषदेखील आहेत. एक पीई गुणोत्तर (प्राइस अìनग) व दुसरा व्हीआयएक्स (व्होल्याटिलिटी इण्डेक्स). पीई गुणोत्तर शेअर्सच्या किमती वाजवी आहेत का त्याचा निदर्शक आहे, तर व्हीआयक्स शेअर बाजारामधील ‘वादळाची’ संभाव्यता सांगतो. जगभर सर्वसाधारणत: पीई २०-२२ व व्हीआयएक्सची २५-२८ ही वाजवी पातळी मानली जाते. त्या तुलनेत मागच्या जुलमध्ये शांघायचा पीई व व्हीआयएक्स अनुक्रमे ४४ व ७० पर्यंत गेला होता. शेअर्स, रिअल इस्टेट, सोने आदी मत्तांच्या मार्केटमध्ये भाव कमी काळात, वेगाने, एका रेषेत वाढतात त्या वेळी ते आज ना उद्या कोसळणार हे नक्की असते. या सगळ्यामुळे शांघायचा इंडेक्स ५२०० वरून २८५० वर गेल्या दहा महिन्यांत धाडकन कोसळला.
क्रयशक्ती वाढवण्याचे ‘शांघाय मॉडेल’
चिनी अर्थव्यवस्था अजूनही कम्युनिस्ट पक्षाच्या वज्रमुठीत आहे. शांघायमधील घटनांबद्दल राज्यकत्रे अनभिज्ञ आहेत असे म्हणायला कोणी धजावणार नाही. खरे तर या ‘प्रयोगातून’ ते सजगपणे काही तरी साध्य करू पाहत आहेत असे वाटते. काय साध्य करू पाहत आहेत ते? काही दशके वेगाने धावून (सरासरी वाढदर १० टक्के), चीनची अर्थव्यवस्था आता थकली आहे. ती भविष्यात अशीच मंदावत तर जाणार नाही ना या चिंतेने चिनी राज्यकत्रे त्रस्त आहेत. चीनच्या जीडीपीत निर्यातप्रधान उद्योग व पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. यापकी श्रमप्रधान वस्तूंच्या निर्यात बाजारपेठेत टिकून राहण्याची चीनची क्षमता, अनेक कारणांमुळे सबल झाली आहे तर पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, विमानतळ, किती बांधणार याला मर्यादा आहेत; आधी बांधलेल्यांच्या क्षमता पडून आहेत.
जीडीपीचा वाढदर अपेक्षित पातळीवर राहण्यासाठी चीनच्या राज्यकर्त्यांची मदार आता मध्यमवर्गावर आहे. मध्यमवर्गाने गरजेच्याच नव्हे तर चनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांची क्रयशक्ती वाढवण्याची गरज आहे. क्रयशक्ती कृत्रिमपणे वाढवण्याचे दोन मार्ग धोरणकर्त्यांकडे असतात. एक कमी व्याजाने मुबलक कर्जे देणे. ज्यातून नागरिक कार, टीव्ही, फ्रिजसारख्या ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी करतील. दुसरा मार्ग आहे ‘वेल्थ इफेक्ट’ साधण्याचा. गुंतवणूकदार रिअल इस्टेट, शेअर्स आदी मत्तांमध्ये प्राय: भांडवली नफा (कॅपिटल गेन्स) कमावण्यासाठी गुंतवणूक करतात. गुंतवणुकीसाठी घेतलेली घरे, शेअर्स यांचे भाव वाढले की लगेच कोणी ते विकून नफा खिशात घालत नसतो. नाही विकले तरी तो भांडवली नफा कागदावर (नोशनल) तर राहतोच ना! त्यामुळे आपण ‘श्रीमंत झाल्याची भावना’ गुंतवणूकदारांमध्ये तयार होते. त्या भावनेतून ग्राहकांचे खिसे