रिटेल गुरूकिशोर बियाणी यांची टिप्पणी

भलताच गदरोळ माजविणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाधारीत नव उद्यमी (स्टार्टअप) प्रवाहाबाबत कठोर शब्दात टीका टिप्पणी करताना फ्युचर समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि देशातील आधुनिक संघटित विक्री प्रणालीचे जनक किशोर बियाणी यांनी ‘स्टार्टअप हा निव्वळ ‘होपलेस’ भपका आहे’ असे मत व्यक्त केले. केवळ वृत्तपत्रांमध्ये पानभर जाहिराती देऊन लक्ष वेधू पाहणाऱ्या एकूण ‘स्टार्टअप्स’पैकी ९० टक्के यांनी अस्सल जगच जोखलेच नसल्याची तक्रारही बियाणी यांनी केली.

देशातील मोठी किरकोळ विक्री साखळी असलेल्या फ्युचर समूहाचे प्रवर्तक बियाणी हे ‘रिटेल गुरू’ मानले जातात. प्रस्थापितांविरुद्ध ई-व्यापार मंच नवउद्यमी यांचे युद्ध ऐन सण-समारंभाच्या कालावधीत उफाळून येत असतानाच बियाणी यांनी सध्या परवलीचा शब्द बनलेल्या ‘स्टार्टअप्स’ प्रवाहावरच थेट हल्ला चढविला आहे. या नव-उद्यमींमार्फत जितके दावे केले गेले आहेत तितकी रोजगारनिर्मिती होत नसल्याची तक्रारही त्यांनी केली.

देशाला आवश्यक असलेल्या रोजगार वाढीची अपेक्षा नवउद्यमी पूर्ण करू शकत नाहीत, असे नमूद करत नवउद्यमींपैकी ९० टक्क्यांना बाहेर जग माहितच  नाही, असा आक्षेप बियाणी यांनी नोंदविला आहे. येत्या तीन ते चार वर्षांत एकूण सर्व नवउद्यमींचा महसूल ३,००० ते ४,००० कोटी रुपयांच्या पुढे जाणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

प्रसारमाध्यमांतून दिसणारे नवउद्यमींचे चित्र हे खूपच आकर्षक वाटत असले तरी प्रत्यक्षात ते तसे कार्य करत नाहीत, असेही बियाणी म्हणाले. नवउद्यमींमध्ये सुरुवातीला दोन ते तीन वेळा साहसी गुंतवणूकदारांनी रस दाखविल्यानंतर तेही कंपनीतील ८० टक्के हिस्सा अन्य कंपन्यांना विकून बाहेर पडतात, असे बियाणी म्हणाले. या क्षेत्रातील हुशार व्यक्तींनीही आता थोडा साकल्याने विचार करून आपले कार्यक्षेत्र विस्तारावे, असेही त्यांनी सुचविले.