नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर परिषदेची ४४ वी बैठक शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली दृक्श्राव्य माध्यमातून होत आहे. करोना तसेच काळी बुरशी प्रतिबंधक औषध व उपचारांवरील कर कमी करण्याच्या निर्णयावर यावेळी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर तसेच अर्थ मंत्रालयातील विविध वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभाग नोंदवतील. त्याचबरोबर विविध राज्यांचे अर्थमंत्रीही यावेळी आपली मते प्रदर्शित करतील.

मेघालयाच्या उप मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिगटाने तयार केलेल्या अहवालावर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. करोनाविषयक वैद्यकीय औषधे, उपकरणांवरील कर कमी करण्याची सूचना मंत्रिगटाने केली आहे. गेल्या महिनाअखेर झालेल्या परिषदेच्या बैठकीत याबाबत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र ते टाळण्यात आले. बिगर भाजपा सत्ता असलेल्या राज्यांनी कर कमी करण्यासाठी बैठकीत आग्रह धरला होता.

औद्योगिक उत्पादन कोविडपूर्व समीप

करोना वैश्विक साथ प्रसाराच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यातही देशाचे औद्योगिक उत्पादन त्याच्या करोनापूर्व पदानजीक प्रवास करते झाले आहे. अर्थव्यवस्थेचे एक मानक औद्योगिक उत्पादन एप्रिल २०२१ मध्ये १३४.६ अंशांवर पोहोचले आहे.

करोना साथ प्रसारानंतर लागू झालेल्या टाळेबंदीच्या दुसऱ्या महिन्यात, एप्रिल २०२० मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक ५७.३ अंशांनी रोडावले होते.