वित्त, निधी, तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांचा समावेश
प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘फोर्ब्स’च्या तरुण वर्गाच्या वार्षिक नामावलीत भारतातील ४५ जणांची नावे झळकली आहेत. यामध्ये ओयो रुम्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अगरवाल यांचे नाव सर्वात वर आहे.
‘फोर्ब्स’ने प्रकाशित केलेल्या पाचव्या वार्षिक ‘३० वयोगटाखालील’ यादीत जगभरातील ६०० तरुण पुरुष तसेच महिला नेतृत्वाची नावे आहेत. विविध २० क्षेत्रांतील कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.
२२ वर्षीय रितेश अगरवाल यांची ओयो रुम्स ही कंपनी माफक दरातील आदरातिथ्य सेवा पुरविणाऱ्या सेवांशी ग्राहकांना संपर्क करवून देते. तिच्या अखत्यारीत भारतातील १०० शहरांमधील २,२०० छोटे आदरातिथ्य सेवा पुरवठादार समाविष्ट आहेत.
या यादीत २८ वर्षीय गगन बियाणी आणि नीरज बेरी यांचेही नाव आहे. स्प्रिंग हे मोबाइल अ‍ॅप त्यांनी विकसित केले असून त्याद्वारे खानपान मागणी नोंदविता येते. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समस्यांचे निराकरण करणाऱ्या गुगल एक्सच्या २५ वर्षीय करिश्मा शाह यांचाही उल्लेख तरुण उल्लेखनीय व्यक्ती म्हणून या यादीत करण्यात आला आहे.
यूटय़ूबद्वारे लेखन-अभियन करणाऱ्या २७ वर्षीय मूळच्या कॅनेडियन लीली सिंग यांचाही समावेश आहे. सिटीग्रुपच्या उपाध्यक्षा नीला दास (वय २७), फेसबुकच्या दिपायन घोष (वय २७), फेडरल रिझव्‍‌र्ह मंडळातील पतधोरण तज्ज्ञ आशीष कुंभाट (वय २६) यांचेही नाव यात आहे.
यादीत झळकलेल्या विकिंग ग्लोबल इन्व्हेस्टर्सच्या गुंतवणूक विश्लेषक दिव्या नेत्तीमी (वय २९), वरिष्ठ निधी विश्लेषक विकास पटेल (वय २०), गुंतवणूक विश्लेषक नील राय (वय २९) या तिघांनी ६० कोटी डॉलरच्या निधी व्यवस्थापनाचे कार्य केले आहे.
विशाल लुगानी (वय २६), अमित मुखर्जी (वय २७), निशा चित्तल (वय २७ वर्षे), आशीष पटेल (वय २९), संप्रिती भट्टाचार्य (वय २८), सागर गोविल (वय २९), अनुप जैन (वय २८), अनिता सिंग (वय २७), संजम गर्ग (वय २९) यांचेही नाव तरुण भारतीय म्हणून फोर्ब्सच्या यंदाच्या यादीत झळकले आहे.