अदानी पोर्ट्स अ‍ॅण्ड स्पेशल इकनॉमिक झोन लिमिटेडने (एपीएसईझेड) मंगळवारी आपल्या नफ्यामध्ये १६.२२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले आहे. डिसेंबर ३१, २०२० संपलेल्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीला एकूण नफा एक हजार ५७६ कोटी ३३ लाख रुपये इतका झाल्याचे कंपनीने स्पष्ट केलं आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये कंपनीला एक हजार ३५६ कोटी ४३ लाख रुपये इतका नफा झाला होता. कंपनीनेच बीएसईला दिलेल्या माहितीमध्ये ही आकडेवारी देण्यात आली आहे. कंपनीची एकूण कमाई ही तिसऱ्या तिमाहीमध्ये चार हजार २७४ कोटी ७९ लाख रुपये इतकी आहे. वर्षभरापूर्वी हा आकडा तीन हजार ८३० कोटी ४३ लाख इतका होता. कंपनीने दिलेल्या खर्चाच्या हिशोबानुसार कंपनीने यंदाच्या तिहामीमध्ये दोन हजार २५८ कोटी ६२ लाख रुपये खर्च केले आहेत. मागील वर्षी याच तिमाहीमध्ये हा आकडा दोन हजार ९१ कोटी ४० लाख रुपये इतका होता.

नक्की वाचा >> अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा ताबा घेण्यास केली सुरुवात; २३.५ टक्के हिस्सेदारीचा व्यवहार पूर्ण

एपीएसईझेडचे कार्याकारी अध्यक्ष असणाऱ्या करन अदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही काळामध्ये आम्ही केलेल्या कामगिरीमुळे अशाप्रकारे एपीएसईझेडला पुन्हा आपला व्यापार रुळावर आणता आला आहे. आमचा उद्योग हा चांगल्या पद्धतीने वाढत असल्याचे हे संकेत आहेत. कंपनीच्या मालकीची संपत्ती, भारतीय बाजारपेठेमध्ये वाढणारा वाटा, आमची यंत्रणा आणि सध्या असणारे नेतृत्व हे अत्यंत महत्त्त्वाचे असल्याचे करन अदानी यांनी म्हटलं आहे. एपीएसईझेडने अनेकदा नवीन शोध आणि कामामध्ये विविधता आणल्याने आम्ही इतरांपेक्षा सरस ठरल्याचंही करन यांनी म्हटलं आहे. याच कारणामुळे कंपनीचा नफा वाढल्याचे सांगण्यात आल्याचं पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

नक्की पाहा >> मोदी सरकारच्या काळात अदानींच्या २१ कंपन्यांना मंजूरी; जाणून घ्या Adani Agri Logistics आहे तरी काय?

एपीएसईझेड सध्या लॉजिस्टी आणि गोदामाच्या उद्योगांमधील गुंतवणूक वाढत आहे. यामध्ये ट्रॅक्स, ट्रॉली तसेच मल्टीमॉडेल लॉजिस्टीक पार्क, गोदामे उभारण्यासाठी जमीनी विकत घेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे, असंही करन यांनी सांगितलं. पर्यावरणाचे संरक्षण करत उद्योगचा विस्तार करण्याला आमचे प्राधान्य आहे असं करन यांनी स्पष्ट केलं आहे. पर्यावरणावर कमीत कमी परिणाम करणाऱ्या गोष्टींचा आम्ही आमच्या उद्योगामध्ये सातत्याने वापर करत असतो. आमच्या संपूर्ण कामामध्ये ग्रीन हाऊन गॅस एमिशन आणि कमीत कमी गोष्टी वाया जातील याकडे लक्ष देण्याचा कायमच प्रयत्न असतो. या प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही २०२५ पर्यंत कार्बन न्यूटल पद्धतीने उद्योग करु असे आमचे लक्ष्य आङे असंही करन यांनी सांगितलं.

अदानी उद्योग समुहातील बंदरे आणि त्यासंदर्भातील व्यापाराचे काम करणारी एपीएसईझेड ही भारतामधील सर्वात मोठी बंदर निर्मिती आणि वाहतूक कंपनी आहे. भारतामधील १२ महत्वाच्या ठिकाणी एपीएसईझेडची केंद्र आहेत. यामध्ये मुंद्रा, दाहीज, कांडला, हजीरा या गुजरातमधील चार, ओदिशामधील धामरा, गोव्यातील मोरमूगाव, आंध्रमधील विशाखापट्टणम आणि कृष्णापट्टणम तसेच चेन्नईमधील कत्तुपाली, एन्नोरे येथे एपीएसईझेडचा व्यापार चालतो. देशातील बंदरांमधून होणाऱ्या व्यापारापैकी २४ टक्के क्षमता ही एपीएसईझेडची आहे. कंपनी आता केरळमधील तसेच म्यानमारमध्ये कंटेनर टर्मिनल उभारण्याचं काम करत आहे.