देशातील आघाडीची ऐषारामी विश्रामकेंद्रांची शृंखला असलेल्या कंट्री क्लब इंडिया लिमिटेडने स्वास्थ्यवर्धनाकडे वळण घेऊन अवघे काही महिने उलटले असतील, देशभरात कंपनीच्या १४ फिटनेस केंद्रांचे जाळेही उभे राहिले आहे. मुंबईपाठोपाठ, अहमदाबाद, पुणे, नागपूर, बंगळुरू, चंदिगड, जयपूर, कोलकाता आणि दिल्ली अशा शहरात ही फिटनेस केंद्रे कंपनीने आखलेल्या ३५० कोटी रुपयांच्या विस्तार योजनेनुसार उभी राहिली आहेत. गेल्या वर्षांच्या मध्यावर जाहीर करण्यात आलेल्या विस्तार योजनेनुसार, देशात व विदेशात एकूण १०० फिटनेस केंद्रे उभारली जाणार आहेत. कंपनीच्या या नव्या व्यवसाय स्वारस्यात सदिच्छादूत म्हणून आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा हिला करारबद्ध करण्यात आले आहे. आगामी दोन महिन्यात देशात आणखी चार ठिकाणी कंट्री क्लबची फिटनेस केंद्रे सुरू होतील, असे कंपनीचे अध्यक्ष वाय. राजीव रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.