सलावतात व ते मोकळेपणाने खर्च करतात. याला अर्थशास्त्रात ‘वेल्थ इफेक्ट’ प्रमेय असे म्हणतात. या मत्ता खरेदी करण्यासाठी नागरिकांकडे स्वत:च्या बचती नसतील तर त्यासाठी परत कर्जे देऊ केली जातात. चीनमध्ये हे सगळे मार्ग अमलात आणले गेले. ‘वेल्थ इफेक्ट’ साधण्यासाठी काही वष्रे रिअल इस्टेटमधील स्पेक्युलेटिव्ह गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले गेले. त्यातून बांधकाम उद्योगाला उभारी मिळाली व जीडीपीमध्ये वाढदेखील झाली. पण एवढय़ा इमारती बांधल्या गेल्या की विक्रेते जास्त व खरेदीदार कमी पडले. किमती कोसळल्या. रिअल इस्टेट मार्केट कोसळल्यानंतर मध्यमवर्गीयांना आता, शेळ्यामेढरांसारखे शेअर बाजारकडे हाकण्यात येत आहे. बहुसंख्य कष्टकऱ्यांचे वेतन आणि म्हणून क्रयशक्ती वाढवण्याऐवजी अल्पसंख्य मध्यमवर्गाच्या हातात कर्ज देऊन, त्यांची क्रयशक्ती मत्तांच्या बाजारातील स्पेक्युलेटिव्ह गुंतवणुकीद्वारे वाढवणे याला आपण ‘शांघाय मॉडेल’ असे म्हणत आहोत.
संदर्भिबदू
गोलाला केन्द्रिबदू, तसा जागतिक अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतानाचा आपला ‘संदर्भिबदू’ हा भारतीय अर्थव्यवस्था, त्यातील सामान्य माणसेच असणार आहे. ‘अर्थाच्या दशदिशांचा’ धांडोळा, आपण त्या संदर्भिबदूवर उभे राहूनच घेणार आहोत.
शांघाय शेअर बाजाराचे कोसळणे हे चीनच्या राज्यकर्त्यांच्या सजगपणे राबवलेल्या एका ‘मॉडेलचे’ कोसळणे आहे. तो ‘अपघात’ नक्कीच नाही. चीन ज्या आíथक-वित्तीय धोरणवाटांवरच्या निसरडय़ा जागेवर घसरत आहे त्याच रस्त्यांवरून, त्याच वळणांवरून आपल्या अर्थव्यवस्थेची गाडी हाकली जाऊ शकते. आपल्या देशाचा जीडीपी वेगाने वाढवण्याचे घाटत आहे. बहुसंख्य नागरिकांची न वाढणारी क्रयशक्ती हा त्या मार्गातील गंभीर अडसर आहे. कर्ज सार्वजनिक नळावरील पाण्यासारखे उपलब्ध आहे. मायक्रो क्रेडिटद्वारे शहरा-खेडय़ांतील गरिबांची क्रयशक्ती वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या पुढची पायरी ‘वेल्थ इफेक्ट’च्या मार्गाने देशांतर्गत खप वाढवण्याची. शहरांमध्ये शेअर बाजार गुंतवणुकीबद्दल विशेष वर्ग घेतले जात आहेत. जिल्ह्य़ाच्या ठिकाणी शेअर बाजाराची टर्मिनल्स लागली आहेत. बँका जाहिरात देऊन शेअर गुंतवणुकीसाठी कर्जे देऊ लागल्या आहेत. हे सगळे शांघायच्या मॉडेलच्या रस्त्यावरचे दगड आपणदेखील पार करीत आहोतच, भले कमी वेगाने असेल! आपल्या देशातील नियामक मंडळे (रिझव्‍‌र्ह बँक, सेबी) चीनच्या तुलनेने बरीच प्रगल्भ असणे अशा काही बाबी दिलासा देणाऱ्या आहेत, तरीही..

 

संजीव चांदोरकर
chandorkar.sanjeev@gmail.com
लेखक टाटा समाजविज्ञान संस्थेत प्राध्यापक आहेत.